संस्कार शिदोरी
₹250.00 ₹200.00
मी सौ. मृणाल महेश पेंडसे, माझे पहिलेवहिले पुस्तक ‘संस्कार शिदोरी’ आपणासमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी आपणास प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की, हे पुस्तक मी स्वत: लिहिलेले नाही तर ते संकलन आहे.
खरं तर हे काम माझ्या हातून घडण्यास कारण माझी मुलगी कु. प्राजक्ता आहे. माझे बालपण अलिबाग तालुक्यातील नारंगी या छोट्याशा खेड्यात गेले. माझे लग्नापूर्वीचे नाव कु. मनीषा वसंत जोशी. मी पदवीधर झाल्यावर कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी केली. नंतर माझे लग्न झाले व मी रोहा या गावी आले आणि मी थोडे दिवस कॉम्प्युटरपासून दूर राहिले. परंतु काही महिन्यांनी माझ्या घरी कॉम्प्युटर आला. मला कॉम्प्युटरची चांगली माहिती असल्यामुळे घरातील कामे उरकल्यावर वेळ मिळेल तेव्हा कॉम्प्युटरवर बसायचे.
दरम्यान प्राजक्ताचा जन्म झाला व पुन्हा एकदा कॉम्प्युटरपासून तिच्या संगोपनामुळे दूर राहिले. परंतु ती मोठी झाल्यावर माझ्या लक्षात आले की तिला खेळण्यापेक्षा पुस्तकांचीच जास्त आवड आहे. त्यामुळे मला असे वाटले की हिच्यासाठी आपण असे संकलन करूया की तिला आवश्यक ते सर्व ज्ञान व माहिती एकत्र मिळेल.
त्यामुळे घरातील कॉम्प्युटरवर श्लोक, स्तोत्रे तसेच इतर गोष्टी टाईप केल्या. मला माहीत असलेली व इतर माहिती जमा करून त्याचे एक अत्यंत उपयोगी संकलन तयार केले. या सर्व कामात मला घरच्या सर्व लोकांनी व माहेरच्यांनी खूप प्रोत्साहन दिले व मदत केली. या सर्व संकलनाची प्रिंट काढून मी प्राजक्तासाठी एक पुस्तक तयार केले. ते तिला इतके आवडले की ती सारखीच ते पुस्तक घेऊन बसायची. तेव्हा मनात विचार आला की हे पुस्तक मी जर प्रकाशित केले तर समाजाला त्याचा फार उपयोग होईल. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक पाहिले त्यांनी पण मला हे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रेमळ आग्रह केला. त्यात मला विशेष करून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे कै. प्रा. महेश भावे ह्यांचा. कारण त्यांची फार इच्छा होती की मी हे पुस्तक प्रकाशित करावे. कारण ही काळाची गरज आहे. दरम्यान मला दुसरी मुलगी कु. प्राची झाली व पुन्हा तिला शिकविताना मला या पुस्तकाची गरज असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली व आपोआपच हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा विचार नक्की झाला.
योगायोगाने पार्ले येथील कै. श्री. रा. ग. खासगीवाले यांनी त्यांचे पुण्याचे बंधू श्री. वामनराव खासगीवाले ह्यांच्याकडे मला पाठविले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे येथील घरकुल प्रकाशनचे श्री. विश्वास व सौ. विदुला पटवर्धन यांच्याकडे गेले. त्यांना ही कल्पना फार आवडली व त्यांच्या मदतीने ‘संस्कार शिदोरी’ आपणासमोर ठेवण्याची इच्छा प्रत्यक्षात आली.
ह्या पुस्तकासाठी श्री. दिनानाथ पाटील व सौ. विभा वा. दातार यांनी छान प्रस्तावना दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
मला खात्री आहे की हे पुस्तक वाचकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. माझी अशी विनंती आहे की ह्या पुस्तकाचा लोकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने-
पहिली आवृत्ती प्रसिद्ध करताना वाचकांच्या कितपत पसंतीस येईल अशी शंका मनात होती. परंतु वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे पहिली आवृत्ती कधी संपली ते कळलेच नाही. वाचक या पुस्तकाचा उत्तम उपयोग करून घेत आहेत हे बघून व वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे अल्पावधीतच दुसरी आवृत्ती काढण्याचा योग जुळून आल्याने मला अतिशय आनंद होत आहे.
सौ. मृणाल महेश पेंडसे
बी.ए. कॉम्प्युटर डिप्लोमा.
Reviews
There are no reviews yet.