Be the first to review “टॉमस आल्वा एडिसन: व्यक्ती आणि शोध – शंकर लक्ष्मण चिटणीस” Cancel reply
Sale!
टॉमस आल्वा एडिसन: व्यक्ती आणि शोध – शंकर लक्ष्मण चिटणीस
₹150.00 ₹120.00
माझ्या मते मुलांच्या मनावर चांगले संस्कार घडविण्याचे तसेच एकूणच समाजामध्ये ‘विवेक’ निर्माण करण्याचे उत्तम साधन म्हणजे थोर पुरुषांची चरित्रे. कविता, कथा किंवा कादंबऱ्यांपेक्षा चरित्रांचा याबाबतीत अधिक चांगला उपयोग होतो, असे माझे प्रांजळ मत आहे. अशा चरित्रांत निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या थोर व्यक्तींमध्ये शास्त्रज्ञ व संशोधक यांच्या चरित्रांना एक विशेष स्थान आहे. पण दुर्दैवाने जागतिक कीर्तीचे असे शास्त्रज्ञ व संशोधक भारतात थोडेच आहेत. परंतु शास्त्रज्ञ, संशोधक हे कोणत्याही एका विशिष्ट देशाचे नसतात. ते संपूर्ण मानव जातीचे असतात. सबब तुमच्या-आमच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या, तुमचे -आमचे जीवन बदलणाऱ्या पण भारतीय नसलेल्या संशोधकांची चरित्रे भारतीय भाषांमध्ये लिहून त्यांच्या खडतर तपश्चर्येला उजाळा देणे जरुरीचे आहे. याच दृष्टिकोनातून लेखक -पत्रकार माझे वडील दिवंगत शंकर लक्ष्मण चिटणीस यांनी थोर शास्त्रज्ञ टॉमस आल्वा एडिसन यांचे चरित्र लिहिले. ते १९८२ मध्ये प्रसिद्ध झाले. त्याला आता चाळीस वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे चरित्र पुन्हा एकदा पुस्तकरूपाने नवीन पिढीसमोर आणावे असे शंकर लक्ष्मण चिटणीस यांचा नातू अमेय गुप्ते याला वाटले. खरे तर, त्यानेच याबाबतीत माझ्याकडे सतत पाठपुरावा केला आणि अखेर हे पुस्तक प्रत्यक्षात साकारले.
टॉमस आल्वा एडिसन हे स्वतंत्र बुद्धीचे व स्वतंत्र वृत्तीचे गृहस्थ होते. बालपणी इतर मुलांप्रमाणे शाळेत त्यांचे रूढ अर्थाने शिक्षण झाले नाही. शाळेबद्दल त्याच्या संवेदनशील मनात अढी निर्माण होईल अशा काही घटनांमुळे टॉमसच्या आईने त्याला घरच्या घरीच शिकविले. यामुळेच की काय न कळे, टॉमसच्या स्वतंत्र बुद्धीला लहानपणीच वाव मिळाला व त्यातून त्याचा विकास कसा झाला, हे सर्व वर्णन या पुस्तकात कोणालाही कळेल अशा सुटसुटीत भाषेत आले आहे.
एडिसन यांच्या कार्याचा पसारा अफाट जे हाती घ्यावे त्यात आपली म्हणून सुधारणा घडवून आणावी किंवा अगदी नवीन अशा गोष्टींचे संशोधन करावे, याप्रमाणे त्यांनी आपले आयुष्य वेचले. अविरत श्रम करण्याची तयारी, झोकून अभ्यास व अनेक गोष्टींमध्ये रस आणि त्याकडे बघण्याची शास्त्रीय दृष्टी, हा एडिसन यांच्या यशाचा पाया होता. जोपर्यंत माणसे फोनोग्राफ ऐकत राहतील, चलत चित्रपट पाहतील, विजेच्या गाडीतून प्रवास करतील किंवा जगात कुठेही बटण दाबून विजेचा दिवा लावतील तोपर्यंत ती मानव जातीचे असामान्य मित्र टॉमस आल्वा एडिसन यांनी दिलेल्या देणगीचा उपयोग करीत असतील हे उघड आहे… आणि त्याचबरोबर त्यांची स्मृती सतत जागृत ठेवत राहतील हेही तितकेच खरे आहे.
असे हे ई-पुस्तक मी माझी आई इंदुमती शंकर चिटणीस हिच्या स्मृतीला अर्पण करत आहे. टॉमस आल्वा एडिसन यांच्या या आटोपशीर चरित्राचे वाचक चांगले स्वागत करतील, अशी माझी खात्री आहे.
– संजय चिटणीस
Reviews
There are no reviews yet.