Posted on

रामायण नव्हे, दक्षिणायन

2+

राम आणि सीता यांचा स्वतंत्र आणि वेगवेगळ्या हेतूने झालेला दक्षिण-प्रवास या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे इथे महत्त्व आहे ते घटनांना, पात्रांना नव्हे.
दक्षिणायन ची सुरुवातच वेगळी आणि आश्वासक आहे. राम/सीता किंवा रावण यांच्या जन्मापासून किंवा मोठ्या काही घटनेतून नांदी न होता ही कथा त्राटिकावधापासून आरंभ होते. कोवळ्या वयातली राम लक्ष्मणाची मनोवस्था अत्यंत तरलपणे चितारत, लेखिका त्या प्रदेशात घेऊन जाते.
राम-रावण संघर्ष केवळ महिलेसाठी नव्हे तर भूभागासाठी झालेला असण्याची शक्यता समर्थपणे व्यक्त होते. रामाच्या विचारशक्तीला दिलेले हे परिमाण अद्भुत आहे. एकदा गृहीतक मांडल्यावर त्याच्या प्रेमात पडून, मग वनवासाला पाठविले जाण्यासारख्या घटनेतही गृहितकाचे धागेदोरे घुसवण्यामुळे कथावस्तूचा पाया किंचित डळमळतो, आणि काही शंका निर्माण व्हायला सुरूवात होते. तरीही, भारत-लंका-दंडकारण्य यांचे भूरेखन (topography) सुस्पष्ट आहे. विशेष म्हणजे त्यासाठी नकाशा दाखवावा लागलेला नाही. युद्धासाठी मदत करणारे वानर, गृद्ध या मानवी जमाती दर्शवल्या आहेत आणि त्यामुळे पौराणिक कथा नव्हे तर इतिहास वाचत आहोत असा भास काही काळ होतो खरा.

चुंबकीय शक्ती असलेले शिवधनुष्य, प्रत्यक्ष शिव, रुद्र यांचे अस्तित्व यांबद्दल लेखिकेच्या ठोस संकल्पना मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत.

पात्र- आरेखन.

रावण हे पात्र रंगवताना लेखिकेने सत्य, वदंता आणि कर्णोपकर्णी प्रसृत होणाऱ्या कथा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या घटनेला लोकवाणी कशी वाकवून, विकृत करून सादर करते (उदा. सीतेच्या स्वयंवरात झालेली रावणाची फजिती) हे लेखिका सर्व घटना शक्यतेच्या पातळीवर आणून विशद करते.
रावण किती चांगला, किती वाईट; त्याचं नक्की काय योग्य होतं आणि काय अयोग्य हे इतक्या बारकाव्यानिशी आणि विस्ताराने खूप कमी ठिकाणी वाचायला मिळतं.

सीता
केवळ नायिका म्हणून अवास्तव महत्व देऊन अतिमानवी करण्याचा अट्टाहास लेखिकेने अजिबात केलेला नाही. एक राजकन्या ते युवराज्ञी ते तापसी या विविध स्तरांवर सीतेचे वागणे यापेक्षा काही वेगळे नसू शकेल , या कसोटीला खरे उतरणारे चितारलेले आहे.
सीतेच्या जन्मकथेबद्दल काही ठिकाणी ऐकायला मिळणारी एक थिअरी, शक्यता म्हणून शंभर टक्के यशस्वीपणे मांडली आहे. त्या अनुषंगाने काही पात्रे आणि घटना यांचा समावेश कथानकात केला आहे. भूमिकन्या म्हणूनच जगणारी सीता शेवटी भूमिकन्या म्हणूनच अस्त पावते. तिचे रहस्य केवळ काही व्यक्तींनाच ठाऊक राहते. पण म्हणून त्याची मांडणी आणि बांधणी कमअस्सल ठरत नाही.

राम
सीतेप्रमाणेच अतिनायक नसलेला परंतु भावभावना असलेला पण वेळेस युद्धतंत्र म्हणून न-आदर्श वागणारा राम इथे भेटतो. अ-नागर वस्तीबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांचं वैविध्य टिकवून त्यांना बरोबरीने कसं वागवता येईल याचा विचार करणारा राम.
लेखिका त्याच्या कोणत्याही वागण्याचं समर्थन देत बसत नाही. जे झालं असं- या खाक्यात बसणारी मानवी कथा हेच दक्षिणायनचं खंदं वैशिष्ट्य म्हणता येईल.

शूर्पणखा
राजकुमारी असलेली रूपगर्विता अशी शूर्पणखा आपल्याला भेटते. तिच्यासंबंधाने घडलेल्या घटनांना नागर-अनागर (/ राक्षस) वळण देऊन लेखिकेने संघर्षाचा आणखी एक पैलू पुढे आणला आहे. राक्षसी राजस्त्री असलेल्या शूर्पणखेचे वर्तन आणि मानवी राजपुरूष असलेला लक्ष्मण यांच्यातला घटनाक्रम त्यांची त्यांची मूळ प्रवृत्ती दाखवून देणारा आहे. तत्पूर्वी, सीता आणि शूर्पणखा यांच्या भेटीचा प्रसंग वाचनीय आहे.

निसर्ग-वर्णन

या कथेत जागोजागी विपुल निसर्ग वर्णने येतात. साध्या शब्दांत चित्रमय आणि तरीही कथेला पूरक वातावरण निर्मिती याबाबत लेखिकेचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. शरयू नदी असो, दंडकारण्य असो किंवा गौतम ऋषींचा आश्रम असो: त्यातली नित्यकर्मे अगदी त्या काळात नेऊन सोडतात. लंकेतलीही वर्णने त्या त्या भूभागातील रहिवाश्यांप्रमाणे बदलत राहतात. भव्यता, प्रतीकप्रचुरता यांचा लवलेशही नसणारी सुंदर शैली मनाला भावते.

‘दक्षिणायना’तला सर्वाधिक जमून आलेला आणि भिडणारा भाग आहे तो अहिल्योद्धाराचा. राम कोणी अवतार नव्हे, गौतम ऋषीच परंतु कोणी खूप पोच असणारा नव्हे तर संसाराला लागलेला आणि पत्नीचा स्वैराचार समजल्यावर तिला वाळीत टाकणारा ‘सामान्य मनुष्य’ आणि अहिल्या कोणी थोर साध्वी वगैरे नसून विवाहानंतरही प्रियकराची ओढ असलेली सामान्य स्त्री; अशा मानवी पातळीवरचा या सर्वांचा वावर आणि उद्धार म्हणजे शब्दशः स्वीकार इथे शैला बेल्ले उत्कृष्टपणे convincing घटना घडवण्यात यशस्वी झाल्या आहेत. रामाची माणूस म्हणून जगण्याची आणि इतरांनाही वागवण्याची प्रेरणा विश्वासार्हरित्या समोर येते. या अर्थाने शैला यांना कळलेला राम थोर आहे.

राम-सीता-लक्ष्मण यांनी अ-नागर वस्तीत राहणे , तिथे लोकांना शेतीसारख्या नवनवीन गोष्टी शिकविणे आणि त्यांचे उन्नयन करण्याचा प्रयत्न करणे हा सर्वस्वी नवा कथाभाग आहे. परंतु ते (वास्तव्य) सरळसोट झाले नसावे असे वाटते. बदलाला आव्हान देणाऱ्या शक्ती सर्व काळांत असतात. तशा त्या काळांतही दर्शवायला हव्या होत्या.

युद्धाचे प्रसंग व्यवस्थित उतरले आहेत. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, चमत्कार म्हणून हनुमानाने निलगिरी पर्वत उचलणे वगैरे प्रसंग थेट नाकारलेले आहेत. एक घटना म्हणून आवश्यक तितकीच जागा यु्द्धाला मिळते.

शेवटी मात्र, शेवट करण्याच्या किंचित घाईमुळे उत्कृष्टपणे रचत आणलेला डोलारा काहीसा डळमळतो. रावणवधानंतरच्या घटनांमध्ये आणि त्यांच्या कथनामध्ये काहीही नावीन्य राहत नाही. मात्र हे केवळ गालबोट म्हणता येईल.
एकूणच, दक्षिणायन हा एक छान वाचनानुभव आहे.

१९९४साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक ग्रंथालीने छापलं आहे.

© Dr Amar Powar

2+

2 thoughts on “रामायण नव्हे, दक्षिणायन

  1. Hard copy of Dakshinayan available?

  2. where can i get this book?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *