Posted on

वाटलेच तर येऊन जा एकदा  …. गौरी कदम 

333+

कधी वाटलेच तर येऊन जा
माझ्या अंगणात
तसेच दिसेल तुला पूर्वीसारखे
सगळेच संवेदनशील भासणारे
मोगरा आजही फुलतो अन्
सुवासाने फुलवतो मन माझे
आता फुलांना ओंजळीत
घेऊन तो सुवास श्वासात
साठवून ठेवणारे कोणी नाही
एवढेच…
इवल्याश्या चिमण्यांची चिवचिव
रोज  तशीच आहे अजून
कधीतरी खिडकीतून सावध येऊन
शोधताना दिसतात कोणालातरी
त्यांनी अजूनतरी आपलेपणा  जपलाय
तुझे अतीप्रिय गुलाबाचे रोप मात्र
हळूहळू आठवणीत झुरून गेले
बहुतेक…
आपल्यासारखे त्याला जगता नाही आले
आठवणी मागे सारून
म्हणूनच..
आंबाही मोहरतो अगदी आनंदाने
कधीतरी “ये” म्हणतो माझ्या सावलीत
खिडकीसमोर उभा राहून गातो
तेच  तुझे आवडते गाणे
मुद्दामच ..
कोकीळ साथ देतो
दोघे गात असतात अगदी सुरात
माझा हरवलेला सूर चुकूनही
जात नाही त्यांच्यात
मिसळायला…
गुलमोहर बहरतो अगदी आनंदात
पानगळ आल्यावर मात्र उदास वाटतो
मला कधी खुणावत नाही तो
माझ्या आधी त्याला कळून चुकले
जगण्याच्या दोन अवस्था
नकळत..
अंगणातल्या सगळ्यांना जगणं
बहरण्याचा मोह सगळेच
हवेहवेसे वाटत राहते
कायमच ..

वाटलेच तर येऊन जा एकदा  ….

गौरी कदम 

333+