Posted on

चाळीतील जीवन- सुधाकर अशोक तळवडेकर

1240+

सूर्य उगवताच गावाकडे कोंबडा बांग देतो I
शहरातील या चाळीत घडाळ्याचा गजर जाग आणतो II1II

काही मंडळींच्या विचारांना फुटू लागतात फाटे I
मुलांच्या पाठीत बसतात त्यांना उठवण्यासाठी धपाटे II2II

उठल्यानंतर प्रत्येकजण घेतो हातात डबा I
शौच्यालायासमोर देखील असते गर्दी तोबा II3II

तेथेच काही माणसे आखत असतात दिवसभरातील योजना I
तर काही माणसे करत असतात ‘लवकर उरका’ अशा गर्जना II4II

प्रत्येकाच्या तोंडात असते कडूलिंबाची काडी I
घण घण घंटा वाजवत येते कचर्‍याची गाडी II5II

नळावर जाऊन बायका पाणी भरून आणतात I
सर्वांच्या नाश्ता जेवणाची सोय स्टोव्हवर करतात II6II

आंघोळ नाश्ता करून माणसे व मुले होतात जाण्यासाठी सज्ज II
ते निघून गेल्यावर चाळीत उरते फक्त महिलाराज्य II7II

दुपारचे जेवण आटपोनी बायका जामतात एकत्र I
निरनिराळ्या विषयांवर सुरू होते एक चर्चासत्र II8II

‘तुला माहितीय?’ या प्रश्नाने प्रत्येक विषयाला सुरवात होते II
बोलण्याच्या नादात प्रत्येक बाई तो विषय भलतीकडेच नेऊन ठेवतेII9II

याच चर्चासत्रात जन्म घेतात नवनवीन पाककला I
पदार्थ बनविण्याची कृती सांगताना होतो कठीण मामला II10II

पाककलेनंतर मोर्चा T.V. मालिकांकडे वळतो I
प्रत्येक मालिकेचा तेथे Repeat Telecast होतो II11II

जशी संध्याकाळी ऑफिसातील मंडळी घरी परतू लागतात I
तसे चर्चा संपवून बायकांचे पाय घराकडे वळतात II12II

ऑफिस संपवून नवरे घालतात मार्केटात गस्त I
रस्त्यावरची का होईना पण भाजी घेतात स्वस्त II13II

शाळेतून परतल्यावर काही मुले अभ्यासाला बसतात I
तर काही कपडे बदलून लगेच मैदानाकडे धावतात II14II

टारगट पोरे नाक्यावर बसून टवाळक्या करतात I
तर खोडकर पोरे घरातच दंगामस्ती करत बसतात II15II

ऑफिसातून परतलेली मंडळी ठळक घडामोडींचा आढावा घेतात I
तर दुसर्‍या दिवशी उगवण्यासाठी सूर्यदेवही अस्ताला जातात II16II

दिवसभरचा थकवा घालवण्यास निघते बाहेर पुरुषांची स्वारी I
बायका मात्र करत रहातात रात्रीच्या जेवणाची तयारी II17II

गच्चीवरती जमुनी सर्वजण अंथरतात फरशीवर मॅट I
नंतर एकजण काढतो खिशातून पत्यांचा कॅट II18II

पत्ते खेळताना ती माणसे गप्पांचा फड रंगवतात I
कधी कधी आपली दु:खे बाटलीतही बुडवतात II19II

मग घराघरातून निघतो जेवणचा सुंदर वास I
पत्ते फेकून प्रत्येकजण म्हणतो ‘अरे आता बास’ II20II

जेवताना देखील घरातच जमते गप्पांची मैफिल I
घरातील झाडून सर्वजण होतात त्यात सामिल II21II

दिवसभरातील सुखं-दु:खे सांगून करतात मन मोकळे I
मनावरचे ओझे हलके करून होतात आनंदी सगळे II22II

आनंदी होऊन सर्वजण अंथरुणावर अंग टाकतात I
दिवसभरातील थकवा विसरून निद्रेच्या आधीन होतात II23II

अशीच चालते चाळीतील माणसांची दिनचर्या I
एकत्र जमती सर्व माणसे कोणत्याही कार्या II24II

सण असो वा उत्सव असो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात I
भांड भांड भांडूनही सर्वजण संकटात मदतीला धावतात II26II

नवीन माणूस राहायला आल्यास त्याला अगदी घरच्यासारखे वागवतात I
चाळीत कोणावर अन्याय झाला तर सगळेच पेटून उठतात II27II

इतुके बोलूनी संपवितो मी माझे रामायण I
चालत राहते असेच या चाळीतील जीवन II28II

सुधाकर अशोक तळवडेकर 

 

1240+