
कविता हा तसा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच कवींना मानसन्मान देणं, कविसंमेलनाला गर्दी करणं, मनमुराद दाद देणं हे मराठी साहित्यक्षेत्रात नवीन नाही. कविता लिहिणं व लिखित-मौखिक माध्यमातून ती रसिकांपर्यंत पोहोचवणं हे मराठी साहित्यात गेली अनेक वर्षं घडतंय.
कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रिकुटाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता सर्वदूर पोहोचवली. त्यानंतरच्या पिढीतही अरुण म्हात्रे, अशोक बागवे, सौमित्र, नलेश पाटील, अशोक नायगावकर यांनी कवितावाचनाचे अनेक कार्यक्रम केले.

मराठी काव्यवाचनाची हीच परंपरा पुढे नेण्याच्या हेतूने पेशाने शिक्षक व कवी असणाऱ्या संजय शिंदे यांनी आपल्या काही तरुण मित्रांना सोबत घेऊन दोन वर्षांपूर्वी अष्टगंध ही कला संस्था स्थापन केली आणि मु.पो.कविता नावाचा काव्यवाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम मराठी रसिकांसमोर आणला.
मराठी कवितेतले वेगवेगळे काव्यप्रकार, वेगवेगळ्या आशयाची कविता, जुन्या-नव्या पिढीच्या दर्जेदार कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट साध्य करत मु.पो.कविता कार्यक्रमाचे आजवर एकूण १३ प्रयोग झाले. आजवर एकूण ६५ कवींनी मु.पो.कविता कार्यक्रमातून आपल्या विविधांगी कविता सादर केल्या. या कवींमध्ये सतीश सोळांकुरकर, संजय चौधरी, प्रसाद कुलकर्णी, भगवान निळे, अन्वर मिर्जा, संगीता अरबुने, अनुराधा नेरुरकर, योगिनी राऊळ, छाया कोरगावकर, भाव सुधा, रेश्मा कारखानीस, सुधीर मुळीक, प्रशांत वैद्य, गोविंद नाईक, गणवेश नागवडे, सदानंद बेंद्रे, जनार्दन म्हात्रे, मंदार चोळकर, समीर सावंत, सतीश दराडे,सायमन मार्टिन, साहेबराव ठाणगे, गणेश नागवडे, जयदीप जोशी, प्राजक्त देशमुख, वैभव देशमुख, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, अशा दिग्गज कवींचा समावेश आहे.
बदलत्या काळाची स्पंदने अचूकपणे टीपणाऱ्या तरुण पिढीतील गजानन मिटके, पंकज दळवी, प्रथमेश पाठक, जयेश पवार, गीतेश शिंदे, सचिन काकडे, विजय बेंद्रे, प्रवीण खांबल, उमेश जाधव, गुरुप्रसाद जाधव, अमोल शिंदे, केतन पटवर्धन, यामिनी दळवी, शिल्पा देशपांडे, पूजा भडांगे, स्वाती शुक्ल, पूजा फाटे, राधिका फराटे, प्रथमेश तुंगावकर, विजय उतेकर, आकाश सावंत, शशिकांत कोळी, बंडू अंधेरे, सूरज उतेकर, आनंद रघुनाथ, जितेंद्र लाड, विशाल राजगुरू, सुशांत खुरसाळे, सत्यजित पाटिल, श्रीपाद जोशी, प्रशांत केंदळे, भालचंद्र भूतकर यांनीही मु.पो.कविता कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या आहेत.

आज मराठीत अनेक कवीसंमेलने होतात. पण कवी, त्यांच्या कविता, कार्यक्रमाची बांधणी, सजावट या बाबतीत या संमेलनांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. कवीला अत्यंत शांत वातावरणात, तन्मयतेनेे स्वतःची कविता सादर करता यावी व रसिकांना तितक्याच तन्मयतेने, एकाग्रतेने तिचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने कार्यक्रमाचा दर्जा टिकवण्याचं आव्हान मु.पो.कविता या कार्यक्रमाने गेल्या १३ प्रयोगापर्यंत लीलया पेललेलं आहे.
जयेश पवार, रोहन कोळी, प्रवीण लोहार, विशाल पाटिल, अभिजीत तर्फे, सुभाष पवार, सुधीर मुळीक, अभिजीत डोंगरे, शिवकुमार, मनोज, विजय, अमोल या टीमने आजवर या कार्यक्रमाचं नेपथ्य, प्रकाशयोजना, छायाचित्रण व दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व जबाबदारी आत्मीयतेने सांभाळली आहे .

कविसंमेलनाच्या इतर कार्यक्रमासारखा एकसूरीपणा या संमेलनाला येवू नये व वेगवेगळ्या स्वरूपात मराठीतली दर्जेदार कविता रसिकांपर्यंत न्यावी यासाठी संस्थेने ‘कविता लोभसवाणी’ व ‘एका कवीच्या दुःखाचे भाषांतर’ हे दोन वेगळे कार्यक्रम केले. कविवर्य अशोक बागवे, नाटककार प्रेमानंद गज्वी, कवी किशोर पाठक हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मु.पो.कविताच्या सर्व कार्यक्रमाचे निवेदन ही संकल्पना ज्यांना सुचली ते कवी संजय शिंदे स्वतः करतात. सर्व कवींचा परिचय देऊन, त्या कवींच्या कवितांचे काही निवडक, प्रभावी तुकडे सादर करत अत्यंत दिलखुलासपणे संजय शिंदे या कार्यक्रमाचं निवेदन करतात.
मु.पो.कविताने इथून पुढेही रसिकांना कवितेची मेजवानी सातत्याने देत राहावी हीच सदिच्छा !!