Posted on

काय लिहाव  तिच्याबद्दल- रवींद्र पाटील

28+

काय लिहाव  तिच्याबद्दल …
ती बरसणाऱ्या पावसाची रिमझिम धून आहे ……
कि कडाडत्या थंडी मधलं कोवळ कोवळ ऊन आहे……
ती आहे दुखा:तल  माझ्या डोळ्यातलं पाणी ,
कि सुखामध्ये ओठांवर आसुसलेली मंजुळ गाणी …।
ती चिमण्यांचा चिव चिवाट आहे
कि निखळ वाहत जाणाऱ्या नदीचा खळखळाट आहे ……।
ती आहे अंगणभर माझ्या पसरलेलं मोहक चांदण
कि माझ्या रागावर नियंत्रण असलेलं तिच्या नावच गोंदण ……।
ती आहे क्षितीज्यावर पसरलेलं सुर्याच किरण ….
कि जगायचं कस याच नेमक उदाहरण ……….
आहे ती एक शक्ती जी माझ्या घराला घरपण देते ….
ती आहे तो शब्द ज्यामुळे माझी कविता जन्माला येते ……!!

काय लिहाव तिच्याबद्दल ….
ते अक्षर जर नसेल तर बाराखडी लंगडी आहे ,
तीच तर माझ्या एकटेपणात माझी खरी सवंगडी आहे ………
मी नाही म्हणत कि ती प्रत्येक वेळी माझा श्वास… श्वास होतो ….
कारण मुलगी आहे याचा फक्त आपल्याला भास होतो….

काय लिहाव तिच्याबद्दल ….
ती माझ्याकडे महागडी खेळणी ,नवीन नवीन कपडे ,
मॉल मध्ये फिरणं किवा वेगवेगळे मोबाईल नाही मागत …।
नाहीच तिला पुष्कळ असा पैसा आपल्या स्वतावर उधळायला हवा …
तिला फक्त मी तिच्यासोबत काही काळ  खेळायला हवा …।

आणि तरी मी म्हणतो ….
नाही बाळा  काम आहे …कामामध्ये हरवून गेलोय …
नाही काम केल तर कस चालेल …असे नाईलाजाने उत्तरे देत आलोय …
आणि उत्तरे देवूनही आज मी तिच्यासमोर खरच निरुत्तर झालोय ….
पण खोटी खोटी का होईना ती मला सहानभूती देते …।
नाही पप्पा  मी तुम्हाला पुर्णपणे  समजून घेते ….
पण तरीही …. ती डोळे बंद करून रडत बसते ….
कुशीत झोपल्यावर माझ्या स्वप्नातही माझ्याशी खेळत बसते …।
आयुष्य का अस धावपळीत गुरफटून निघून जातं  …
आणि आपण म्हणतो कि आपल्या मुळीच मनन सार काही समजून घेतं ….!!

रवींद्र पाटील

 

28+
Posted on

चंद्र्फुलांच्या बागा….!!!- प्रथमेश माधव डोळे

16+

कधी दिसावी आनंदाच्या
किनाऱ्यावरी नाव
कधी दिसावा अश्रुंमागे
आठवणींचा गाव…

कधी ऐकावे पानांवरती
थरथरणारे गाणे
कधी मौनातून कधी एकांती
शीळ वाजवीत जाणे…!

कधी जागेपण असे भिनावे
जशी नभातील वीज…!
कधी आईच्या गोड कुशीतील
लेकुरवाळी नीज…

जीवन म्हणजे आठवणींच्या
कवितेमाधली ओळ…
वृद्ध आज्जीच्या डोळ्यांमधला
भातुकलीचा खेळ…

जीवन म्हणजे गर्दीमधली
एक रिकामी जागा..!
काळोखाच्या वळणावरती
चंद्र्फुलांच्या बागा….!!!

प्रथमेश माधव डोळे

 

16+
Posted on

मायची_हाक ! -सुधीर वि. देशमुख 

18+

बाळ तू मोठा साहेब झालाय
हाफ पॅन्टचा सुटा बूटात आलाय
मोठी गाड़ी मोठा बंगला
कमावतो आहे खुप चांगला

आता सारखा तू कामात असतो
लहान गोष्टी साठी वेळ नसतो
लहान होता तेव्हा बीमार झालता
बा तुया रातभर जागला

गावात नव्हता डॉक्टर वैद्य
पाठीवर घेऊन तुले शहर गाठलं
आता बा जरा थकलाय
पाठीपासून थोडा वाकलाय

काल रात्रि अचानक उठलं
रातभर सारख्ं खोकत बसलं
तालुक्यात तुले शाळेत टाकलं
खुट्यावरच वासरु विकुन टाकलं

पैसा तुया आम्हास नको
गाड़ी बंगला तर अजिबात नको
बा च तेवढं ऐक
गावात येऊन एकदा भेट

तेल संपलेला दिवा तो
परत कधी पेटनार नाही
विझला आता तर
कधी तुला दिसणार नाही

मग कधी तू तेरवि करशील
समाज सर्व जेवू घालशील
सगे सोयरे येतील रे सर्व
पण बा तुया दिसणार नाही.

सुधीर वि. देशमुख 

 

18+
Posted on

समर्पण- सांची कांबळे

170+

हा पाऊस रुजलाय माझ्यात
खोलवर…
अंगावर सरसरून येणाऱ्या शहा-यांत
तोच फुलत असतो…

आभाळभर पसरणा-या
धावत्या सरी-
जशा तानपु-याच्या
झंकारणा-या तारा…
नि त्यावर फिरणारी-
ती थरथरती बोटं…

या भरल्या आभाळाशीच
जोडलं जातं
माझं अवघं विश्व-
काही कळायच्या आतच…

हरवून जाते मी-
पानापानांतून ओथंबणा-या पागोळ्यांत,
तरारून येणा-या उभ्या रानात,
अर्धवट भिजल्या भुरभुरणा-या केसांत,
अन् धडधडत्या काळजाची लय सावरणा-या –
या पावसाच्या आदिम स्वरांत…

नको नको म्हणता
भिजवतोच हा पाऊस…
भिजवतो कसला-
विरघळवतो ;
कणाकणानं !….

हट्ट सोडते मग मी,
अन् झेलून घेते,
माझ्या दिशेनं धावत येणा-या
सरींचा आवेग…

मोकळ्या मनानं
कुरवाळून घेते,
हा काळजात घुसणारा वारा…

…अन् भिजून जाते चिंब…
वाहू देते स्वतःला,
या वाहत्या सरींत…

माहितीये मला-
की परतीचा आहे हा पाऊस…
निघून जाईल केव्हातरी-
कायमचाच !…

पण तरीही असा सर्वस्वात
भिनत राहतो तो,
की ढळतात सारे निर्धार….
पुसट होतात रेषा…

जीव ओवाळून टाकते मी आता,
या चार क्षणांवर…
उद्या नसतील
या सरी कदाचित ;
पण म्हणून जगणंच राहून जायला नको !

सांची कांबळे

 

 

170+
Posted on

द्वंद्व – पुजा नावडकर

16+

द्वंद्व 

सावळा मोहन तो तिथे
राधासंगे रास खेळी
कृष्णप्रित बांधूनी दोह्यात इथे
धुंद व्हावी मीरा सोवळी

रुसवी राधा फुलण्याकरता तिथे
हरी वाजवी मंजुळ बासरी
अन् मुक्या स्वरांवरच  इथे
नाचे वेडी मीरा बावरी

नटखट मनोहर तो तिथे
राधासवे रंगाची उधळण करी
पांढरा रंग पांघरूणी इथे
मीरा कुठल्या रंगला न वरी

राधा कृष्णासंगे तिथे
देवळात शेजारी उभी राहते
मीरा भक्ती कुसुमांनी इथे
देव्हार्यात केशवा पुजते

राधेच्या पैंजणाची रुणुझुणू तिथे
माधवास वेड लावी
मीरेची विणा मात्र  इथे
अबोल अन् मुकिच राही

माधवा सवे देवळात तिथे
राधा शांत शिल्प राहिली
मीरा आपले कृष्णप्रेम इथे
हवे तेव्हा दोह्यातून गाऊ लागली

पुजा नावडकर

 

16+
Posted on

चाळीतील जीवन- सुधाकर अशोक तळवडेकर

1240+

सूर्य उगवताच गावाकडे कोंबडा बांग देतो I
शहरातील या चाळीत घडाळ्याचा गजर जाग आणतो II1II

काही मंडळींच्या विचारांना फुटू लागतात फाटे I
मुलांच्या पाठीत बसतात त्यांना उठवण्यासाठी धपाटे II2II

उठल्यानंतर प्रत्येकजण घेतो हातात डबा I
शौच्यालायासमोर देखील असते गर्दी तोबा II3II

तेथेच काही माणसे आखत असतात दिवसभरातील योजना I
तर काही माणसे करत असतात ‘लवकर उरका’ अशा गर्जना II4II

प्रत्येकाच्या तोंडात असते कडूलिंबाची काडी I
घण घण घंटा वाजवत येते कचर्‍याची गाडी II5II

नळावर जाऊन बायका पाणी भरून आणतात I
सर्वांच्या नाश्ता जेवणाची सोय स्टोव्हवर करतात II6II

आंघोळ नाश्ता करून माणसे व मुले होतात जाण्यासाठी सज्ज II
ते निघून गेल्यावर चाळीत उरते फक्त महिलाराज्य II7II

दुपारचे जेवण आटपोनी बायका जामतात एकत्र I
निरनिराळ्या विषयांवर सुरू होते एक चर्चासत्र II8II

‘तुला माहितीय?’ या प्रश्नाने प्रत्येक विषयाला सुरवात होते II
बोलण्याच्या नादात प्रत्येक बाई तो विषय भलतीकडेच नेऊन ठेवतेII9II

याच चर्चासत्रात जन्म घेतात नवनवीन पाककला I
पदार्थ बनविण्याची कृती सांगताना होतो कठीण मामला II10II

पाककलेनंतर मोर्चा T.V. मालिकांकडे वळतो I
प्रत्येक मालिकेचा तेथे Repeat Telecast होतो II11II

जशी संध्याकाळी ऑफिसातील मंडळी घरी परतू लागतात I
तसे चर्चा संपवून बायकांचे पाय घराकडे वळतात II12II

ऑफिस संपवून नवरे घालतात मार्केटात गस्त I
रस्त्यावरची का होईना पण भाजी घेतात स्वस्त II13II

शाळेतून परतल्यावर काही मुले अभ्यासाला बसतात I
तर काही कपडे बदलून लगेच मैदानाकडे धावतात II14II

टारगट पोरे नाक्यावर बसून टवाळक्या करतात I
तर खोडकर पोरे घरातच दंगामस्ती करत बसतात II15II

ऑफिसातून परतलेली मंडळी ठळक घडामोडींचा आढावा घेतात I
तर दुसर्‍या दिवशी उगवण्यासाठी सूर्यदेवही अस्ताला जातात II16II

दिवसभरचा थकवा घालवण्यास निघते बाहेर पुरुषांची स्वारी I
बायका मात्र करत रहातात रात्रीच्या जेवणाची तयारी II17II

गच्चीवरती जमुनी सर्वजण अंथरतात फरशीवर मॅट I
नंतर एकजण काढतो खिशातून पत्यांचा कॅट II18II

पत्ते खेळताना ती माणसे गप्पांचा फड रंगवतात I
कधी कधी आपली दु:खे बाटलीतही बुडवतात II19II

मग घराघरातून निघतो जेवणचा सुंदर वास I
पत्ते फेकून प्रत्येकजण म्हणतो ‘अरे आता बास’ II20II

जेवताना देखील घरातच जमते गप्पांची मैफिल I
घरातील झाडून सर्वजण होतात त्यात सामिल II21II

दिवसभरातील सुखं-दु:खे सांगून करतात मन मोकळे I
मनावरचे ओझे हलके करून होतात आनंदी सगळे II22II

आनंदी होऊन सर्वजण अंथरुणावर अंग टाकतात I
दिवसभरातील थकवा विसरून निद्रेच्या आधीन होतात II23II

अशीच चालते चाळीतील माणसांची दिनचर्या I
एकत्र जमती सर्व माणसे कोणत्याही कार्या II24II

सण असो वा उत्सव असो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात I
भांड भांड भांडूनही सर्वजण संकटात मदतीला धावतात II26II

नवीन माणूस राहायला आल्यास त्याला अगदी घरच्यासारखे वागवतात I
चाळीत कोणावर अन्याय झाला तर सगळेच पेटून उठतात II27II

इतुके बोलूनी संपवितो मी माझे रामायण I
चालत राहते असेच या चाळीतील जीवन II28II

सुधाकर अशोक तळवडेकर 

 

1240+
Posted on

नशा- संदिप दोडमिसे

2+

नशा…काय असते बरं ही नशा?
तुम्ही म्हणाल दारू पिणं म्हणजे नशा
सिगरेट ओढणं म्हणजे नशा
प्रेमात पडणं म्हणजे नशा
पण खरं तर कविता करणं एक नशा आहे

हो मी कविता करतो
जगातली सगळ्यात मोठी नशा करतो
त्यात डुबतो, हरवतो, स्वतःला विसरून जातो
माझ्या एकटेपणाची साथीदार आहे ती
कारण कविता करणं एक नशा आहे

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट
माझ्याकडे एक मतला बनून येते
त्या मतल्याची एक सुंदर अशी ओळ बनते
मग सतत ती मनात घोंगू लागते, घुटमळू लागते
कारण कविता करणं एक नशा आहे

अशावेळी मग आपोआप हाताला
कवितेची तलब लागू लागते
हात अनावर होऊन लेखणीकडे पळू लागतात
हातात लेखणी येते अन कागदावर नशा उतरते
कारण कविता करणं एक नशा आहे

सुंदर मोत्यांची सुंदर अशी
अक्षरमाला कागदावर उमटते
जणू माझ्या मनाच्या वेदना अन माझं अस्तित्व
अशी ही कविता मला सतत सतावते
माझं भान हरवते, मला तडपवते
मला तिच्या दुनियेत खेचून घेते
माझा पोरकेपणा मिटवते
कारण कविता करणं एक नशा आहे…

संदिप दोडमिसे

 

 

 

2+
Posted on

तु गेलीस तरी……- कोमल गुंडू हुद्दार

7+

तु गेलीस तरी ……
आठवतेस तू
प्रत्येक क्षणात
साठतेस तू
आठवणींच्या सागरात
दाटतेस तू
ओढ्यावर,
गच्चीतील गप्पांवर
साक्ष असलेल्या
कट्यांवर
गुपितं सांगणार्‍या
त्या वृंदावनावर
आठवतेस तू
बोलत गेलेल्या त्या वाटांवर
घेऊन पोहचलेल्या त्या शेतांवर
नेऊन सोडलेल्या त्या काठांवर
आठवतेस तू
अगदी जशीच्या तशीच
जणु अत्ताच बरसल्या सरी
त्या आठवणीच ओल्या ओल्या चिंब
होऊन सारेच न्हाऊन गेले
अन् सांगु लागले काही कानांत
भुरभुर उडु लागले
पाखरासारखे
आठवणीत फक्त तुझ्या,
हे मन
वेळ ढकलत जाऊ लागले
परती त्याच वाटे
लागले
आठवण करुन देत राहीले
भासवत तु असण्याचा
करत राहीले
पण शेवटी फक्त मीच
उरत राहीले
मीच उरत राहीले
तु गेलीस तरी……
माझी मीच गुरफटत गेले
आठवणीत तुझ्या
अजुनही
आठवणीच गोळा करतेय
अजुनही
फक्त प्रयत्न तुला डोळ्यात
साठवण्याचा करतेय
पण मात्र शेवटी
आठवणच उरतेय……..
तुझी आठवणच उरतेय……….

कोमल गुंडू हुद्दार

 

7+
Posted on

काट्यांचा मार्ग- जागृती सारंग

4+

काट्यांचा मार्ग असला तरी हार तू मानू नको,
वळणा वळणाची असली तरी वाट तू सोडू नको..

किती सवाल ठाकतील उभे, प्रत्येकाचं तू दे उत्तर,
विचारांनी सारे मोहित व्हावे अशा शब्दांचं तू लाव अत्तर..

कितीही कठीण वाटलं तरीहि अशक्य असं काहीच नसतं,
प्राजक्ताच्या फुलांना स्वत:चं अस्तित्व माहित नसतं…

तळपत्या सुर्यासारखच सत्य कधी लपत नसतं,
गावभर उघडं हिंडून खोटं सुद्धा स्वत:चं खोटेपण जपत असतं…

लाजाळुच्या पानांसारखी नेहमीच तू लाजत रहा,
वाघीणीची दहशत ठेऊन गरज पडेल तेव्हा गर्जत रहा…

जागृती सारंग

 

4+
Posted on

आठवतं- ऋतुजा परदेशी

54+

अजूनही आठवतं
तुझं असणं आठवतं तुझं नसणं आठवतं
अचानक येणं आणि तस्संच जाणं आठवतं
फार फार बोलणं आणि बोलतानाच थांबणं आठवतं
..अजूनही आठवतं.

माझं अबोल अंगण आठवतं
तुझं बोलकं आभाळ आठवतं
माझं शब्द जपत जाणं आणि
तुझं वाहात राहणं आठवतं
अजूनही आठवतं!

संध्याकाळी प्राजक्ताचं ‘केशर’ होणं आठवतं
सुटता सुटता गाठींचंही अडकून राहणं आठवतं
पहाटेचे मोती अलगद निखळून जाणं आणि
तुझ्या डोळ्यांत त्यांचं चमकून जाणं आठवतं
..अजूनही आठवतं!

ऋतुजा परदेशी

 

54+