Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar

100.00

गेली सुमारे 3 वर्षे quora.com सारखी समाजमाध्यमे किंवा वृत्तपत्रीय लेख आणि दूरदर्शनवर घडणाऱ्या चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा नैमित्तिक आढावा यातून आम्ही काही दखलपात्र प्रश्नांवर आधी चर्चा आणि मग त्या चर्चेच्या निष्कर्षांवर स्वतंत्र विस्तृत विवेचन अशा पध्दतीने वेळोवेळी काही लेख लिहून काढले त्यांचं हे संकलन वाचकांसमोर ठेवण्यास आम्हाला आनंद वाटतो.
या लेखांमधे कोणताही ठराविक असा विषय नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर सुसूत्र अशी विषय संगतीही नाही. ज्या प्रश्नासंदर्भात ही चर्चा होते किंवा मुद्दाम घडवून आणली जाते ते बऱ्याच अंशी quora.com सारख्या समाजमाध्यमातूनच विचारलेले असतात आणि याच माध्यमातून त्यांना कमीअधिक सुसंगत उत्तरेही मिळालेली असतात. या उत्तरांचाही संदर्भ आणि उपयोग या चर्चांमध्ये आणि पर्यायाने लेखनात होता.
श्रवण, वाचन, चिंतन, मनन, चर्चा याच्या पुढची पायरी ही लेखन असावी असा पूर्वसंकेत आहे. आणि त्या अर्थाने लेखन ही सर्वात कष्टप्रद, आणि सर्वात जास्त धोकादायक किंवा विध्वसंक कृती मानली पाहिजे. कारण एका व्यक्तीने कितीही तर्कशुध्द विचार करायचा ठरवला तरी मतभिन्नता निर्माण होतेच आणि लेखन हा तर्काच्या स्थितीशून्यतेचा पुरावाच असतो.
वाचनाची पर्यायाने संदर्भांची किंवा संदर्भ ग्रंथाच्या परिशीलनाची विपुलता प्रत्येक लेखनाची प्राथमिकता आहे पण या बाबतीत इथे त्याची कमतरता मान्य करताना हे लेखन कुठल्याही तऱ्हेने किंवा कोणत्याही अंगाने पूर्वप्रसिध्द मतांना छेद देण्यासाठी नसून चर्चेत सहभागी असणाऱ्यांच्या मतांचा किंवा निष्कर्षांचा फक्त लेखी स्मरणठेवा आहे. स्वतंत्ररित्या यापैकी प्रत्येक लेख हा निबंध प्रकारातच मोडेल कारण हा लेखकांचा दृष्टिकोन असून त्याला अनेक पैलू असू शकतात किंवा निरनिराळ्या कोनातून किंवा अगदी भिन्न अशा अर्थाने ही त्या बद्दल लिहिता आणि बोलता येईल आणि हाच असे लेख किंवा निबंध लिहिण्याचा हेतू आहे. ढोबळ अर्थापासूनसुरूवात करुन जास्तीत जास्त आक्षेपांचे जास्तीत जास्त निराकारण व्हावे असा यात आशावाद आहे. हा वाद किंवा खंडन नसून ज्या निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत त्याचे अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षित असे स्वरुप स्पष्ट व्हावे आणि त्यातून चर्चाविषयालाच नव्हे तर आणखी काही विषयांवर चर्चेला किंवा लेखनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. बव्हंशी निरीक्षणातून असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा मुळात विषयाचं किंवा प्रश्नांचच नीट आकलन न झाल्यामुळे अगदी स्वपातळीवर सुध्दा समाधानकारक अशा स्पष्टिकरणाचा उत्तरांमधे अभाव दिसून येतो. आमचा प्रयत्न हाच आहे की मुळात प्रश्न समजून घेण्यात आपण किती यशस्वी होतो याचं मोजमाप करावं याच विचारातून प्रत्येक प्रश्नावर आणखी उपप्रश्न आणि त्यावर आणखी आक्षेप आणि त्याची जास्तीतजास्त समाधानकारक (म्हणजे आमच्या मर्यादे पर्यंत) सोडवणूक हे चर्चेचे सूत्रच फक्त लेखांमधून पुढे नेले आहे.
लेखन, वाचन ह्या चिकाटीच्या आणि व्यासंगाच्याच गोष्टी आहेत पण अशा प्रकारे चर्चा, लेखन यातून आपण ही थोडाफार तर्कसंगत आणि तर्कशुध्द विचार करु शकलो तर त्यातून अधिक तपशील मिळवण्याची इच्छा होईल त्यातून अधिक सुसंबध्द असं आचरण घडू शकेल का? खुद्द आपल्या आचारविचारातील विसंगती कमी होईल का? इतरांच्या वर्तनातील विसंगतीची कारणमीमांसा लक्षात घेता आली तर तिच्याकडे क्षमाशील वृत्तीने नाही तरी किमान दुर्लक्षित नजरेने तरी पाहता येईल का? पूर्वग्रहदूषितपणा हा किती खोल पोचला आहे याचं भान आपल्याला येईल का? प्रत्येक प्रश्नात प्रत्यक्ष सोडवण्याचा भाग किती आणि समज नीट न झालेला असंबद्ध भाग किती? आत्मपरिक्षणातून आलेल्या निष्कर्षांची टोचणी सहन करण्याची क्षमता किती? पूर्व कल्पना आणि संस्कृतीची तर्कविसंगत, काळी किंवा गैरसोयीची बाजू मान्य करण्याची तयारी किती? हे आणि असे अनेक बेचैन करणारे प्रश्न स्वतःला पडावेत हा ह्या चर्चेचा आणि लेखांचा हेतू होता तो किती सफल झाला याचा आढावा घेऊन पुढच्या लेखांचा प्रपंच करावा इतपत ही प्रस्तावना म्हणजे खरतर साधं सरळ मनोगत आहे.
म्हणूनच ही लेखमाला म्हणजे कुणाचीही बाजू घेण्याचा किंवा कुणाच्याही मताचा उच्छेद करण्याचा आटापिटा नसून जो विचार आपण करु शकतो तो तसाच मांडू शकतो का? याची चाचपणी आहे.
– विश्वास गोपाळ लोंढे आणि अनंत विष्णू वेलणकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar”

Your email address will not be published. Required fields are marked *