Description
आपला देश फार विशाल आहे. त्याला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. या इतिहासात शेकडो राजेमहाराजे होऊन गेले आहेत. पण, राजा म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर दोनच राजांच्या प्रतिमा येतात. पहिली म्हणजे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व दुसरी म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज. शिवछत्रपती १७ व्या शतकात होऊन गेले. त्यानंतर त्यांच्याच वंशातील शाहू महाराज २०० वर्षांनी २० व्या शतकात झाले. पहील्या छत्रपतींनी मुस्लीम राज्यकर्त्यांच्या जुलमातून प्रजेला मुक्त राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून दिले; तर दुसर्या छत्रपतींनी हिंदूधर्मातील वैदीक पुरोहीतशाहीच्या जुलमातून प्रजेला स्वतंत्र करून सामाजिक स्वांतत्र्य निर्माण केले. पहिले छत्रपती स्वातंत्र्यवीर होते, तर दुसरे समतावीर होते.
राजकीय स्वांतत्र्यापेक्षा समाजात समता निर्माण करण्याचे कार्य अवघड होते. कारण, राजकीय स्वातंत्र्य काही लढायांनी मिळवता येते; पण शेकडो वर्ष रक्तात विषाप्रमाणे भिनलेली विषमता ही काही लढायांनी नष्ट करता येत नाही. त्यासाठी समाजात क्रांतीच घडवून आणावी लागते. अशी समाजक्रांती शाहू महाराजांनी घडवून आणली. वर्णभेद, जातीभेद, स्त्रीपुरूष विषमता, अज्ञान, दारीद्र्य, अंधश्रद्धा इ. हाडीमासी खोलवर गेलेल्या समाजरोगांशी सतत संघर्ष करून मागासवर्गीय, दलितपतीत, रयत, भटक्या-विमूक्त समाजांना त्यांनी अस्मिता, स्वाभिमान व प्रतिष्ठा दिली. माणसाला माणूस म्हणून जवळ करायला हवे, दलितपतीतांची सेवा म्हणजे देशसेवा होय, तोच खरा धर्म अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली.
राजा असूनही शाहू महाराज महारवाड्यात गेले, धनगरवाड्यात गेले, शेतकर्याच्या झोपडीत गेले. या सर्वांच्या सुखदु:खाशी समरस झाले म्हणून त्यांना लोकांनी ‘राजर्षी’ पदवी बहाल केली. इतिहासकारांनी त्यांना ‘लोकांचा राजा’, ‘रयतेचा राजा’ असे म्हणून त्यांचा गौरव केला. ते राजे असले, तरी लोकशाहीमध्ये त्यांचा लोकाभिमुख कारभार एक आदर्श मानला जातो.
शाहू छत्रपती हे भारतात एक नवे युग निर्माण करणारे राजे होते. शेती, शिक्षण, व्यापार-ऊद्योग, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी नवनवे प्रयोग केले. या देशातील सर्वात मोठे धरण त्यांनी बांधले. हरितक्रांतीची पहीली सूरूवात केली, गुळाची बाजारपेठ वसवली, कापड-गिरणी सूरू केली, देशातील सर्वात मोठे नाट्यगृह व सर्वात मोठा कुस्तीचा आखाडा त्यांनी बांधला, कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरला ‘मल्लवीद्येची पंढरी’ बनवले, अल्लादीयाखाँसाहेब यांच्यासारख्या कलावंतांना ऊत्तेजन देऊन या नगरीला त्यांनी ‘कलापूर’ बनवले. अशा किती गोष्टी सांगाव्यात!
अशा या बहुआयामी राजाचे चरित्र व विचार सर्वसामान्य माणसांच्या घरात जावेत, म्हणुन आम्ही हे छोटेखानी चरित्र लीहीले आहे. आमचे तरूण मित्र श्री. नवीनकुमार माळी यांनी स्वत:ला मोडी लिपीच्या प्रसाराला वाहुन घेतले आहे. त्यांनी हे शाहु चरित्र मोडी लीपीत आणण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यास संमती दिली. श्री. माळी यांनी मोडी लीपीचा फाँन्ट स्वत: तयार केला असून त्यांचा हा अभिनव प्रयोग आहे. या प्रयोगास मी शुभेच्छा देतो.
– जयसिंगराव पवार
दि.३० डिसेंबर २०१६
Reviews
There are no reviews yet.