राजीव खांडेकर सरांचं “हार्ट टू हार्ट” पुस्तक परवा लायब्ररीत दिसलं. त्यांनी घेतलेल्या मुलाखती लोकसत्ता मध्ये “हार्ट टू हार्ट” कॉलम ने त्यावेळी यायच्या..त्याच हे पुढे जाऊन पुस्तक झालं. साधारण २८ जणांच्या यात मुलाखती आहेत.
ठरविक प्रश्न आणि त्याची उत्तर अस मुलाखतीच एक सर्वसाधारण स्वरूप आपल्या डोक्यात फिट्ट असत. किंवा मुलाखत सुरू असताना मुद्दे काढून ठेवायचे नंतर त्या मुद्द्यांवरून मुलाखत लिहायची अस आपण करतो. पण मुलाखत घेताना कोणत्याही नोट्स न काढता एखाद्याशी निवांत गप्पा मारायच्या आणि नंतर त्याच व्यक्ती चित्र शब्दातून उभं करायचं हे अशी मुलाखत घेण्याची राजीव सरांची स्टाईल.
सुरेश प्रभू, आशुतोष गोवारीकर, सुप्रिया सुळे, निळूभाऊ फुले, वामनराव पै, रामदास पाध्ये, लोकशाहीर विठ्ठल उमप आशा अनेकांचा प्रवास यातून नव्याने कळतो.
साधारण १५ वर्षापूर्वीच हे पुस्तक असावं. कारण कालानुरूप काही संदर्भही आता बदलत गेलेयत.
मायक्रोबायोलॉजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या खा. सुप्रिया ताईं तेव्हा “लर्निंग डीसॅबिलिटी” विषयावर आणि यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठाच्या माध्यमातून काम करीत होत्या. “डायनिंग टेबलवर बसून राजकारणावर चर्चा करणे एक मर्यादेपर्यंत ठीक वाटते, त्यांनतर मला तेही फारसे आवडत नाहीत” असे सुप्रिया ताईंचे त्यावेळचे वाक्य होते. आज प्रभावी खासदार म्हणून राजकारणात सक्रिय आहेत.
अभ्यासू, कल्पक, ध्येयवेडे असे सुरेश प्रभू मात्र याला अपवाद ठरतात. प्रभू आणखी १० वर्षांनी आता इतकेच प्रभावी असतील का? की जाती धर्माच्या राजकारणाला कंटाळून ते बाहेर पडतील? ते या वातावरणात कितपत टिकतील अशी शंका मुलाखती नंतर व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री असलेले प्रभू मुलाखत घेतली तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक परिषदेवर वरिष्ठ सल्लागार होते.
निळू भाऊ, वामनराव पै आणि विठ्ठल उमप यांच्याशी झालेले “हार्ट टू हार्ट” पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे.
खलनायक म्हणूनच परिचित झालेल्या निळूभाऊंना अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागलं. कधी कुठे घरातही प्रवेश नाकारण्यात आला तर कधी शिव्याही पडल्या.
जांभूळ आख्यान पाहताना कर्णावर जीव ओवाळून टाकणारी द्रौपदीच साक्षात विठ्ठल उमप यांच्याजागी दिसायची. वयाच्या ७५ नंतरही हा जोश कुठून येतो यावर त्यांच ठरलेलं उत्तर ते द्यायचे.
लोकांच्या भीती, दुःखाचा फायदा घेणाऱ्या बुवाबाजीच्या काळात “कोणी साधू किंवा संत नाही, जीवनविद्या मार्गदर्शक” अशी ओळख झालेले तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगणारे वामनराव पै. यांचा मंत्रालयाच्या नोकरीपासून ते ‘जीवनविद्या’ पर्यंतचा प्रवासही जाणून घेण्यासारखा आहे.
अजून खूप जणांच्या त्यावेळच्या कथा उलगडत जातील. सई परांजपे, अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी, पैलवान मारुती माने असे अनेक.
#हार्टटूहार्ट #राजीवखांडेकर
भाग २ लवकरच…
-#प्रविणदाभोळकर