चित्रपट हे माध्यम फक्त मनोरंजनात्मक न राहता ते प्रबोधन करताना दिसते. प्रगल्भ झालेला प्रेक्षक चित्रपटाकडे अभ्यासात्मक भूमिकेतून पाहत असतो. चित्रपट हे माध्यम दृक-श्राव्य असल्याने त्याचा प्रभावी परिणाम समाजातील विविध घटकांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या होतो. साहित्यातील कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथने, नाटके आदि साहित्य प्रकारावर सतत चित्रपटांची निर्मिती होत आहे. साहित्य आणि चित्रपटांच्या कक्षा प्रचंड रुंदावल्या आहेत. ठराविक प्रदेशाचाच विषय, ठराविक प्रदेशाचीच प्रमाणभाषा साहित्यनिर्मितीसाठी न वापरता शहरी, ग्रामीण, दलित, भटके, आदिवासी या समाजातील भणंग लोकजीवन, त्यांच्या परंपरा, त्यांचा व्यवसाय, त्यांची बोलीभाषा यांचे चित्रण साहित्यातून सतत मांडले जातात. परंतु चित्रपटांमध्ये अशा आशयाच्या त्या – त्या समाजातील बोलीभाषा आणि व्यवसाय यांचे चित्रण खूप कमी प्रमाणात दिसते. दिग्दर्शक हा खूप चांगला वाचक व समीक्षक असतो. साहित्यप्रकारातील विविधांगी विपुल वाचन तो करत असतो. दिग्दर्शकाला त्या साहित्यकृतीतील जाणिवा, संघर्षाचे चित्रण, वेगळ्या अंगाने व निराळ्या भूमिकेतून मांडलेला विषय, ज्वलंत प्रश्न, वास्तव घटना आशा स्वरूपातील लेखन चित्रपटनिर्मितीसाठी खुणावत असतात. अशा सकस आणि दर्जेदार साहित्यकृतींचे निर्माते व दिग्दर्शक चित्रपटांमध्ये माध्यमांतर करतात. साहित्याच्या निर्मितीनंतर फक्त सुशिक्षित वर्गच त्या साहित्याचे वाचन करू शकतात. ही साहित्यनिर्मितीची मर्यादा होय, परंतु त्याच साहित्यकृतीचे चित्रपटात माध्यमांतर झाले तर निरक्षर ते समीक्षकांपर्यंत त्या लेखकाचे विचार व दृष्टिकोन पोहोचविता येतो. किंवा वाचक व प्रेक्षक त्या साहित्यकृतीला चित्रपटांच्या माध्यमातून अनुभवू शकतात. साहित्यकृती पेक्षा चित्रपटाचे प्रेक्षक, अभ्यास अधिक असतात. म्हणून लोकप्रिय आणि चांगल्या साहित्यकृतीवर दर्जेदार चित्रपट बनविण्याची मोठी जबाबदारी दिग्दर्शकावर येते. चित्रपटांमध्ये पात्रे, संवाद, संगीत, प्रकाशयोजना, इत्यादींच्या साहाय्याने चित्रपटांची कथा, पटकथा एक सलग दृश्यांचा पट जिवंत अनुभव प्रेक्षकांना देते. म्हणून प्रेक्षकांच्या मनावर चित्रपटांतून मनोरंजन व प्रबोधन करणे सोयीचे होते. एक चित्रपट इतर भाषेमध्ये माध्यमांतरीत होत असेल तर त्याचा प्रेक्षकांवर प्रभाव जाणवतो. आज जुन्या गीतांचे, चित्रपटांचे रिमिक्स हिंदी चित्रपटांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. चित्रपटातील तोचतोपणा प्रेक्षकांना समीक्षकांना खूप काही नवीन देऊ शकत नाही. म्हणून आज दर्जेदार कथा-पटकथांची गरज दिग्दर्शकाला भासते. ही गरज एखाद्या साहित्यकृतीतून देखील दिग्दर्शक पूर्ण करत असतो. अनेक साहित्यातील कलाकृतींवर दर्जेदार चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. डॉ. राजेंद्र थोरात यांनी ‘कुंकू ते दुनियादारी’ या ग्रंथाच्या माध्यमातून साहित्य आणि चित्रपटांची वाटचाल अधोरेखीत केली आहे. साहित्य आणि चित्रपटातील वेगवेगळ्या समाजजीवनातील निवडक अनुभव या कलाकृतीत प्रामाणिकपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कादंबरी ते सिनेमा पर्यंतचा प्रवास या ग्रंथामध्ये संशोधनात्मक पद्धतीने सांगितलेला आहे.
ह ना आपटे यांच्या कोरेगाव येथील सत्य घटनेवरील न पटणारी गोष्ट या कादंबरीवर १९३७ मध्ये व्ही शांताराम यांनी ‘कुंकू’ या सिनेमातून सामाजिक विषयावर भाष्य केले आहे.साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित १९५३ मध्ये आचार्य अत्रे यांनी आईची महती ‘श्यामची आई’ या चित्रपटातून साने गुरुजी यांची आत्मकहाणी सांगितली आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीवर १९९५ मध्ये अमोल पालेकर यांनी ‘बनगरवाडी: एक भिंती नसलेले गाव’ नावाचा सिनेमा प्रदर्शित केला त्यातून धनगरांचे लोकजीवन प्रतीत होते.
गो.नी.दांडेकर यांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर जब्बार पटेल यांनी १९७७ मध्ये ‘जैत रे जैत’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात ठाकर समाजातील धाडशी व संघर्षशीलतेची कहाणी प्रदर्शित केली आहे.हा चित्रपट कसा ‘संगीतमय’ आहे याचे विवेचन डाॅ.राजेंद्र थोरात यांनी केले आहे.साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या वैजयंता या कादंबरीवर १९६१ मध्ये गजानन जागीरदार यांनी ‘वैजयंता’ या चित्रपटातून तमाशा कलेतील वास्तव प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केले आहे.शांता गोखले यांच्या रीटा वेलिणकर या कादंबरीवर आधारित २००९ मध्ये रेणुका शहाणे यांनी ‘रिटा’ या चित्रपटातून समाजव्यवस्थेने स्त्रीला स्त्री म्हणून कसे उपेक्षित ठेवले. पारंपारिक व्यवस्थेमध्ये स्त्रीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत स्वतःकडे बघण्याचा अँगल बदलला पाहिजे असा संदेश दिला आहे.
चारुता सागर यांच्या दर्शन कथेवर तसेच राजन गवस यांच्या भंडारभोग व चौंडकं या कादंबरीवर आधारित २००९ मध्ये संजय पाटील व राजीव पाटील यांनी ‘जोगवा” या सिनेमातून जोगते – जोगतिणींच्या आयुष्यातील विदारक वेदनांचे चित्रण केले आहे. अजय-अतुल यांच्या संगीतामुळे हा सिनेमा अफाट लोकप्रिय झाला. आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीवर आधारित २०१० मध्ये रवी जाधव यांनी नटरंग हा सिनेमा प्रदर्शित केला. तमाशातील कलावंतांचे जगणे, त्यांच्यावर होणारे अत्याचार, नाच्याची होणारी बदनामी, फलकं, हेमला असे हिनवणे यांचे वर्णन कादंबरी व सिनेमातून आले आहे. नटरंग कादंबरी व सिनेमा दर्जेदार असून वाचक व रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या कलाकृतीचे यश आहे.
सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर संजय जाधव यांनी 2013 मध्ये दुनियादारी सिनेमा प्रसिद्ध केला. मैत्रीसाठी जीवाचं रान करणारे जिगरी दोस्त, कट्यावरची धमाल, तसेच कादंबरी व चित्रपटातील पात्रे वाचक व प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. इत्यादी चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रत्येय वाचक आणि प्रेक्षकांना येतो. साहित्य आणि चित्रपट याकडे किती सूक्ष्मपणे पाहायला हवे याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना जाणवते. साहित्य आणि चित्रपट या संशोधनात्मक व तुलनात्मक अनुबंधांतून ‘कुंकू ते दुनियादारी’ हा ग्रंथ साकार झाला आहे.’माध्यमांतर’ या विषयावर लेखन करणारे खूप मोजके लेखक आहेत. या विषयावर विविध अंगाने लेखन करणाऱ्या नवोदित लेखकांना या मौलिक ग्रंथाचा उपयोग होईल. साहित्य आणि चित्रपटांचा अभ्यास करताना मला हा ग्रंथ मार्गदर्शक वाटतो.
प्रा.प्रवीण जाधव
संपर्क क्रमांक ९६०४१११३०५
मराठी विभाग प्रमुख,
श्री मुलिका देवी महाविद्यालय निघोज
ता.पारनेर,
जि.अहमदनगर
‘कुंकू ते दुनियादारी’
डाॅ.राजेंद्र थोरात
चपराक प्रकाशन,पुणे
संपर्क:७०५७२९२०९२
पृष्ठ-१२८
मूल्य-१३०