Posted on

समर्पण- सांची कांबळे

170+

हा पाऊस रुजलाय माझ्यात
खोलवर…
अंगावर सरसरून येणाऱ्या शहा-यांत
तोच फुलत असतो…

आभाळभर पसरणा-या
धावत्या सरी-
जशा तानपु-याच्या
झंकारणा-या तारा…
नि त्यावर फिरणारी-
ती थरथरती बोटं…

या भरल्या आभाळाशीच
जोडलं जातं
माझं अवघं विश्व-
काही कळायच्या आतच…

हरवून जाते मी-
पानापानांतून ओथंबणा-या पागोळ्यांत,
तरारून येणा-या उभ्या रानात,
अर्धवट भिजल्या भुरभुरणा-या केसांत,
अन् धडधडत्या काळजाची लय सावरणा-या –
या पावसाच्या आदिम स्वरांत…

नको नको म्हणता
भिजवतोच हा पाऊस…
भिजवतो कसला-
विरघळवतो ;
कणाकणानं !….

हट्ट सोडते मग मी,
अन् झेलून घेते,
माझ्या दिशेनं धावत येणा-या
सरींचा आवेग…

मोकळ्या मनानं
कुरवाळून घेते,
हा काळजात घुसणारा वारा…

…अन् भिजून जाते चिंब…
वाहू देते स्वतःला,
या वाहत्या सरींत…

माहितीये मला-
की परतीचा आहे हा पाऊस…
निघून जाईल केव्हातरी-
कायमचाच !…

पण तरीही असा सर्वस्वात
भिनत राहतो तो,
की ढळतात सारे निर्धार….
पुसट होतात रेषा…

जीव ओवाळून टाकते मी आता,
या चार क्षणांवर…
उद्या नसतील
या सरी कदाचित ;
पण म्हणून जगणंच राहून जायला नको !

सांची कांबळे

 

 

170+