Sale!

वर्तुळ: लपवलेल्या कथांचा संग्रह – अंजली जोगळेकर

200.00 150.00

‘वर्तुळ’ हा माझा पहिला कथासंग्रह. हा प्रकाशित होतानाचा आनंद, खरं तर अत्यानंद, मी शब्दांत मांडू शकणार नाही, कारण तो अवर्णनीय आहे. आपल्या पहिल्या वहिल्या यशाचं आपल्याला खूप अप्रूप असतं, तसं ते मलाही आहे.
मी लिहू शकेन असं कधी मला वाटलंच नव्हतं. शाळेत असताना मला निबंध लिहायला खूप आवडायचं. पुढे महाविद्यालयात असताना वाचायची प्रचंड आवड असल्याने अनेक चांगल्या लेखकांची पुस्तकं मी वाचत गेले. वाचून झालं की त्यावर विचार करायची मला सवय लागली. हे सगळं मनात कुठेतरी झिरपत गेलं असं मला वाटतं. आत्ता पाच वर्षांपूर्वी नवरात्रात सहज म्हणून लिहायला लागले. माझ्या आईबद्दल लिहिलेल्या माझ्या पहिल्या लेखाला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाला की त्यामुळे स्फूर्ती मिळून मी त्यानंतर सतत लिहीत गेले. ललित लेख, कविता आणि त्यानंतर कथा अशा क्रमाने लिखाण चालूच राहिले. वेगवेगळ्या विषयांवर लिहीत असतानाच माझ्या एका मैत्रिणीने (विनीता देशपांडे) मला कथा लिहून पाहायला सुचवलं. पहिली कथा (नशीब) मी लिहीली तेव्हा ती झरकन कागदावर उतरली. मला फार विचार करावा लागला नाही. त्यानंतरच्या कथाही अशाच सुचत गेल्या, मी लिहीत गेले. कथेचं बीज आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या समाजातच असतं. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक कथा असते असं मला नेहमी वाटतं. म्हणूनच कथा वाचताना यातील व्यक्तिरेखा आपल्या जवळपासच वावरताहेत असं तुम्हाला वाटू शकतं. कथेच्या माध्यमातून मी हळूहळू व्यक्त होत गेले. एखादी कथा लिहून झाली की मला समाधान मिळू लागलं, शांत वाटायला लागलं.
हळूहळू जेव्हा अनेक कथा लिहून झाल्या तेव्हा या कथांचे पुस्तक करण्याचा आमचा विचार सुरू असतानाच Bronato Publication च्या शैलेश खडतरे यांच्याशी संपर्क झाला. माझ्यासारख्या नवलेखिकेला पहिल्याच संवादात त्यांनी खूप चांगला व सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावेत ते समजत नाही. त्यांच्या प्रतिसादामुळे माझ्यासारख्या अनेक लेखकांना नक्कीच स्फूर्ती मिळेल. त्यांना खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावं हाच उद्देश या कथासंग्रहामागे आहे. यातून मिळालेले पैसे LEAF (LIFE EMPOWERMENT & AWARENESS FOUNDATION ) या महिला व मुलांसाठी काम करणाऱ्या NGO ला देऊन समाजकार्याला हातभार लावण्याचा माझा निश्चय आहे. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना वाचायला मला नक्की आवडेल. तुमच्या सूचना पुढील लेखनासाठी खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमचा प्रतिसाद नक्की पाठवाल याचा विश्वास वाटतो.
लिहिताना वेळेचं भान कधीच राहात नाही. मला सांभाळून घेणारे आणि मला लिहितं ठेवणारे माझे कुटुंब, माझा नवरा विश्राम, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या मुली मिताली व शुभांगी, सचिन, कुशल ही माझी मुले, माझ्या लेखनात सुधारणा सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणी मंजुषा देशपांडे, शुभदा दामले, बहीण जयंती नेने याशिवाय सतत प्रोत्साहित करणाऱ्या ‘प्रतिबिंब’ मधील माझ्या सख्या यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील.
माझी जाऊ आणि प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर हिनेही वेळोवेळी केलेल्या सूचना, सुधारणा आणि प्रोत्साहन यामुळे हे पुस्तक साकार होतंय. पण ती माझी मैत्रीण जास्त असल्याने तिच्या ऋणात राहणं मला आवडेल.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वर्तुळ: लपवलेल्या कथांचा संग्रह – अंजली जोगळेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *