Posted on

वाटलेच तर येऊन जा एकदा  …. गौरी कदम 

333+

कधी वाटलेच तर येऊन जा
माझ्या अंगणात
तसेच दिसेल तुला पूर्वीसारखे
सगळेच संवेदनशील भासणारे
मोगरा आजही फुलतो अन्
सुवासाने फुलवतो मन माझे
आता फुलांना ओंजळीत
घेऊन तो सुवास श्वासात
साठवून ठेवणारे कोणी नाही
एवढेच…
इवल्याश्या चिमण्यांची चिवचिव
रोज  तशीच आहे अजून
कधीतरी खिडकीतून सावध येऊन
शोधताना दिसतात कोणालातरी
त्यांनी अजूनतरी आपलेपणा  जपलाय
तुझे अतीप्रिय गुलाबाचे रोप मात्र
हळूहळू आठवणीत झुरून गेले
बहुतेक…
आपल्यासारखे त्याला जगता नाही आले
आठवणी मागे सारून
म्हणूनच..
आंबाही मोहरतो अगदी आनंदाने
कधीतरी “ये” म्हणतो माझ्या सावलीत
खिडकीसमोर उभा राहून गातो
तेच  तुझे आवडते गाणे
मुद्दामच ..
कोकीळ साथ देतो
दोघे गात असतात अगदी सुरात
माझा हरवलेला सूर चुकूनही
जात नाही त्यांच्यात
मिसळायला…
गुलमोहर बहरतो अगदी आनंदात
पानगळ आल्यावर मात्र उदास वाटतो
मला कधी खुणावत नाही तो
माझ्या आधी त्याला कळून चुकले
जगण्याच्या दोन अवस्था
नकळत..
अंगणातल्या सगळ्यांना जगणं
बहरण्याचा मोह सगळेच
हवेहवेसे वाटत राहते
कायमच ..

वाटलेच तर येऊन जा एकदा  ….

गौरी कदम 

333+
Posted on

घन व्याकुळ व्याकुळ होतो- स्वाती गोडबोले 

182+

घन व्याकुळ व्याकुळ होतो
मन गाभूळ गाभूळ होते
विरह …अभंग आळवित जातो
मग देहाचे राऊळ होते

कड़ ओलावते ड़ोळा
की सांज अधिर ही होते
तुझा स्पर्श ओढूनी घेते
मग निश्चल नीर होते

काळजी अनावर होते
हुरहुर उरी उरताना
तू नसतो ना निराळा
तुझ्यात मी मुरताना

देहाचे अंतर मग
काळीज छेदून जाते
स्फुंदन उरते गात्री
किंकाळी भेदून जाते

नांदते इथे व्याकुळता
माहेरवाशीण जैसी
पुन्हा सासरी जाताना
मन गडबड गोंधळ होते

स्वाती गोडबोले 

 

182+
Posted on

साजण बोहल्यावर- अक्षय कट्टी

1646+

साजण बोहल्यावर नाही आज सरणावर चढलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
जातीसाठी नाही तर मातीसाठी लढला माझा साजण
मागुन सुद्धा असं मिळत नाही मरण
तिरंग्याचा अंतरपाट त्याच्या देहावर घातलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

शत्रूच्या गोळ्यांचा अलंकार त्याने केलाय
ऱक्ताच्या हळदीने देह पुनीत झालाय
वरमाईचा मान भारतमातेने घेतलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

वऱ्हाड्यांच्या डोळ्यात पाणी मांडव आहे शांत
अभिमान वाटतोय त्याचा आता मी का करु आकांत
अमर रहेच्या मंगलाष्टकांचा घोष वाढत चाललाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

त्याच्या नावचे कुंकु लावायचे स्वप्न मात्र राहुन गेले
लग्न न होताच विधवेचे जिणे सामोरे आले
देशप्रेमाचा खरा अर्थ आज तो शिकवुन गेलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

अक्षय कट्टी

 

1646+
Posted on

दुष्काळ- अरविंदा राजधर भामरे

29+

मुठीत रक्त आवळून
यंदा ही नांगर चालवला.
डौलदार पिकांचे स्वप्न उराशी घेऊन,
तरी अभागी काळे ढग
नुसते रानमाळावर गर्जून गेले.

आता वासरांचे हंबरडे ऐकू येत नाही
स्मशान पडलेल्या गोठ्यावर!
मेंढरांची धुळीत पडलेली पावले,
दिसत नाही कुठे गाववाटेवर!!

थयथयाट करीत आहेत
जखमांचे थवे उजाडलेल्या उरांवर !
हयात सरली तळ पायातल्या
भेगा शिवून शिवून
सांजवातीला कुळवणारे हात
आता धावतायत शहराच्या वळणावर! !

कोणी विझलेल्या बिड्या वेचून वेचून
पुन्हा पुन्हा फूंकतोय
वेदनेचा धुर दिसू नये म्हणून,
कोणी उमलणा-या कळयांना
जगण्याचे आश्वासन देतोय
उध्वस्त बागेचं स्वप्न
त्यांनी पून्हा पाहू नये म्हणून! !

कोणी नक्षत्राचे श्वास
आभाळाकडून दान मागतोय
उपाशी मरण दारावर येऊ नये म्हणून. !!

चूल्हीवरचा तवा जळतोय नुसता
भाकरीचा आभास डोळ्यात साठवून
तरी या गावावर सूर्य उगवतो आहे
पून्हा पून्हा …..
अंधाराच्या छातीवर
आशेची किरणं उधळून! !

अरविंदा राजधर भामरे

 

29+
Posted on

‘मुक्त व्यासपीठ’ आणि Bronato प्रस्तुत ‘काव्य स्पर्धा’

12+

प्रत्येक माणूस हा रसिक असतो आणि त्याच्या आत कुठे ना कुठे तरी एक कलाकार दडलेला असतो. तुमच्या आत देखील असाच एखादा कलाकार दडलेला असेल. अशा कलाकारांसाठी सुरवात झाली मुक्त व्यासपीठाची.. मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल गेले एक वर्ष साहित्यातील अनेक कलाकृती रसिकांसमोर आणायचा प्रयत्न करत आहे. ह्या मुक्त व्यासपीठाला दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आम्ही, म्हणजेच ‘मुक्त व्यासपीठ’ आणि ‘bronato.com’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्पर्धा आयोजित केली आहे, जिथे तुमच्या आत दडलेल्या कवीमनाला संधी मिळेल. तुम्हाला इतकंच करायचं आहे कि तुमची एक रचना आम्हाला ईमेल करायची आहे.

तुम्ही पाठवलेल्या कवितांपैकी काही निवडक कविता आम्ही bronato.com वर ब्लॉग स्वरूपात प्रसिद्ध करू. त्या नंतर सर्व निर्णय हा रसिकांचा असेल. प्रत्येक कविते खाली रसिकांना लाईक करण्याचं ऑप्शन असेल. सर्वाधिक लाईक असलेल्या ३ कवींना संधी मिळणार आहे ‘मुक्त व्यासपिठावर’ झळकण्याची. जिंकलेल्या ३ कवी आणि त्यांच्या कवितांचे मुक्त व्यासपीठ तर्फे व्हीडीओ बनवले जातील. आणि आपल्या चॅनल वरून प्रसिद्ध केले जातील.

आम्ही तुम्हाला संधी देत आहोत जगा समोर तुमच्या कवितेला सादर करण्याची. तर वेळ दवडू नका. लवकरात लवकर आम्हाला तुमची कविता पाठवा.

 

तुमच्या कविता आम्हाला ह्या इमेल आयडी वर पाठवा

mukt.sanvad@gmail.com

स्पर्धेचे नियम व अटी:

१. तुम्ही मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलेलं असावे..

२. ब्रॉनतो.कॉम वर तुम्ही रजिस्टर असावे..

३. तुम्ही पाठवलेली कविता हि तुम्ही स्वतः रचलेली असावी..

४. पाठवलेली कविता जर ह्या पूर्वी कुठे हि प्रकाशित झाली असेल तर त्या कवितेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

५. स्पर्धे दरम्यान किंवा त्या नंतर हि जर कुणी हि त्या कवितेवर तुमच्या व्यतिरिक्त हक्क सांगितला आणि जर ती कविता तुमची नाही असं सिद्ध झालं तर ती कविता स्पर्धेतून रद्द केली जाईल..

या स्पर्धेची माहिती तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा.

12+