Posted on

दुष्काळ- अरविंदा राजधर भामरे

29+

मुठीत रक्त आवळून
यंदा ही नांगर चालवला.
डौलदार पिकांचे स्वप्न उराशी घेऊन,
तरी अभागी काळे ढग
नुसते रानमाळावर गर्जून गेले.

आता वासरांचे हंबरडे ऐकू येत नाही
स्मशान पडलेल्या गोठ्यावर!
मेंढरांची धुळीत पडलेली पावले,
दिसत नाही कुठे गाववाटेवर!!

थयथयाट करीत आहेत
जखमांचे थवे उजाडलेल्या उरांवर !
हयात सरली तळ पायातल्या
भेगा शिवून शिवून
सांजवातीला कुळवणारे हात
आता धावतायत शहराच्या वळणावर! !

कोणी विझलेल्या बिड्या वेचून वेचून
पुन्हा पुन्हा फूंकतोय
वेदनेचा धुर दिसू नये म्हणून,
कोणी उमलणा-या कळयांना
जगण्याचे आश्वासन देतोय
उध्वस्त बागेचं स्वप्न
त्यांनी पून्हा पाहू नये म्हणून! !

कोणी नक्षत्राचे श्वास
आभाळाकडून दान मागतोय
उपाशी मरण दारावर येऊ नये म्हणून. !!

चूल्हीवरचा तवा जळतोय नुसता
भाकरीचा आभास डोळ्यात साठवून
तरी या गावावर सूर्य उगवतो आहे
पून्हा पून्हा …..
अंधाराच्या छातीवर
आशेची किरणं उधळून! !

अरविंदा राजधर भामरे

 

29+