अनेकांनी नागराज मंजुळेंचा फॅंड्री पाहिलेला आहे. फॅंड्रीमुळेच मंजुळे महाराष्ट्राला परिचित झाले. फॅंड्रीच्या यशानंतर त्यांचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सैराट हा फॅंड्रीपेक्षा खुप वेगळा होता. सैराटबद्दल अनेकांचे मिश्रीत मत होते. पण या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आणि मराठी चित्रपट करोडो रुपयांचा धंदा करु शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले. रसिक बर्याचदा कलाकाराच्या कलाकृतीच्या माध्यमातून कलाकाराचे मन वाचण्याचा प्रयत्न करतात. सैराट आणि फॅंड्री हे दोन विरुद्धार्थी चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मंजुळेंचं मन काही कळत नाही. तरी दोन्ही चित्रपट हे समाजातील उच्च आणि खालच्या स्तारातील लोकांमधील संघर्षाबद्दल आहेत. पण जसा उच्च समाजाला आपल्या उच्चपणाबद्दल अभिमान किंवा अहंकार बळावू लागतो.
तसाच खालच्या समाजाला आपण उच्च नसल्याबद्दल कमकूवतपणा आणि न्यूनगंड वाटू लागतो. या दोन्ही गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात बळावू लागतात की दोघांमधील दरी विकोपाला पोहोचते. मुळात उच्च कोण आणि खालचे कोण? हा समज सर्वच समाजात आहे. जसे एखाद्या कंपनीत मालक उच्च असतो आणि शिपाई खालच्या दर्जाचा असतो. ही भावना दोघांच्याही मनात असते. ही भावना विकोपाला गेली की त्यातून अहंकार आणि न्यूनगंड जन्माला येता. मग हा अहंकार आणि न्यूनगंड वर्षानुवर्षे पोसले जातात आणि त्यातूनच पुढे उभे राहते ते बंड. म्हणून आपल्याला कुठेतरी वाटून राहतं की कवी मनाचा हा दिग्दर्शक एका विशिष्ट हेतूने कलाक्षेत्रात उतरला आहे. अर्थात हे चूकीचंही असू शकतं. पण नागराज मंजुळेंनी लिहिलेला कविता संग्रह मी वाचला आणि मला असं वाटू लागलं की हे कदाचित सत्य असावं.
आपण जे भोगतो, जे सहन करतो त्याचे व्रण घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपला भूतकाळ सदैव आपल्या सोबत राहतो. जर आपण कलाकार असू तर आपल्यावर आणि आपल्या भिवतालच्या समाजावर घडलेल्या आघातांचे वर्णन आपण करतोच. मग कुणी म्हणतं की आपण योग्य आहोत आणि कुणी म्हणतं आपण अयोग्य आहोत. पण कलाकार योग्य-अयोग्यासाठी लिहित नाही. कलाकार केवळ समाजाचा आरसा होतो. स्तुती आणि टीका या पल्ल्याड कलाकाराचे वास्तव्य असते. तिथपर्यंत पोहोचण्याचा रसिकांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आपण कलाकृतीला लेबल लावणे बंद करु. मला दलित साहित्य, मुस्लिम साहित्य हे असले प्रकार कधीच पटले नाही. साहित्य हे साहित्य असते. हार फार तर आपल्याला साहित्याचे विभाजन भाषेच्या आधारावर करता येईल. मराठी साहित्य हिंदी साहित्य इ. असो. आपण मूळ विषयाकडे य़ेऊया.
उन्हाच्या कटाविरुद्ध हा काव्य संग्रह आपण मुखपृष्ठापासूनच वाचण्यास प्रारंभ करतो. मुखपृष्ठावर नागराज मंजुळेंचा धीरगंभीर फोटो आहे. तो फोटो वाचून झाल्यावर आपण आतमध्ये डोकावतो आणि पहिलीच कविता आपण वाचतो;
माझ्या हाती
नसती लेखणी
तर…
तर असती छिन्नी
सतार… बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसत राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला.
इथूनच कवीचं मन उलगडायला सुरुवात होते. कवी किंवा लेखक जेव्हा लिहितो. म्हणजे तो काय करतो? तर तो मोकळा होतो. त्याच्या आत जे साठलंय, त्यास वाट करुन देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे लेखणी. कवीच्या मनाच्या आत प्रचंड कोलाहल माजलाय. पण हा कोलाहल समाजाने लादलेला आहे. कवीच्या भोवताली घडणार्या घटनेने कवी अस्वस्थ आहे आणि या घटनांचा आणि घटकांचा समाचार घेण्याचा, या विरुद्ध बंड पुकारण्याचा, विद्रोह करण्याचा त्याला केव्हाच एक मार्ग सापडलाय, तो मार्ग म्हणजेच लेखणी, कलाकृती. तुझ्या येण्याअगोदर एक पत्र या कवितेत कवी लिहितात,
माझय दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा
माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत
बनियान टॉवेलातला मी
आमची कण्हतधुपत पेटणारी चूल
काळाकुळकूळीत चहा
आमचं ऑल इन वन घर
…हे सारं तुला किळसवाणं वाटल्याची खूण
तुझ्या डोळ्यांत पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन.
मुंबई सारख्या शहरात राहिल्यामुळे आणि दहा बाय दहाच्या घरात राहत असल्यामुळे मी या कवितेतल्या भावना समजू शकतो. प्रेम ही एक दिव्य भावना आहे आणि गरीबी एक विदृप वास्तव. प्रेम आणि गरीबी एका ठिकाणी सहसा नांदत नाही. म्हणूनच कवी पुढे म्हणतो की,
ती रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत
अंकुरणार नाही
आणि मला बोन्साय होणं मान्य नाही.
तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा
एक नवी सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला
कधीतरी दिवस जातीलच…
कोमेजलेल्या प्रेमफुलाचं दुःख साजरं करताना कवीला फुलण्याची सुद्धा आशा आहे आणि हिच आशा माणसाला जीवंत ठेवते. हेही दिवस जातील. आपलेही दिवस येतील या एका आशेवर माणूस श्वास घेत असतो. अ आणि ब या कवितेत प्रतिकात्मकतेने कवी खूप काही सांगून जातात. एक भयाण वास्तव कथून जातात,
अ.
जाहिरातीसाठी
द्यायला
हरवलेल्या माणसांचाच
घरात नसतो
एकही फोटो.
ब.
ज्यांचा
घरात
एकही नीटसा फोटो नसतो
अशीच माणसं
नेहमी हरवतात.
आपण किती मोठमोठ्या गोष्टी करत असतो. मुंबईचं शांभाय, भारत महासत्ता वगैरे वगैरे. पण आपण कधी मातीत नागड्या पायाने व उघड्या डोळ्याने चालून का नाही पाहत? का सत्य समोर आल्यावर आपण सगळेच गांधारी बनून जातो? किती किती प्रश्न शिल्लक आहेत आपल्या देशात, या जगात. पण आपण सारे त्या प्रश्नांची उत्तरे न शोधता त्यांना तुडवत पुढे जातोय.
नागराज मंजुळे त्यांच्या वास्तववादी सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविताही तशाच आहेत. वास्तववादी… पण माझ्यासाठी ते वास्तववादी असलंच पाहिजे असं नव्हे. कारण मी (मी म्हणजे सर्व वाचक) वेगळा आहे, माझे दुःख वेगळे आहेत. ज्यांच्यावर मला आसूड ओढायचंय ते वेगळे आहेत. पण यातील भावना त्याच आहेत. जनगणनेसाठी या कवितेत ते लिहितात,
जनगणनेसाठी
स्त्री-पुरुष असा
वर्गवारीचा कागद घेऊन
आम्ही गावभर
आणि गावात एका
अनवट वळणावर
भेटलं चार हिजड्यांचं
एक घर
हे सत्य असलं तरी आता ही परिस्थीती हळू हळू बदलतेय. या आधुनिक युगात या पंथालाही स्थान मिळत आहे. असो.
विद्रोही कवी कसे तयार होता? मुलात मी सुरेश भट आणि नारायण सुर्वे वाचल्यामुळे मला विदोही कवींच्या वेदना ठाऊक आहेत. तशाच वेदना मंजुळे व्यक्त करताना लिहितात,
एकसारख्या प्रकृतीचे
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न घेऊन
जगणारे.
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली.
विद्रोही कविता अशाप्रकारे जन्माला येतात. आपल्याला वाटत राहतं की हे संस्कृतीवरचे आक्रमण आहे. ते असतेच मुळी. पण एखाद्यासाठी असलेली संस्कृती दुसर्याच्या दुःखाचे कारण बनता कामा नये. पण आजकाल तुम्ही हिंदू संस्कृतीच्या हिरोधात लिहिलं की तुम्हाला विद्रोही किंवा बंडखोर अशी पदवी मिळते. पण हिंदू संस्कृतीनेही बरेच काही सोसले आहे आणि मी त्या संस्कृतीचा पाईक आहे. म्हणूनच मी गानराज मंजुळेंची स्तुती करु शकतो. त्यांच्यासाठी माझे प्राणाहून प्रिय शब्द खर्च करु शकतो. ज्या संस्कृतीच्या विरोधात मंजुळे बंड पुकारतात त्याच संस्कृतीने हे संस्कार माझ्यावर केले आहेत. मला हे लिहिण्याचा अधिकार प्राप्त होतो कारण ज्या संस्कृतीने त्यांना शूद्र ठरवले त्याच संस्कृतीने मलाही शूद्र ठरवले. ते उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितेत लिहितात,
ह्या सनातन बाहेरख्याली उन्हाला घाबरुन
तू का होते आहेस
एका सुरक्षित खिडकीतील भोभिवंत बोन्साय
अन लाचारपणे मागतेयस सावली.
पुढे यच कवितेत ते लिहितात,
का तू उन्हाच्या कटाविरुद्ध
गुलमोहरासारखं
त्वेषानं फुलत नाहीस.
ज्या सनातन संस्कृतीने मला प्रेम दिले, आधार दिला. त्याच सनातन संस्कृतीने मंजुळेंच्या मनाला मात्र वेदना दिल्या. हे असं का झालं? सारवरकर म्हणाले होते हिंदूंमधील शेवटची जात कोणती हेच कळत नाही. प्रत्येक जातीला आपण कोणातरी जातीपेक्षा उच्च आहोत असे वाटत असते. हे सावरकरांचे विधान किती तंतोतंत खरे आहे. ते म्हणायचे, उच्च वर्णीयांप्रमाणे तुमचाही हिंदू धर्मावर तितकाच अधिकार आहे. असो.
मी असा अश्रद्ध या कवितेतील या ओळी मला अधिक भावल्या,
अजूनही पूजाप्रार्थना वगैरे
करीत असशील तर…
तू त्याच्याकडे
आणखी एका जन्माचा हट्ट धर
मी मात्र मरेन
फक्त विश्वास ठेवून तुझ्यावर.
श्रद्धा अशीच तर जन्माला येत असते. श्रद्धा प्रेमातूनच जन्माला येते. मग कदाचित प्रेमाची जागा भयाने व्यापत असेल. अश्रद्ध माणूस मुळात खरा श्रद्धाळू असतो. कारण या जगात श्रद्धा नाही यावर त्याची श्रद्धा असते. ती श्रद्धा श्रद्धाळू माणसापेक्षाही खरी असते.
या पुस्तकातील सर्वच कविता वाचनीय आहेत. पुस्तक लहान आहे म्हणून एका बैठकीत वाचून पूर्ण होते. यातल्या कविता इतक्या वास्तववादी आहेत की आपल्याला काल्पनिक चंद्र सुर्य तार्यांच्या दुनियेत रममाण करण्यास बंदीच आहेत. मी कुणी मोठा जाणंकार नाही नाही. परंतु नागराज यांनी चित्रपट क्षेत्रासोबत साहित्य क्षेत्रातही योगदान दिले पाहिजे असे मला वाटते. कारण त्यांचा विद्रोह का कुणास ठाऊक कवितेतून अनुभवासा वाटतो.
कवितेच्या पुस्तकाबद्दल एक बरे असते. कोणतेही पान उघडून वाचता येते. मात्र आयुषयचं तसं नसतं. आयुष्याची पानं तो विश्वेवर म्हणा किंवा प्राक्तन म्हणा किंवा तुम्ही नास्तिक असाल तर एकवेळ त्यास काही नाव देऊ नका. पण आयुष्याची पाने आपण पलटवत नाही हेच खरे. कुणीतरी एक अद्रूश्य हात असतो. कोण? कुठचा? ठाऊक नाही. पण आहे मात्र… कदाचित तोच रचत असेल उन्हाचा कट आणि मग त्याच्याच इच्छेने असे असंख्य नागराज मंजुळे या कटाविरुद्ध पेटून ऊठत असतील. हे जर खरं असेल तर असे कट त्याने जरुर रचावे आणि निर्माण करावे शेकडो नागराज मंजुळे… आम्ही रसिक वाचक त्या उन्हाच्या कटाचे ऋणीच राहू…
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
मूळ लेख वाचण्यासाठी- http://www.jayeshmestry.in/unhachya-kataviruddha-nagaraj-manjule/