Posted on

चंद्र्फुलांच्या बागा….!!!- प्रथमेश माधव डोळे

16+

कधी दिसावी आनंदाच्या
किनाऱ्यावरी नाव
कधी दिसावा अश्रुंमागे
आठवणींचा गाव…

कधी ऐकावे पानांवरती
थरथरणारे गाणे
कधी मौनातून कधी एकांती
शीळ वाजवीत जाणे…!

कधी जागेपण असे भिनावे
जशी नभातील वीज…!
कधी आईच्या गोड कुशीतील
लेकुरवाळी नीज…

जीवन म्हणजे आठवणींच्या
कवितेमाधली ओळ…
वृद्ध आज्जीच्या डोळ्यांमधला
भातुकलीचा खेळ…

जीवन म्हणजे गर्दीमधली
एक रिकामी जागा..!
काळोखाच्या वळणावरती
चंद्र्फुलांच्या बागा….!!!

प्रथमेश माधव डोळे

 

16+