Sale!

भुईचाफा- भक्ती काशिराम परब

150.00 120.00

लहानपणी कितीतरी लोकगीतं तोंडपाठ झाली होती. काही मालवणी बोलीत होती तर काही सरमिसळ शब्दांची होऊन मराठीत सिद्ध झालेली. पुढे शाळेत गेल्यावर पहिल्या इयात्तेपासून कवितांची ताला-सुरात गाणी होऊन मनातून ओठांवर आली आणि वर्गात साभिनय सादर करण्यात गंमत वाटू लागली. कवितेनं असा लहानपणापासूनच मनाचा गाभारा तृप्त केलेला होता. बी.ए.आणि एम.ए.ला मराठी साहित्याचा अभ्यास करताना हा पैस मग आणखी समृद्ध झाला.
साहित्याची आवड असल्यावर अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ कवींचे संस्कार आपल्या नकळत आपल्यावर होत असतात, पण कविता लिहिताना ती उत्स्फूर्त असावी, हा दंडक मी माझ्यापुरता घालून घेतला होता. तो मनापासून पाळला यापुढेही पाळणार आहे.
या कवितासंग्रहात मराठी, हिंदी आणि मालवणी अशा तिन्ही भाषांतील कविता आहेत. कारण तेच, इथे त्या त्या वेळच्या उत्स्फूर्त भावनेला महत्त्व दिल्यामुळे भाषेचं बंधनही ठेवलं नाही. या कवितासंग्रहातील कवितांचा काळ २००७ ते २०२० असा आहे. त्यामुळे यातील काही कविता अगदीच साध्या वाटू शकतात. पण कवितालेखनाच्या प्रत्येक टप्प्यावरील कविता यात समाविष्ट असाव्यात, हा विचार त्यामागे आहे. तसंच अलिकडे लिहिलेल्या कवितांपर्यंतच्या प्रवासात त्यांचीही सोबत हवीच नाही का… सुरुवात केली त्या वळणावर राहून स्वतःलाच पुन्हा पाहण्यातही एक वेगळा कस लागतो. तेही या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आजमावता येईल, असंही वाटलं.
या कवितांची गंमत म्हणजे यामध्ये व्यक्त झालेल्या भावनांना मोकळी वाट करून देताना भुईचाफ्याचा दरवळ त्यात असावा, अशी मनोमन आस होती. ती कितपत साध्य झाली हे सांगता येणार नाही. पण भुईचाफा आणि भुईचाफ्याचा दरवळच का, हे मात्र इथे सांगावसं वाटतंय.
कोकणात मार्च-एप्रिल महिन्याच्या दरम्यान भुईचाफ्याच्या फुलण्याची चाहूल लागते. त्याआधीच आई आठवण करून द्यायची. ‘भुईचाफ्याच्या फुलण्याची वेळ जवळ येतेय, त्याची जागा स्वच्छ करा, त्या जागी सडा सारवण करा, मगच भुईचाफ्याचे पांढरेशुभ्र कोंब दिसू लागतील.’ आणि अचानक एके दिवशी जादू व्हावी तशी लांबट पाकळ्यांची पांढऱ्या-जांभळ्या रंगाची फुलं आपलं मोहक हास्य दाखवत अंतरीच्या गंधाने वेडावून टाकायची. तो क्षण कधीच विस्मरणात जाणार नाही. कारण ती फुलं पाहिल्यानंतर होणारा आनंद वर्णन करणं फार कठीण आहे.
तसा आनंद आपल्या लेखणीतून वाचकाला व्हायला हवा, असंच कायम वाटत आलंय. त्यामुळे काव्यसंग्रहाचेही तेच शीर्षक असावं, असं वाटलं.
इतर साहित्यप्रकारांपेक्षा काव्य हा साहित्यप्रकार मला नेहमी कोड्यात टाकतो. या साहित्यप्रकारात स्वतःला शोधणं अजून सुरू आहे. महाविद्यालयात असताना माझ्या काव्यलेखनाचं मनापासून कौतुक करणाऱ्या विल्सन महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख आणि लेखिका डॉ. वसुंधरा तारकर बाईंची या क्षणी आठवण येतेय. ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांनी जवळ बोलावून दिलेला आर्शीवाद आणि त्यांना भेटले तो क्षण आजही मनात ताजा आहे. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना कविता सादर करताना पाहण्याचा योग दोनदा जुळून आला. त्याचबरोबर त्यांनी माझ्या कवितेच्या वहीवर दिलेल्या स्वाक्षरीचा क्षण माझ्यासाठी अनमोल आहे.
माझ्या लेखनाचं आजवर खूप कौतुक झालं. ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, ज्येष्ठ लेखक आणि माझ्या आजोबांच्या स्थानी असलेले अनंत भावे सर, ग्रुम अँड ग्रो या संस्थेचे सर्वेसर्वा, माध्यम तज्ज्ञ संजीव लाटकर सर, मला रेडियोवर पहिल्यांदा काव्यवाचनाची संधी देणारे आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, प्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भेटलेल्या साहित्यक्षेत्रातील मान्यवरांचे खूप आभार. या सर्वांमुळे माझ्या लेखनाला सकारात्मक ऊर्जा मिळाली. माझे कुटुंबीय, विल्सन महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही मनापासून आभार. बी.ए. आणि एम.ए च्या वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींचेही आभार.
२००९ पासून मिडियाच्या क्षेत्रात वावरताना काळासोबत बदलण्याला नेहमी प्राधान्य दिलं, त्यामुळेच ई-बुकच्या माध्यमातून हा कवितासंग्रह वाचकांपर्यंत पोहोचावा, अशी माझी इच्छा होती. त्याला देखणं आणि मूर्त रुप देण्याचं काम करणाऱ्या ब्रोनॅटो इ-बुक पब्लिशरचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर नवोदित आणि प्रसिद्ध लेखकांना सोबत घेऊन प्रभावी व्यासपीठ देणाऱ्या शैलेश खडतरे यांचे आभार.
‘तू ब्लॉग लिहितेस हे चांगलं आहे, पण तू तुझं लेखन प्रकाशित करायला हवं.’ असं मला पहिल्यांदा सांगणाऱ्या ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे यांनी कवितांचं कौतुक करतानाच या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांचे आभार.
लेखन करणाऱ्या प्रत्येकाला वाचकांपर्यंत पोहोचण्याची मनोमन इच्छा असते, माझी ही इच्छा या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहामुळे पूर्ण होत आहे, याचा आनंद होतोय.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भुईचाफा- भक्ती काशिराम परब”

Your email address will not be published. Required fields are marked *