Posted on

साजण बोहल्यावर- अक्षय कट्टी

1646+

साजण बोहल्यावर नाही आज सरणावर चढलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
जातीसाठी नाही तर मातीसाठी लढला माझा साजण
मागुन सुद्धा असं मिळत नाही मरण
तिरंग्याचा अंतरपाट त्याच्या देहावर घातलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

शत्रूच्या गोळ्यांचा अलंकार त्याने केलाय
ऱक्ताच्या हळदीने देह पुनीत झालाय
वरमाईचा मान भारतमातेने घेतलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

वऱ्हाड्यांच्या डोळ्यात पाणी मांडव आहे शांत
अभिमान वाटतोय त्याचा आता मी का करु आकांत
अमर रहेच्या मंगलाष्टकांचा घोष वाढत चाललाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

त्याच्या नावचे कुंकु लावायचे स्वप्न मात्र राहुन गेले
लग्न न होताच विधवेचे जिणे सामोरे आले
देशप्रेमाचा खरा अर्थ आज तो शिकवुन गेलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

अक्षय कट्टी

 

1646+