Posted on

दत्तप्रसाद जोग यांना बा.भ.बोरकर स्मृती पुरस्कार जाहीर

0

साहित्य मंथन सत्तरीतर्फे दत्तप्रसाद जोग यांचे अभिनंदन….
दी गोवा हिंदू असोसिएशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य पद्मश्री बा.भ.बोरकर स्मृती पुरस्कारासाठी वाळपई सत्तरी येथील दत्तप्रसाद जोग यांची निवड करण्यात आली आहे. शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह व रोख रु.१५ हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

२५ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
आपले अभिनंदन आणि आम्हाला अभिमान….शुभेच्छा…..

 

0
Posted on

‘जू’ चे लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचा सन्मान

0

||घोगस पारगाव जि. बीड||

लेखन ही माझ्यासाठी स्वत:ला खोदत जाण्याची गोष्ट आहे.

ही गोष्ट मी फार निगुतीने अन जीव लावून करतो. ज्या कृषीसंस्कृतीत मी वाढलो तिथेच माझी ही धारणा पक्की झालीय. तिच्याशी जराही प्रतारणा केली तर मलाच घुसमटून श्वास कोंडल्यासारखं होईल.

लेखकाने स्वत:ला सतत खणत जावे; असं मी स्वत:ला बजावीत असतो. जसे आपण जमीन खोदत जातो अन पाण्यापर्यंत पोहचतो! पाण्यापर्यंत पोचण्याचा प्रवास इतका सोपा नसतो; हेही मला माझ्या कृषी संस्कृतीने शिकवले आहे. साहित्य लिखाण हा माझ्या छंद नाही. साहित्य मला जिवंत ठेवणारी अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे. शब्दांच्या मुशीत जगता जगता शब्दांच्याच मांडीवर डोकं ठेवून मरून जाण्याची इच्छा मी बाळगतो. ही कवी कल्पना नाही! शब्दांशिवाय मला करमूच शकत नाही.

हे सगळं सांगायचं कारण जेव्हा याच शब्दांची नोंद घेऊन सन्मान बहाल होतो. तेव्हा त्या सन्मानाचं मला अप्रूप वाटतं. स्व. कडुबाई गर्कळ हा पुरस्कार माझ्या ‘जू’ आत्मकथनाला नुकताच मिळाला. या पुरस्काराने मला रोख रक्कम मिळाली. स्मृती चिन्ह मिळालं; पण त्याही पलीकडे जाऊन मला निखळ माणुसकीची व्याख्या जगणारी माणसं मिळाली. साहित्याने माणूस जोडला जावा हीच तर भूमिका घेऊन जर मी लिहीत असेल, अन माणसांच्या घनदाट गर्दीत आपल्याला अशा माणसांचा सुगावा लागावा ही खूप मोठी कमाई मी समजतो. कवी बाळासाहेब गर्कळ या माणसाने जे प्रेम दिलं ते शब्दातीत आहे. ‘घोगस पारगाव’ सारख्या खेडेगावात हा माणूस साहित्याचा जो यज्ञ करतो आहे तो कौतुकासपद आहे. पीक उगवून आणण्याचा कृषी संस्कृतीचा धर्म, मात्र इथे माणुसकीचे अन संवेदनशीलतेचे पीक तरारुन उगवून आलेले मी पाहिले, ते पाहून मी खरोखर हरखून गेलो. त्यांनी केलेला ‘पाहुणचार’; पुरस्कार बिरस्कर ही गोष्टच बाजूला राहून जाते. अशी माणसं मिळत गेली की मला त्या पुरस्काराचं मोल वाटतं. अन्यथा शोकेसमध्ये स्मृतीचिन्ह तेवढं जागा घेवून बसतं…!

0
Posted on

डॉ. प्रेरणा पारवे-सिंह यांच्या कथेला पुरस्कार

0

आपण सहज लेखनाला सुरुवात करतो. काव्य लेखन करता करता कथा लिहिण्याचा प्रयत्न करतो. कला शाखेची कुठलीच पार्श्वभूमी नसताना हे अवजड शिवधनुष्य पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.. प्रामाणिक याकरता, कारण कथा लिहिण्यापूर्वी कथाकार तिचा तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण अभ्यास करून, ती अक्षरशः जगून बघतो आणि मगच लेखनाचे स्वतःचे विशेष तंत्र वापरून ती प्रत्यक्षात उतरवतो… अनेक टिकांना तोंड देत, लेखनाचे धाडस करतो. आपण हे करू शकलो हे माझ्याचसाठी अविश्वसनीय आहे.
पण आपली कथा ज्यावेळी fb तून लोकांच्या वाचनात येते ..त्याला मिळालेला प्रतिसाद ही अतिशय आनंदाची गोष्ट ठरते . त्यात जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेत शेकडो जाणकार लेखकांच्या कथांमधून आपल्या कथेची निवड केली जाते. एका प्रतिष्ठित मंचावर अतिशय अनुभवी परीक्षक आणि समीक्षक यांच्या उपस्थितीत आपल्या कथेला विशेष पारितोषिक मिळावे यासारखे दूसरे सुख नाही .
चार दिवस डोकं भंजाळून, रात्री जागून लिहिलेल्या कथेचा आज प्रवास पूर्ण झाला असेच वाटते .
इतका मोठा आनंद तुमच्याशिवाय कसा साजरा व्हावा ..तर मित्रांनो ह्या यशाचे श्रेय तुम्हांला ! तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रेमात ..आपुलकीत माझी ऊर्जा दडली आहे .

महाराष्ट्र साहित्य परिषद
कल्याण शाखाने आयोजित केलेल्या
राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत ,

विशेष उल्लेखनीय कथा म्हणून माझ्या ‘उंदीरवाडी’ कथेची निवड झाली, सोहळा नयनरम्य होता . दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले .हा अविस्मरणीय क्षण ह्या सुंदर स्मृतीचिन्हाद्वारे आयुष्यावर कायमचा कोरला गेला .

उंदीरवाडी ही कथा कल्याणच्या सोळा वर्षाची परंपरा असलेल्या वार्तासूत्र या दिवाळी अंकात समाविष्ट झाली आहे .
धन्यवाद .

परीक्षक इकबाल मुकादम सर
भिकू बारस्कर सर
राजीव जोशी सर
महाराष्ट्र साहित्य परिषद
कल्याण शाखा

सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद अखंड असु दया .
Anuradha Burande Wadekar तुझे विशेष आभार !
डॉ .प्रेरणा पारवे – सिंह

0