मी पुन्हा येईन- साईनाथ टांककर
₹150.00 ₹100.00
मनोगत
आज ‘मी पुन्हा येईन’ हा ई-कवितासंग्रह तुम्हा वाचकांच्या हाती देताना खूप आनंद होतो आहे. कविता हे माझे पहिले प्रेम. २००९ साली ‘स्पर्श’ आणि २०१२ साली ‘मना-तले काही’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर काही काळ माझे कवितांकडे दुर्लक्ष झाले. मी कथा, एकांकिका, नाटक या साहित्यप्रकाराकडे वळलो. नाटकात कविता असायच्या पण मुक्तछंद कविता लिहिल्या जात नव्हत्या. त्यातही नोकरी आणि संसार यात लिहायला फार कमी वेळ मिळत होता.
मार्च महिन्यात अचानक करोनाचे संकट आले आणि घड्याळावर चालणारे आयुष्य थांबले. काही निवांत वेळ मिळाला आणि माझे मन जुन्या प्रेमाकडे वळले. या कवितासंग्रहातील ७०% कविता लॉकडाऊन काळात लिहिल्या गेल्या. आता प्रश्न होता त्या प्रकाशित करून रसिकांपर्यंत पोचवण्याचा. यादरम्यान जगाचे समीकरण बदलले. सिनेमा सिनेमागृहात नाही तर ऑनलाईन प्रदर्शित होऊ लागला. मिटिंग कॉन्फरन्सद्वारे होऊ लागली. त्यामुळे मी पुस्तक ऑनलाईन प्रकाशित करण्याचे ठरवले. यामुळे माझे ई-पुस्तक जगात जिथे कुठे मराठी रसिक आहे तिथे काही क्षणात त्यांना उपलब्ध होईल. त्यात मला Bronato.com चे सर्वेसर्वा शैलेश खडतरे आणि त्यांच्या टीमने मदत केली. अत्यंत कमी वेळात त्यांनी हे ई-पुस्तक प्रकाशित केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
मी कविता लिहिताना कठीण शब्द व गंभीर आशय घेत नाही. सोपे शब्द, साधी मांडणी, विषयातील विविधता व सामान्य माणसाच्या मनातील भावना यामुळे तुम्ही कविता वाचताना एकरूप व्हाल अशी अपेक्षा करतो. हे पुस्तक तुम्हाला निखळ आनंद देईल याची मला खात्री आहे.
आपल्या प्रगतीत आपल्या कुटुंबाचा खूप मोठा हात असतो. हे ई-पुस्तक मी माझ्या आई-बाबा व माझी मुलगी मन्वीला समर्पित करतो. मी पुन्हा येईन ह्या काव्यसंग्रहाला वाचताना वयाचे बंधन नाही. मराठी कवितांवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती या काव्यसंग्रहाशी जोडली जावी हीच माझी अपेक्षा आहे.
जर हा कवितासंग्रह तुम्हाला आवडला आणि मला अपेक्षित यश मिळाले तर तुम्हाला वचन देतो की नवा कवितासंग्रह घेऊन- ‘मी पुन्हा येईन’.
कवितासंग्रहाचा अभिप्राय नक्की कळवा.
– साईनाथ सुरेश टांककर
Reviews
There are no reviews yet.