Posted on

हीच माझी कहाणी

5+

स्वप्न असतात मोठी.. काही खरी.. काही खोटी..

   “हीच माझी कहाणी”

कथा लेखन: निनाद वाघ

***********************************************************************

“दादर स्टेशन यायला अजून किती वेळ आहे?” मी माझ्या शेजारच्या प्रवाशाला विचारलं.

“साधारणतः १० मिनिटं” ते म्हणाले

“अच्छा Thank You काका”

हळूहळू लोकं आपआपल्या सामानासह दरवाज्याकडे रांग लावत होती. मी सुद्धा माझं सामान एकत्र केलं. गाडीचा वेग आता जरा मंदावला होता पण माझ्या हृदयातली धडधड मात्र वाढली होती. अर्थात नव्या शहरात चाललो आहे ह्याची उत्सुकता होतीच पण त्या सोबत थोडी भीतीही होती.

एक अनोळखी शहर, त्या शहरातील अनोळखी माणसं आणि त्याच शहराचा आता आपणही एक भाग होणार ह्याचं कुतुहल.

मुंबई सारख्या ह्या मायानगरीत येणं हे माझ्यासाठी एक स्वप्नंच होतं जणू. जसं अनेकांचं असतं ना, अगदी तसंच.

आज मला ते पूर्ण होताना दिसत होतं. एक नवीन प्रवास सुरू होणार होता. आनंद तर होताच पण मनाला थोडी हूरहुर लागून राहिली होती. घरून निघताना आईचा तो हळवा झलेला चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता. आईला असं एकटं सोडून इतकं लांब मी ह्या अगोदर कधीच आलो नव्हतो. येताना मलाही खूप त्रास झाला होता पण MBA चं शिक्षण मुंबईत घ्यायचं ही माझीच इच्छा होती आणि आईलाही ती मान्य होती.

बघता बघता दादर स्टेशन आलं. सगळेच घाईघाईने उतरत होते. तसा मीही उतरलो. मुंबापुरीच्या जमिनीवर पाय ठेवताच माझं स्वागत झालं ते स्टेशनवरच्या अलोट गर्दीनं. खरं सांगतो, हे पाहून मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो. ह्या आधी इतकी माणसं कधी पाहिली नव्हती. जिथे बघावं तिथे दिसत होती ती नुसती माणसे. कसाबसा त्यातनं वाट काढत मी स्टेशन बाहेर पोहोचलो अन् सुटकेचा निश्वास सोडला. आईला फोन करून कळवलं.

कधी एकदा रूमवर जातो असं झालं होतं. थकवा जाणवत होता. भूकही प्रचंड लागली होती. खायचं कुठे हा प्रश्न होता. इतक्यात समोरच एक वडा पावची गाडी दिसली. तिथेही चिकार गर्दी. ज्या मुंबईच्या वडा पावाबद्दल ऐकून होतो तो खाल्ला आणि मन अगदी तृप्त झाले.

मुंबईला येण्याआधीच मी फोनवरून PG म्हणून प्लाझा जवळ रूम घेतली होती.

” काका प्लाझाला कसं जायचं? ” मी एका माणसाला विचारलं.

” समोरून तुम्हाला Taxi मिळेल ”

” ओके थँक्यू ”

समोरच्या बाजूला लगेच Taxi मिळाली आणि त्यानं मला प्लाझाकडे सोडलं खर पण नेमका पत्ता शोधताना मात्र माझा गोंधळ उडाला होता. मला माझी बिल्डिंग काही सापडेना. मी माझ्या केअर टेकरना फोन लावला. तो काही लागला नाही.

अनेकांना पत्ता विचारला तर कुणी म्हणालं राईटला आहे, कुणी म्हणालं लेफ्ट. बिल्डिंग कुठल्या एका गल्लीत होती म्हणून लोकाना बहुतेक ती माहीत नसावी. माझी शोध मोहिम सुरुच होती.

जवळपास तास उलटून गेला. आता मात्र मला भिती वाटू लागली. आईची आठवण येत होती. काय करावं तेच समजत नव्हतं. हळूहळू काळोख होत होता. मी हताश होऊन एकटाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. मी आणि माझं सामान. ह्या अनोळखी शहरात जाणार तरी कुठे?

आजूबाजूला गाड्यांची तसंच माणसांची खूप वर्दळ होती पण तरीही एकटं वाटत होतं…

रात्र झाली तशी मनातली भीती अजून वाढत होती. नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी पुन्हा दादर स्टेशनकडे जावं आणि तिथल्या वेटिंग रूममध्ये राहावं असं मी ठरवलं. आईला ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. नाहीतर उगाच ती काळजी करत बसली असती.

सामान उचललं आणि प्लाझावरून दादर स्टेशनला निघालो. नेमका रस्ता माहिती नसल्याने असंच एका गल्लीत शिरलो तर तिथे मला स्वामींचा मठ दिसला. मठाची दारं बंद होती. फक्त एक छोटी खिडकी उघडी होती ज्यातनं स्वामींचा फोटो दिसत होता. मी हातातलं सामान खाली ठेवलं. डोळे मिटले अन् स्वामींकडे प्रार्थना केली.

“स्वामी आज मुंबईत पहिल्यांदा आलोय. काही स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करायला. तुमचा आशीर्वाद असुद्या. आता सुद्धा खूप एकटं एकटं वाटतंय. भीती वाटतेय. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजिले असणार. ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. लक्ष असुद्या”

तिथून पुन्हा स्टेशनकडे चालायला सुरूवात केली. इतक्यात खिशातला फोन वाजला. केअर टेकरांचा होता.

“हेलो…”

“हेलो.. हा कुणाचा नंबर आहे? आताच मी १०-१२ मिस कॉल पाहिले”

“मी समीर बोलतोय. समीर वामन खानोलकर. तुमचा पी. जी.. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. मी मुंबईत आलोय. तुमचं घर सापडेना म्हणून फोन केलेला पण तुम्ही उचलला नाही..”

“सॉरी.. खरंच खूप सॉरी.. मी कामात गुंग होते आणि फोन सायलंटवर होता हे लक्षात आलंच नाही.. आता मिस कॉल पाहिले..”

“मी खूप घाबरलेलो. आता पुन्हा दादर स्टेशनला निघालो होतो.”

“आता कुठे आहेस?”

“मी आता स्वामींच्या मठाजवळ आहे”

“अच्छा.. थांब तिथेच.. मी येते तुला घ्यायला.”

त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या जिवात जीव आला. खरंच ही सारी स्वामींची कृपा होती. मी पुन्हा हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले.

मी उभा होतो. इतक्यात एक वयस्कर बाई येताना दिसली.

“समीर??”

“हो”

“मी मनोरमा दिक्षित. चल सोबत माझ्या.. दोन बिल्डिंग सोडून आपलं घर आहे.”

आम्ही घरी आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. सामान खोलीत ठेवलं इणि फ्रेश झालो. दिवसभरात जाम थकलो होतो पण अखेर मुंबईत आलोच ह्या उत्साहात तो जाणवत नव्हता. मला अतोनात आनंद झाला होता.

“काय रे सामान ठेवलं का व्यवस्थित? ये दोन घास गरम जेवून घे.. थकला असशील.. जेवला की बरं वाटेल. शांत झोप लागेल.. माझ्यामुळ्ये उगाच तुझी गैरसोय झाली.”

“आजी.. All is well that ends well..तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका”

मी जेवायला बसलो. भूक लागलीच होती. आजींच्या हाताला चव होती. जेवल्यावर छान वाटलं. बिछान्यावर पडलो तशी लगेच शांत झोप लागली. मुंबईतली पहिली रात्र. उद्यापासून एक नवं आयुष्य सुरू होणार होतं. एक नवीन प्रवास.. तो पर्यंत डोळ्यांत स्वप्न घेऊन लागलेली ती पहिली शांत झोप..

रात्र ही सरणार

घेऊन स्वप्नं नवी..

दिवस नवा उजाडणार

सुखाचा आरंभ होणार..

मुंबईत येऊन आता जेमतेम दोन दिवस झाले होते. ह्या अनोळख्या बलाढ्य शहरात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं असं जरी मी म्हटलं तरीही आता मात्र मला एक हक्काचं असं माणूस सापडलं होतं. त्या म्हणजे माझ्या केअर टेकर आजी. अगदी दोन दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. वयानं जरी म्हाताऱ्या असल्या तरी त्यांच्यातील ऊर्जा इतकी अफाट होती की एखाद्या लहान मुलालाही लाजवेल.

दिवसभर स्वतःला कामात बुडवून घ्यायचं. सतत काही ना काही काम सुरूच.

“काय रे समीर, आज रात्रीच्या जेवणात काय बेत करायचा?”

“अहो आजी, असं काही नाही तुम्ही नेहमी करता तसंच करा. उगाच माझ्यासाठी म्हणून वेगळं काही नको. खरंच”

“वेगळं वगरे काही नाही. उलट तुझ्या आवडीचं करायला मला आवडेल”

“कशाला हो उगाच. तुम्ही थकत नाही का? दिवसभर इतकं काम करत असता ते.”

“इतकी वर्ष झाली. एकटीच राहतेय. सगळं स्वतः करते. आधी एकटेपणा जाणवायचा. हे रिकामं घर खायला उठायचं. मग स्वतःला कामात बुडवून घेतलं. मसाले, पापड, लोणची करून विकायचे.. असो.. माझ्या मेलीची बडबड आपली सुरूच राहणार.. तू सांग जेवणाचं काय ते? बिर्याणी करू का? आवडेल का?

“हो आजी. आवडेल”

आजीच्या त्या बोलण्यामागे कुठेतरी एक खंत जाणवली. प्रत्येक माणसाची अशी एक स्टोरी असते. तशीच आजींचीही होती. नक्कीच काहीतरी घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. खोलवर कुठेतरी उरात जखम होती.

रात्री आजीच्या हातची चमचमीत बिर्याणी खाल्ली. अगदी मायेने त्यांनी केली होती.

जेवणानंतर आजी सगळं आवरून ठेवायच्या. दोन दिवसांत मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे त्या स्वच्छते बाबत फार काटेकोर होत्या. घर कायम नीट नेटकं असायचं.

“आजी ती ताटं द्या मला. मी आवरून ठेवतो”

“काही नको. तू आराम कर. रात्रही फार झाली आहे. झोप हवं तर. माझं होतच आलंय”

“झोप येत नाही मला. आजी जर तुम्हाला चालणार असेल तर आपण छान गप्पा मारूया का?”

“हो चालेल.”

“तुम्हाला झोप तर आली नाही ना?”

“नाही. उलट तुझ्याशी गप्पा मारल्या तर छानच वाटेल”

आम्ही खिडकीपाशी बसून छान गप्पा टाकल्या. आजी मला मुंबई बद्दल सांगत होत्या. इतक्या वर्षात मुंबई कशी बदलत गेली त्या बद्दलही सांगत होत्या.

एकीकडे आजीच्या गप्पा तर दुसरीकडे खिडकीतून ती शांत तरीही गजबजलेली मुंबई दिसत होती.

“आजी तुमच्याशी गप्पा मारून खूपच मज्जा आली”

“मलाही छान वाटलं. इतक्या वर्षांनी कुणाशी इतक्या गप्पा मारल्या मी. पूर्वी मी आणि रोहन सुद्धा अशाच रात्री गप्पा मारत बसायचो.”

“रोहन?”

“काही नाही. रात्र फार झाली आहे. चल झोपायला”

असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेल्या. अन् मी पाहत राहिलो त्यांच्याकडे.. मनात असंख्य प्रश्न घेऊन.

मन अस्वस्थ झालं होतं. सारखा मनात एकच विचार होता की हा रोहन कोण असेल!

आजींचा मुलगा असेल का? किंवा मग नातू? पण मग त्यांनी त्याच्या बद्दल बोलणं का टाळलं असावं? हा रोहन जो कुणी आहे तो आता कुठे असेल? काय करत असेल? की मग…

मनात भलते सलते विचार येऊ लागले. हे विचारचक्र असंच सुरू राहिलं आणि ह्यातच रात्र सरली पण त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडेना.

कसं सांगू तुम्हाला

अंतरी माझ्या काय चाललंय ?

घुसमटलेले विचार

अन् मन खवळलंय..

सकाळी आजी नेहमीप्रमाणे देव घरात पूजा करत बसल्या होत्या. मी ही देवासमोर हात जोडले. पूजा झाल्यावर आजींनी बनवलेला गरमागरम नाश्ता केला.

“काय रे समीर, कॉलेज कधीपासून सुरू होणार?

“१ तारखेला होणार. तो पर्यंत जरा आराम”

“बरं. मग आज बाहेर जायचं का फिरायला? बघ म्हणजे जर तुला चालत असेल तर”

“अहो का नाही चालणार. नक्कीच चालेल”

“ठरलं तर मग. आज बाहेर फिरू आणि मग बाहेरच जेवू.”

“चालेल”

आम्ही सर्वात आधी सिध्दिविनायक मंदिरात गेलो. तिथून आम्ही मग शिवाजी मंदिरला मस्त नाटक बघितलं. मग तिथून मग आम्ही हॉटेलात जेवलो.

“एक काम करू आता घरी जाऊ आणि मग सायंकाळी शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर बसू. छान गप्पा मारू”

आजी आज फार उत्साहात आणि आनंदात दिसत होत्या. त्यांना बघून मी ही आनंदात होतो. अर्थात मनाच्या एका कोपऱ्यात ‘रोहन कोण’ हा प्रश्न होताच. असो.

संध्याकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही पार्कात गेलो. तिथे कट्ट्यावर बसलो.

“कसा होता मग आजचा दिवस? मजा आली का?” आजींनी विचारलं

“आजचा दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. जाम धमाल आली”

“छान. मलाही बरं वाटलं. खूप दिवसांनी मी अशी बाहेर आले. पूर्वी खूप फिरायचे पण मग सगळंच बंद झालं”

” आजी एक प्रश्न विचारू?”

“मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?”

“हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही.”

“सांगते..” आजी थोड्या हळव्या झाल्या.

“मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी..”

आजी सांगत होत्या आणि तितक्यात माझा फोन वाजला.

रोहन बद्दल सांगताना आजी जरा भावूक झाल्या होत्या.

“२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं कसं छान चाललं होतं. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नातू रोहन. घर अगदी माणसांनी भरलेले असायचे. रोहन तेव्हा पाच वर्षांचा होता. चिमुकल्या पावलांनी घरभर हिंडायचा. बोबड्या आवाजात बोलायचा. आजी..आजी.. करत सारखा अवती भवती फिरायचा. त्याच्या मागे मागे धावताना माझी दमछाक व्हायची खरी पण गंमतही तितकीच यायची. वेळ कसा जायचा हे समजायचंही नाही. आम्ही दोघं खिडकीपाशी बसून गप्पा मारायचो. तो मला कार्टूनच्या गोष्टी सांगायचा तर मी ही त्याला बोध कथा सांगायचे. ते दिवसच वेगळे होते. त्याला कार्टून फिल्मस् खूप आवडायच्या. मग आम्ही असंच बाहेर जायचो. फिल्म बघायचो. हॉटेलात खायचो. इथेच कट्ट्यावर येऊन बसायचो. ही जागा त्याच्या आवडीची होती आणि म्हणूनच माझीही”

आजी सांगता सांगता थांबल्या. त्यांच्या चष्म्यामागून आलेला तो अश्रूचा थेंब खूप काही सांगत होतं. त्यांचं त्यांच्या नातवावर किती प्रेम होतं हेच ह्यातून दिसत होतं.

“आजी मग आता रोहन कुठे असतो? नाही म्हणजे मी इथे आल्यापासून कधी दिसला नाही किंवा कुठला फोन आला नाही म्हणून विचारलं?”

“फोन आला नाही हे खरं आहे पण कधी येणारही नाही हेही तितकंच खरं आहे.”

“का?”

“मला वाटतं उशीर खूप झाला आहे. आपल्याला निघायला हवं.”

“पण आजी…”

“चल म्हटलं ना..”

सिनेमा ऐन रंगात यावा आणि तेव्हाच नेमकी वीज जावी. उत्कंठता शिगेला पोहोचावी आणि गोष्ट अर्धवट राहवी. तसंच काहीशी अवस्था माझी झाली होती. रोहन बाबत उत्कंठता ताणली गेली होती.

आम्ही घरी पोहोचलो. आजी फार काही बोलल्या नाहीत. आपल्या खोलीत शांत बसून होत्या. मीही त्यांना काही विचारायला गेलो नाही. त्या दुखावल्या होत्या हे जाणवत होतं. रोहनचा विषय काढून अजून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.

मी ही स्वतःशी ठरवलं की आता जो पर्यंत आजी रोहन बद्दल सांगत नाही तो पर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही.

दिवसभर आजी सोबत खूप छान वेळ गेला. आईला फोन केला. तिच्याशी दिवसभर घडलेली प्रत्येक गोष्ट शेयर केली. आजींबद्दल सांगत होतो. तिलाही बरं वाटलं ऐकून.

रात्र फार झाली होती . मी खोलीचा दिवा बंद केला. आजींच्या खोलीत डोकावलं तर त्या शांत झोपल्या होत्या. मग मीही झोपलो.

रोहनचा विषय संपला होता माझ्यासाठी पण प्रश्न अनुत्तरीत होताच. रोहन कुठे आहे? आजींचा मुलगा व सून ते कुठे असतील? आजोबा कुठे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी माणसं असूनही आजी अशा एकट्याच का? ह्या २० वर्षात असं काय बदललं?

हा विषय संपला असं म्हटलं खरं पण मन हे आपुले. विचार करायचे थोडीच थांबतंय. विचारचक्र सुरूच.

रोहनचा विषय तात्पुरता तरी माझ्यासाठी संपला होता कारण त्यातच अडकून राहिलो तर मुंबईला येण्याचं माझं मूळ उद्दिष्ट बाजूला राहिलं असतं. आजींना हा विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना दुःख होईल असं काहीही वागायचं नाही असं मी ठरवलं.

सकाळी मी माझं सगळं आवरून खोली बाहेर आलो तेव्हा तिथे आजी बसल्या होत्या. आनंदी दिसत होत्या. स्वतः मधे मग्न होत्या. गाणं गुणगुणत होत्या.

“Good Morning आजी”

“काय मग झोप झाली का छान?”

“हो आजी”

“बरं बस इथे. मी गरम कांदे पोहे केले आहेत ते आणते” असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या.

“लिंबू पिळून देऊ का?” आतून आवाज आला.

“हो चालेल”

“आणि खोबरं?”

“थोडं चालेल”

आजी आतून छान गरमागरम कांदे पोहे घेऊन आल्या.

“काय रे ते तुझ्या कॉलेजमध्ये तुला मार्कशीट का काय द्यायचा होत्या असं म्हणाला होतास. ते कधी जाणार आहेस?”

“अरे हो. मी विसरलो होतो. थँक्स आजी आठवण केल्याबद्दल. आजच जाऊन येतो.”

“चालेल. लगेचच करून टाक. अशा महत्त्वाच्या कामात उगाच दिरंगाई नको.”

“हो नक्की.”

पोहे खाऊन झाल्यावर मी लगेचच कॉलेजला जायला निघालो. आजी म्हणाल्या होत्या की नाक्यावरच्या बस स्टॉपवर मला बस मिळेल.

मी बसची वाट बघत उभा होतो. गरमीचे दिवस असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या.

“वडाळ्याला जायला बस इथेच मिळेल ना?” मी शेजारच्या माणसाला विचारलं.

“होय”

इतक्यात मला बस येताना दिसली. मी त्यात चढलो आणि एक आजोबा बसले होते त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. अगदी साधी वेषभूषा होती त्यांची.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.

मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा, ही चित्र कुठून आणली? अप्रतिम आहेत!”

हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, “बाळा ही मी स्वतः काढली आहेत.”

मला आश्चर्याचा धक्का बसला.

“वाह! तुम्ही चित्रकार आहात ? ”

“हो. म्हणजे अगदीच चित्रकार असं नाही पण हौस म्हणून काढतो.”

“क्या बात है”

“तू विचारलं म्हणून सांगतो. लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.

पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नीचे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव!”

त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रूचा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.

बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…

बस मधून उतरल्यावर समोरच कॉलेजची इमारत दिसली. इंटरनेट वर फोटो पाहिला होता खरा पण प्रत्यक्षात सुद्धा ती वास्तू तितकीच सुंदर होती.

खरंतर शिक्षणाची आवड मला अगदी लहानपणापासून होती. शाळेत असताना नेहमी चांगले मार्क्स असायचे. देवाच्या कृपेने हुशारही होतो. उच्च शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं.

माझं बालपण हे खरंतर एका छोट्याशा खेड्यात गेलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती पण आईने झेपेल तसं सगळं केलं. दिवस रात्र राबायची बिचारी. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च तिने केला. ते कधीच थांबू दिलं नाही. आईने केलेल्या कष्टाची जाणीव मला होती. कॉलेजला जायला लागल्यावर मी सुद्धा एक छोटीशी नोकरी धरली. तिथेच गावातच. पगार काही फार नव्हता पण तेवढीच आईला मदत.

हळूहळू खर्च वाढू लागले. आईच्या ही अवाक्या बाहेर जात होतं सगळं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच टेंशन दिसायचं मला. बाकी कसलंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही ना घेता येत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.

एकदा असंच मी तिला म्हटलं की आता पुढचं शिक्षण नको. त्याचा खर्च वाचेल आणि पूर्ण वेळ नोकरी करता येईल. तेव्हा आई खूप चिडली माझ्यावर आणि म्हणाली “जो पर्यंत तुझी आई जिवंत आहे तो पर्यंत तरी तुला असं काहीही करायची गरज नाही. तुला वाटतं ना की पैशाची जुळवाजुळव करताना मला त्रास होतोय. तर हो..होतोय मला त्रास..पण जर तू शिक्षण सोडलं तर मला होणारा त्रास हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यामुळे पुन्हा कधी शिक्षण सोडण्याची भाषा करायची नाही.”

दिवस सरत होते. आम्ही जगत होतो. माझ्या आईची स्वामींवर फार श्रद्धा होती. ती नेहमी म्हणायची की आपण कष्ट करत रहायचे. स्वामी आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील.

तिचा हाच विश्वास खरा ठरला. ऐके दिवशी मावशीचा फोन आमच्या शेजारच्या घरी आला. तिने आईला सांगितलं की कुठलीतरी जुनी जमीन होती म्हणे वडिलांची त्यांच्या. कित्येक वर्ष अशीच होती. ती विकली गेली ३० लाख रुपयांना आणि त्यातून आलेले पैसे तिघं भावंडं वाटून घेणार. आईच्या वाटेला १० लाख रूपये आले.

आमची परिस्थिती बदलत गेली. आईचा ताण कितीतरी कमी झाला. मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तरा नशीब सुद्धा आपलं साथ देतं ह्यावर माझा विश्वास बसला.

हे सगळं सुरू असताना माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबईच्या कॉलेजात MBA करायचं मी ठरवलं.

आपलं नशीब आपल्या हाती

दोष इतरांना देऊ नका..

आपण घडवू तसंच घडेल आयुष्य

रोष इतरांवर काढू नका..

आमच्या घरात तशी अजून एक व्यक्ती सुद्धा रहायची. सांगायला विसरलो. माझे वडील. पण त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं..

कॉलेजमध्ये मार्कशीट देऊन मी पुन्हा घरी आलो. आजींशी गप्पा मारत बसलो. मी माझ्या वडिलांविषयी बोलणं टाळतो हे आजींना ही माहित होतं. त्यांनी मला ह्या विषयी एकदा विचारलं होतं पण नंतर पुन्हा कधीही हा विषय काढला नाही. कदाचित जसं मी त्यांना रोहनबद्दल विचारायचं थांबवलं होतं तसंच.

आम्ही वेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. जाताना बसमध्ये भेटलेल्या त्या आजोबांबद्दल सांगत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटलं की मला लिहायला आवडतं. कविता करतो कधीकधी.

“काय सांगतोस? कविता ?? मला ऐकव की..”

“नाही हो.. येवढं काही चांगलं जमत नाही ”

“असू दे. तरीही ऐकव”

“बरं..”

मी माझ्या कवितांची वही आणली.

आजी मी तुम्हाला ‘माणूस’ ही माझी कविता ऐकवतो. माणूस कसा असावा ह्या संदर्भातील ही कविता आहे.

माणूस

परिस्थितीशी झुंज देणारा

असा माणूस व्हायला हवा..

आसवे गाळावे त्यांनीही

पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही

शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..

मनात झालेला विचारांचा गुंता

अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..

राग आला कितीही तरी

मनात त्याच्या क्रोध नसावा..

कठीण समय आला जरी

चेहरा कायम प्रसन्न असावा..

परिस्थितीशी झुंज देणारा

असा माणूस व्हायला हवा..

आसवे गाळावे त्यांनीही

पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

“वाह! छान! खरंच आवडली. खूप छान लिहिली आहेस”

“थँक्स आजी”

“अजून एखादी ऐकव ना. आता तर माझ्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत”

“काहीही काय आजी. उगाच माझी मस्करी करताय का..”

“अरे खरंच मनापासून सांगतेय”

“बरं मग मी अजून एक कविता सादर करतो”

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.

जुने रस्ते नव्या वाटा

जुनेच किनारे नव्या लाटा

जुन्या जखमा नवं दुखणं

जुनेच डोळे नवी स्वप्न

जुनी ठेच नव्यानं लागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत

जुनाच खेळ नवी गंमत

जुना झोपाळा नवे झोके

जुनंच घड्याळ नवे ठोके

जुना आशीर्वाद नव्यानं मागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र

जुनीच अक्षरं नवी पत्र

जुने पेच नवे प्रसंग

जुन्याच अपेक्षा नवे भंग

जुना स्वभाव नव्यानं वागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.

सकाळ झाली. मी अजूनही त्याच विचारात होतो की मला फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण असेल?

त्या नंबर वर मी पुन्हा फोन लावला. अजूनही लागला नाही. फोनच्या ॲपवर नंबर शोधला तरी सापडला नाही. कदाचित राँग नंबर असेल म्हणून मी विचार सोडून दिला.

बघता बघता मुंबईत येऊन मला दोन आठवडे झाले होते.आज पासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. मी निघताना आजींचा आशीर्वाद घेतला अन् निघालो.

रिमझिम पाऊस पडत होता. कॉलेजचा परिसर छान हिरवागार होता. मी बिल्डिंगच्या आत शिरलो आणि माझा वर्ग शोधला. सगळेच नवे चेहरे होते. एक बाक रिकामा दिसला. तिथे जाऊन मी बसलो.

आमचं इंडक्शन सेशन सुरू झालं. प्रत्येक जण आपली ओळख करून देत होते. मी ही दिली. पहिला दिवस असाच गेला. निघताना काही मुलं घोळक्यात उभी होती. नवी नवी मैत्री झालेली पण माझी नजर गेली ती एका मुलावर. तो एकटाच उभा होता.

मी त्याच्या जवळ गेलो.

“हाय.. मी समीर”

“हाय”

“नाव काय रे तुझं?”

“रोहन.. रोहन दिक्षित”

मी हे नाव ऐकून चक्रावलो. हाच का आजींचा नातू? की फक्त नावात साम्य? मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.


to be continued…


– निनाद वाघ

5+
Posted on

पाउस आणि त्याच्या छटा

पाउस आणि त्याच्या छटा
3+

निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून महिना म्हटलं की विषय निघतोच त्या पावसाचंच पहा ना, तो पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं ते पाणी,पाणी तेच,आकाश तेच,पाण्याची दिशा तीच पण त्या पावसाचे अर्थ मात्र नानाविध.

आता माणूस हा मतलबी वैशिष्ट्याचा बिनशेपट्या प्राणी,त्याला आपल्या मतलबाने गोष्टींचे अर्थ काढायची सवय. एखादा भोळा आस्तिक असतो जो त्या पावसाला वरूणदेव म्हणून त्याची पूजा करायला तयार, पाऊस पडावा म्हणून यज्ञयागादी करणारे आस्तिक एकीकडे, तर हा सगळा विज्ञानाचा खेळ, सगळी फिजिक्स आणि केमिस्ट्रीची थेरं मांडून ह्यात काय देव बिव नाय म्हणणारी विज्ञानयागी डोकी एकीकडं.

एकीकडे बारकी पोरं, सांग सांग भोलानाथच्या नादी लागून उगाच शाळेभोवती तळे साचून दांड्या मारण्याच्या आशेवर राहतात त्यांचा पाऊसच वेगळा,आम्ही  ऑफीसवाले सुद्धा कचेरीबाहेर तळे साचण्याच्या आशेवर आहोत,पण सध्या Work From Home ची सोय आधीच करून दिली असल्यानं त्याच पावसाचं पाणी आमच्या आशेवर फिरतं. येरे येरे पावसा,तुला देतो पैसा म्हणून लहान कारट्यांना उगाच पावसाला “पेढा देऊन येडा बनवायची” जाम मजा वाटते.

पाऊस म्हटला की फुलणारी हिरवळ,बहरलेला निसर्ग आठवणारी मंडळी एकीकडे, अन पाऊस म्हटला की ‘काय तो चिखल आणि काय ती गीचगीच’ म्हणून कपाळी आठयांचे डोंगर उभी करणारी मंडळी एकीकडे, अर्थात पाऊस तोच मात्र आपले चष्मे तेवढे वेगळे. कुणी पावसात साचलेल्या पाण्यातून वेगाने गाडी दामटतो तर कुणी तेच उडालेले पाणी अंगावर येऊ नये म्हणून त्यापासून दूर पळू पाहतो.

पावसात कुणाला छत्री सांभाळायचं ओझं वाटतं तर कुणी मुद्दाम छत्री विसरून पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्नं पाहतो. पाऊस आला की पावसाचे हंगामी कवी उगवतात अन पाऊस झाला की दुःखाचे डोंगर मांडून रडक्या कथा सांगणारे सुद्धा उगवतात. पावसाने काय कॉलेजात पोरा पोरींच्या प्रेमाची सेटिंग लावण्याचा किंवा मोडण्याचा ठेका घेतलेला नसला तरी काहींना अचानक पावसात प्रेमाचे रंग चढतात काहींचे पावसात प्रेमभंग दिसतात.

शेतकऱ्याला पाऊस नक्कीच सुखावतो तर तिकडे पावसाचं पाणी साचून ट्राफिक जाम मध्ये अडकलेला शहरातला नागरिक मात्र त्रस्त होतो. मुंबईतले चाकरमानी पावसाळ्यात लोकल रेल्वेच्या खोळंब्यावर नेमके रेल्वे बोर्डाला शिव्या घालत असावेत की पावसाला हा एक मोठा प्रश्न मनात येऊन गेला,त्याचं उत्तर तो मुंबईचा समुद्री पाऊस  आणि ते मुंबईकर जाणोत.

माणसाने आयुष्य जगावं तर ह्या पावसासारखं! हवं तेव्हा कोसळावं, हवं तेव्हा थांबावं, मनाला वाटलं तर खूप जोरदार वादळी अन आक्रमक व्हावं नाही तर खूप शांत,हलकं अन स्थीरच रहावं. असं मनसोक्त बरसता बरसता अनेकांची धांदल उडवावी, काहींना सुखद धक्के द्यावे,कुणाला चिडवावे, कुणाला रडवावे.

तापणाऱ्या उन्हाळ्याच्या उष्णतेत अचानक अंधारून येऊन गारवा तयार करणारा पाउस सुखावातोच, सोबत त्याची आस लावून बसणाऱ्या   धरणीमातेच्या लेकराला,शेतकऱ्याला तर आनंदाने  नाचायला लावतो. पृथ्वीवरचे  अन्नचक्र  चालवतो,   शिशिराच्या पानगळीने उजाडलेल्या झाडांना अचानक बहर आणतो.

पाउस आला की सर्वत्र कशी जादूची कांडी फिरावी असं अचानक बदल दिसतो. कवींना कविता,कुणाला चारोळ्या, लहानग्या पोरांना भोलानाथ आणि अचानक सुट्टी मिळण्याचे स्वप्न आठवू लागतात. रेनकोट, छत्रीवाले रस्त्याने दिसू लागतात,फुटपाथच्या कडेला मक्याची कणसं कोळश्यावर गरम होऊ लागतात. चहावाल्यांचा चहा जरा जास्तच विकला जात असेल नाही?

पाउस म्हणाल तर अनेक गोष्टी घडवतो, अनेक गोष्टींना गती देतो, म्हणाल तर वेगाने सदानकदा धावत्या शहरांना अचानक मंद करतो. पाउस तसा रंगीत पहिला तर इंद्रदेवाचे रंगीत धनुष्य  फुलवणारा,पहिला तर सर्वत्र काळोख दाटवणारा.पाउस तो एकच आहे, त्याची रूपं तेवढी अनेक आहेत, असंख्य आहेत. आपण आपले चष्मे चढवावेत, पडणाऱ्या पावसाचा आपल्याला हवा  तो अर्थ लावावा. ज्याला ज्याला जे हवं ते ते देणारा हा पाउस..!

अनेकांना अनेक रुपात हा पाउस दिसत असेल, भेटत असेल वेगळ्या रंगात, पण पाउस काय शिकवून गेला म्हणून कुणी विचारलं तर हमखास मी कुसुमाग्रजांची आठवण काढून सांगतो,
 ‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
3+
Posted on

ताळेबंद

6+

श्रीमती क्षमा सुरेश गोसावी. 
वय वर्ष ६२. 

फेब्रुवारी महिन्याची एक तारीख म्हणून आज बँकेत प्रचंड गर्दी. सकाळची ९ वाजायची वेळ. सर्वत्र घाई गर्दीची वेळ ! शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणाऱ्यांची घाई आणि घरी राहणाऱ्या लोकांची, बाहेर पडणाऱ्या लोकांची सरबराई करण्याची घाई! कोणाचे डबे भर तर कोणाला जेवायला वाढ, कोणाचे शाळेचे दप्तर भर तर कोणाचे कॉलेजचे ओळखपत्र शोधून दे! कोणाच्या घरी कपड्यांचे मशीन लाव तर कोणाचे मार्केटिंग करून येताना बँकेतून पैसे काढून आण! Light Bill भर नाही तर telephone bill भर अशी सर्व कामे घरात असलेली निवृत्त मंडळी करत असतात. आजही तसेच झाले.

जोगेश्वरीच्या एका राष्ट्रीय बँकेत एक तारीख असल्याने मुंगीलाही शिरायला जागा नाही इतकी प्रचंड गर्दी! बँक नऊ वाजता उघडणार तर त्यापूर्वीच भली मोठी रांग अगदी कंपाऊंडच्या बाहेरपर्यंत आलेली होती. सिक्युरिटीने बँकेचे शटर उघडले तेव्हा बँकेचे जवळजवळ सर्व कर्मचारी आपापल्या जागी स्थानापन्न झाले होते. पेन्शनर लोकांची वेगळीच रांग होती. आज तिथे खूपच मोठी रांग होती आणि तिथे काम करणारी सुनिता अजून आली नव्हती. घरातील अडचणींमुळे गेले कित्येक दिवस ती वेळेवर येऊच शकत नव्हती. मग रोज कोणीतरी नविन व्यक्ती त्या काऊंटरवर बसत असे. नऊ वाजून दहा मिनिटे झाल्यावर त्या ब्रांचमध्ये नवीनच बदलून आलेली वर्षा देसाई त्या काऊंटरवर येऊन बसली. इतका वेळ ताटकळत बसलेल्या पेन्शनर्सच्या चेहऱ्यावर आनंद उजळला. रुमालाने घाम पुसत सगळे सरसावून उभे राहिले. आपला नंबर कधी लागतो याची वाट बघत २५-३० लोक आपापले पेन्शन घेऊन बाहेर पडले. रांगेतून बाहेर पडणारे काही लोक कुठे विजय मिळवून परत आलेल्या थाटात तर काही लोक अगदी व्यवस्थितपणे आपल्याबरोबर आणलेल्या पिशवीत पैसे जपून ठेवताना दिसत होते. माधवराव काळ्यांचे लक्ष फक्त आपला नंबर कधी लागतो याकडेच होते. शेवटी एकदाचा त्यांचा नंबर लागला. काऊंटरवरील वर्षाने माधवरावांचे पेन्शनचे १५०० रुपये त्यांना दिले. माधवराव पैसे घेऊन लगोलग बँकबाहेर पडले. घराच्या दिशेने चालू लागले. घर बँकेपासून बरेच लांब असल्याने सुमारे अर्धा पौऊण तास घरी पोहोचायला लागत असे.

दुपारचे दोन वाजून गेले. लोकांसाठीची बँकेची कामकाजाची वेळ संपली. शटर बंद झाले. कर्मचारी वर्गाचा लंच टाईम झाला आणि संपलाही! गप्पा टप्पा करताना लंच घ्यायचा हा सर्व स्टाफचा नियमित कार्यक्रम. नंतर रोजचेच रुटीन काम. सर्व पैशांची झालेली देवघेव, त्यांचे अकाऊंटिंग, पोस्टिंग इत्यादी कामे सर्वांचीच करून झाली होती. वर्षा मात्र बराच वेळ हिशेब लावत होती. उलट सुलट हिशेब करून झाले तरी हिशेब जमत नव्हता. शंभर रुपये तिच्याकडे जास्त जमा होते. चूक शोधून काढायला. वर्षाच्या सहकार्यांनी प्रयत्न केलापण त्यांनाही ते जमले नाही. अखेर sundry deposit मध्ये ती शंभर रुपयाची नोट ठेवली आणि बँकांचे आजचे काम संपले. वर्षा मनाशी म्हणत होती, “किती विचार करू? गेली असेल कुणालातरी एखादी नोट कमी. येईल उद्या मागायला.”

माधवराव बँकेतून बाहेर पडले आणि हळूहळू चालत चालत घरी येऊन पोहोचले तर दुपारचे दिड वाजून गेले होते. घरी गेल्यावर पेन्शनचे पैसे अगदी व्यवस्थित लोखंड पेटीत ठेवले. कपाळावरचा घाम पुसत खुर्चीवर बसले. बसल्या बसल्याच त्यांचा डोळा लागला. रमाकाकू दोन-तीन घरच्या पोळ्या करून आल्या आणि त्यांनी पाहिलं की माधवरावांचा डोळा लागलाय. पटकन त्यांनी पाटपाणी घेऊन येऊन त्यांनी माधवरावांना उठविले. ‘चला हो, पान वाढलंय. खूप वेळ लागला ना बँकेत? दमलाय का हो? आणि घरी येताना बस रिक्षा नसेलच केली. निदान उन्हातून येताना तरी तंगडतोड करू नका कितीवेळा सांगितलाय हो?” आणि अगदी एक तारखेला गेलंच पाहिजे का? पण माझं ऐकतं कोण?” त्या हळूहळू पुटपुटत होत्या तेव्हाच एक जांभई देत पानावर येऊन बसले. आज पानात अगदी वरण भात, भाजी, पोळी, आमटी, कोशिंबीर, लोणचं पापड चारी ठाव पदार्थ होते. रामरावांनी खुश होऊन विचारले, “काय आज काय विशेष? एवढं साग्रसंगीत जेवण?” काही नाही हो, जोशी वहिनींकडे फणसाची भाजी आणी शेंगांची आमटी होती.त्या म्हणाल्या घेऊन जाल का थोडी? म्हणून घेऊन आले. आणि पापड काल विठूला भाजून दिले होते भूक लागली. तेव्हा त्यातलेच दोन राखून ठेवले होते. माधवराव त्यावर काकूंना म्हणाले, “ अग या शेंगा मिठूसाठीच काढून ठेव आणि फणसाची भाजी सुनबाईला आवडते ना खूप? मग तिलाच ठेव. मला थोडीशी चवीपुरती राहू दे.’ रामाकाकुंनी काहीही न बोलता भाजी आमटी काढून ठेवली. माधवराव लोणचं कोशिंबिरीशी जेवले आणि तृप्तीची ढेकर देऊन पानावरून उठले.

संध्याकाळी सायली म्हणजे माधवरावांची सून कामावरून घरी आली. एका प्रायव्हेट शाळेत ती क्लार्कची नोकरी करत होती. शाळा छोटीशीच होती पण कामाचा व्याप मोठा होता. शाळेचे सारेच कामकाज तिला करावे लागत असल्याने घरी आल्यावर तिला काहीच काम करायची ताकद नसे. घरी आली कि नुसती चिडचिड! घरातील सारीच कामे रमाकाकू करत असत. माधवरावांचा मुलगा सुहास याची कंपनी बंद पडल्यामुळे तो ही एखाद्या थातुरमातुर कंपनीत नोकरीला होता. जेमतेम ५००० रुपये त्याचा पगार, सायलीचे २००० रु. आणि माधवरावांचे १५०० रु. एवढीच त्यांची तुटपुंजी मासिक मिळकत. घरात खाणारी तोंडे पाच आणि आवक जेमतेम ८५०० रु. कसे पुरवठ्याला येणार एवढेसे पैसे त्यांच्या प्रपंचाला? रमाकाकू दोन तीन घरच्या पोळ्या करून २००-३०० रु मिळवत असत. पण ते कुठच्या कुठे संपून जात कळतही नसे. दोन खोल्यांच्या टिचक्या घराचे हफ्ते आणि बिले भरून खर्च करायला पैसे उरतच नसत. मग हौस मौज त्यांच्या जीवनात येणार तरी कुठून? नाही म्हणायला माधवरावांना चहाचे तेवढे व्यसन जडले होते. निवृत्तीनंतर आयुष्यातील कडू गोड अनुभव चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकायला त्यांना चहाची गरज होती. त्यामुळे ती सवय लागली. केतरी दिवस काढत पुढील महिन्याच्या एक तारखेची वाट बघत  सारे जण ढकलत असत. माधवरावांचा उच्च रक्तदाब आणि रामाकाकुंचा मधुमेह जन्मभराचे शत्रू आता मित्र होऊन राहिले होते. त्यांच्यासाठीही काही पैसे ठेवावे लागत. महिना संपत आल्यावर गोळ्या जर संपल्या तर शेवटचा आठवडा औशाधाशिवायच एक तारखेची आशाळभूतपणे वाट बघत काढत असत.

महिना संपला, मार्चची एक तारीख आली. आजही बँकेबाहेर भलीमोठी रांग पेन्शनर्सची! पुन्हा सकाळची नऊची वेळ. शटर उघडल्यावर लोकांचा लोंढा आत घुसला. एखादे धरण फुटून पाणी सर्वत्र पसरावे तसा! आजही माधवरावांचा नंबर २०-२२ वा होता. पण आज विशेष म्हणजे नेहमी काऊंटरवर असलेली सुनिता आज प्रसन्नपणे हसत काऊंटरवर खुश दिसत होती.गेले चार-पाच महिने तिचे चालू असलेले प्रोब्लेम्स बहुदा संपले असावेत. माधवरावांचा नंबर आल्यावर तिने विचारले, “काय काका, कसे आहात? काकू काय म्हणतायेत? सुहास ला लागली का कुठे चांगली नोकरी? आणि हो काकूंना पुढच्या आठवड्यात घरी येऊन जायला सांगा, थोडे काम द्यायचेय त्यांना.” माधवराव फक्त ‘हो’ म्हणाले. आणि सुनिताने दिलेल्या एकेककरून नोटा मोजू लागले. नोटा मोजायला वेळ लागतोय हे पाहून रांगेतील मागचे लोक कुरकुर करायला लागले. “ओ राव किती वेळ लागतोय? आज होणार का नोटा मोजून? आम्हालाही घाई आहे. येत नसेल तर आम्ही देतो मोजून लवकर.” पण लोकांचे शब्द त्यांच्या कानांवर जणू पडतच नव्हते. ते आपले नोटा मोजण्यात दंग होते. शेवटी न राहून सुनितही त्यांना म्हणली, “काका आम्ही नोटा नीट मोजून देतो, शिवाय यांत्रावरही मोजतो म्हणजे त्यात चूक व्हायची शक्यता नाही. कशाला उगीच परत परत मोजता? बाकी लोकांनाही उशीर होतो ना?” शेजारच्या काऊंटरवरील गर्दी कमी झाली होती. तिथे कुणीच उभे नाही हे पाहून त्या काऊंटरवरची वर्षा माधवरावांना म्हणाली, “काका, इथे या आणि मोजा नोटा सावकाश. उगीच बाकीच्यांचा खोळंबा नको व्हायला.” माधवराव आता वर्षाच्या समोर येऊन पुन्हा नोटा मोजू लागले. त्या बरोबर असल्याची खात्री करून घेतली आणि वर्षाला thank you म्हणून ते बाहेर चालू लागले. त्यावेळी वर्षाच्या नजरेतून माधवराव डोळ्यात आलेले पाणी पुसत असल्याचे सुटले नाही. ती काऊंटर सोडून बाहेर आली, माधवरावांना हाक मारून तिने जवळ असलेल्या बाकावर बसवले. “काका, काय होतंय? बरं नाही का? पाणी घ्या” वर्षाने काकांना पाणी दिले. पाणी प्यायल्यावारही काका अस्वस्थच होते. त्यांना गदगदून येत होते. हे पाहून वर्षा त्यांना पुन्हा विचारू लागली. “काका काय झालं, सांगा न मला please.”

माधवराव थोडे शांत झाले आणि बोलू लागले, “ताई गेली ५-७ वर्षे मी इथे येतोय तेव्हापासून मला सर्वजण ओळखतात. तुम्ही माझ्या मुलीसारख्याच आहात. आणि आता एवढं विचारताय म्हणून सांगतो. मागच्या महिन्यात पेन्शन घेऊन घरी गेलो. घाईत काऊंटरवर नोटा मोजून घेतल्या नाहीत. माझाच वेंधळेपणा हो! संध्याकाळी घरी मुलगा आल्यावर त्याच्या हातात पेन्शन ठेवले. त्याने ते मोजून घेतले आणि म्हणाला, “बाबा शंभर रुपये कमी आहेत” मी परत मोजले तर खरंच शंभर रुपये कमी होते. तर माझी सून म्हणजे सायली एकदम चवताळून मुलाला सांगायला लागली की खोटं बोलताहेत हे! १०० रु उडवून आले असतील हे कुठेतरी चांगलं चुंगलं खाऊन! बँकेतून कसे कमी पैसे मिळतील? आता १०० रु कमी आणलेत ना यांचा या महिन्याचा सकाळचा आणि दुपारचा चहा बंद करणार मी!”

माधवराव थरथरत होते. त्यांचे डोळे मात्र आता कोरडे झाले होते. पण वर्षाच्या डोळ्याला मात्र धारा लागल्या होत्या आणि वर्षाला कळून चुकले की मागच्या महिन्यात तिच्याकडे जास्त आलेले, excess आलेले शंभर रुपये खरं तर भावनांच्या deficit मध्ये होते. ऑफिसमधील ताळेबंद जमवता येतो पण ह्या क्षुल्लक वाटलेल्या १०० रुपयासाठी माधवरावांच्या घरचा ताळेबंद कसा जमवला पहा त्यांनी!

श्रीमती क्षमा सुरेश गोसावी.
वय वर्ष ६२.

 

6+
Posted on

ह्यांच पण आपल्यासारखं

1+

तो: “उगाच गडगडाट करायचा नाय हां, आपलं डोकं फिरलं ना तर अस्तिनातली वीज खुपसेन च्यायला तुझ्या आरपार. मग कळेल तुला तुझा पोकळपणा.”
ती: पण तू असा काळाकुट्ट होऊन सगळ्या जगातलं कुणाकुणाचं बाष्प साचवून माझ्यावर चाल करून येतोस ते काय मी नुसतं बघत राहायचं?
तो: “हे बघ, ते बाष्प वगैरे आपल्याला कळत नाय. त्यांना स्वतःत ठेवता येत नसतं ते सारं उडून जातं. एकदा सुटलं की वाफ कुणाचीच नसते, माझं भरत जाणं हे सुद्धा काही आयुष्यभर टिकणार नाहीये. शेवटी रीतं होत जाण हे सर्वांनाच हवंय.”
ती: पण मग त्यासाठी त्या विजांशी सलगी कशाला? मला नाही आवडत त्या विजा.
तो: ही असूया आहे तुझी, विजा बाळगून फिरायची काय हौस नाय आपल्याला. च्यायला आपल्याला पण वैताग आला ना की नाय कंट्रोल होत. तुझ्यासारखं नुसतं गडगडाट करत बसता येत नाही. सरळ एखादी वीज पडायची विषय संपला. नाही संपला तर संपेपर्यंत पाडत राहायची.

पुढे सुचवा…

1+
Posted on

पाऊस…

1+

पाऊस…
पाऊस धुंद पडतच होता सतत रिपरिप रिपरिप. भिंतीही घरातील आर्द्र हवेमुळे भिजल्या सारख्या वाटत होत्या आणि बाहेरची झाडी हिरवीगार तर सतत नहातच होती ओघळांवर ओघळ निथळत.  सर्वत्र सामसुमच होती दुपारची. कुठे बेडकांचा आवाज मधेच तर कुठे हवेमुळे फांद्यांची झुळझुळ. मंद सुगंध हवेचा शांतपणे घड्याळाचे काटे फिरवत होता. घड्याळही दुजोरा देत दर अर्ध्या तासाने मधुर संगीताची लकेर ऐकवत होते.. पण तरीही या भिजलेल्या वातावरणात आनंद नव्हता. कारण तो एकटा होता. एकाकी होता.

खरंच कोणी हवं ना आपल्याला गच्च बिलगून या शांत पावसात बरोबर चालणारं. ती प्रेयसीच हवी. या मोकळ्या रस्त्यांवरून वाहाणारा पाऊस आणि आपलं मन यात काहीच फरक नाही खरं तर. जे येतंय ते तसंच वाहून जातंय आयुष्य. पण झाडं मात्र कशी शिरशिरताहेत. कारण झाडं चित्रकार असतात . त्यांचे रंग खुलतात पावसात. काही सुकलेले रंग जिवंत होतात तर काही भळभळते रंग विरळ होतात. फुलंही ओल्या वार्याबरोबर झटकतात पाणी. हा निसर्गाशी सतत एकरूप होणारा आणि निसर्ग याच्याशी सतत बोलणारा. पाऊस पडतच होता. आधिच भिजुन आलेली रात्र त्याच्या मनात रहायला आली. तो निघाला बाहेर एकटाच..
त्याच्या मनात काळोख्या रस्त्यावरील मंद दिव्यांच्या प्रकाशात झिरमिरणारा पाऊस चित्रं काढत होता मनाच्या कॅनवास वर.
पावसाचा घनघोर नाही पण वजनदार आवाज याचं मन ढवळून काढतो. हलणार्या  पानांची भिजरी हसरी झाडं पहाताना हा स्पर्शासाठी तडफडतो त्याच्या सृजनशीलतेला जी कवेत घेईल अशा प्रेयसीची मनानेच वाट पहातो.
अशी पावसासारखी आपल्यावर कोसळणारी प्रेयसी हवीय त्याला.

पाऊस आपल्याला एकटं करून टाकतो का खरंच.. की पाऊस आणि प्रेयसीचं नातं जुनंच. मग तो लिहू लागला पावसाशी हितगुज करत..

पावसात भिजायचंय मला. पण कुठे शोधू तुला. किती पाऊस दरवर्षी आठवणींचा.
ढगांच्या साठवणींचा. येतो दूर देशाहून पण सुगंध इथल्याच मातीचा. तोच असतो दरवर्षी. मन ही तेच दरवर्षी. रस्ते फुललेले असतात छत्र्यांनी. पाण्याच्या रेघोट्या
ओला हवेला बांधणार्या. अंगभर तुझा शहारा. उगाच गर्दीत तुला शोधणारा..
भिजवतो आठवणींना मी छत्री करून जरा डळमळती. या वर्षीच्या पावसात मला हसायचंय. तू नसलीस तरी. शोधतो नवा चेहरा डोळ्यातून हृदयात जो डोकावेल. ज्याला तुझी झालर असेल. तुझा मोहकपणा आणी झिरमिर तुझ्या हास्याची असेल. या पावसात मला भिजायचंय नव्या मैत्रिणीबरोबर. जी तुझी कॉपी असेल वा नसेल पण तुझ्यापेक्षाही सोपी असेल.

पावसात नक्की काय होतं. पावसात नक्की काय होतं. हवा गार पिऊन झाडं म्हणतात. आम्ही कोणाला मिठी मारायची. रस्ते ओलेपणाने मस्त
प्रत्येकाच्या मागे धावतात. म्हणतात मला पण घेऊन चला. हवा म्हणते मलाही रहायला घर हवं. आणी पक्षी एकमेकांना चिकटून आडोश्याने अंधार पांघरून झ़ोपतात..

पुरूषांचा मदन आणि स्त्रियांमधली रति… एकमेकांसाठी कोणी हवं म्हणून भिरभिर भिरभिर भिरभिरतात. नवराबायको असलेले सारे लवकर घरी परततात सळसळत. वयात येणाऱ्या मुली वेड्या होतात. नी मुले बिचारी टकमक टकमक उमलणाऱ्या कळ्या पहात रहातात. साऱ्या जगावर पाऊस हा प्रेमाचा, अंतर्मनाला आग लावणारा, वेडेपणाला जागवणारा. आता सारं काही सुरळीत होईल. प्रत्येकाला एकमेकाची सोबत होईल. नवी फुलं, नव्या कळ्या, नवी फळं. नव्या मोसमाला झाली नव्याने पुन्हा तीच मुलं.

© भूषण भन्साली
bhushanbhansali76@gmail.com

1+
Posted on

पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे मनापासून आभार..

2+

पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे मनापासून आभार..
.
लहानपणी च्या आठवणी उकरून काढल्यावर लक्षात येत कि सगळंच बदललंय.. एक पाऊस सोडून.. चाळीच्या बिल्डिंगी झाल्या.. पत्र्याचा स्लॅब झाला.. गल्लीचे पॅसेज झाले.. आता पहिल्यासारख काही नाही.. पण मग MSEB वाले लाईट घालवतात.. मग एसी बंद होतो.. आणि पंख्याला पण स्टॅच्यू.. मग उघडते खिडकी.. आणि शिरतो गारवा.. थंड गार वारा.. लाईट गेली नसती आणि पाऊस पडला असता तरी पण तो गारवा तसा पूर्वी सारखा जाणवला नसता, कदाचित.. कारण हल्ली अंग भिजतच नाही.. घाम तसा सुटतच नाही.. मग गार काही वाटतच नाही.. बालपण काही आठवत नाही.. आणि म्हणून मग पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. अगदी मनापासून..

खिडकी उघडते.. घराची आणि मनाची.. मग ती उघडी नागडी शेमडी पोरं दिसतात.. धुमाकूळ घालणारी.. एखाद्या डबक्यात डुबकणारी.. आणि मग इथं मन भिजतं.. मनसोक्त..
.
एक खिडकी उघडावी,
अन किती तो फरक पडावा..
तिथे पाऊस पडावा..
अन इथे उर भरावा..
.
ती खिडकी घेऊन जाते लांब कधी ट्रेकिंग ला.. कधी बाईक राईड ला आणि निवांत समुद्र किनाऱ्याला.. एका खिडकीत इतकी ताकत असते हे ठाऊकच नव्हतं कधी.. म्हणून त्या mseb वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. कधी कधी.. खिडकी सुद्धा उघडते.. पाऊस आल्यावर आणि लाईट गेल्यावर.. आणि म्हणून मग पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. अगदी मनापासून..

2+
Posted on

पाऊस

2+

हवेतल्या गारव्याला कापत जीवाचा ढग करून आबा शेतकडं पळत गेला,
शेताजवळ आला तेव्हा पावसानं जोर धरला होता,
अंगातलं सारं अवसान गोळा करून त्यानं हातातला दगड त्या गळक्या आभाळाकडे भिरकावला. शिव्या हासडल्या आणि उभ्या उभ्याच कोसळला.
हाताशी आलेलं पीक पोरीच्या लग्नाची सोय करून देणार होतं.

2+
Posted on

ईबू ते ब्रोनॅटो

2+

माझ्याकडे एक डायरी आहे. तिचं नाव आहे ‘डायरी ऑफ आयडीयाज’ त्यात माझ्या खुरपती डोक्याला सुचलेले ‘उद्योग’ (किंवा उद्योगी डोक्याला सुचलेल्या खुरपती) लिहायची सवय आहे. तिथे मी माझ्या अकलेचे तारे मनमुराद तोडतो (हे माझ्या मित्रांचं मत). एखादी गोष्ट किंवा संकल्पना जेव्हा डोक्यात ‘क्लिक’ होते आणि जेव्हा त्याची ‘किक’ बसते तेव्हा मला कधी ते सगळं नोंदवून ठेवतो असं होतं. अश्या बऱ्याच ‘किक’ लागलेला मी माणूस आहे.

शैक्षणिक संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी २००८ मध्ये मी, चंदन तहसीलदार व साईनाथ टांककर यांनी मिळून एक शैक्षणिक प्रयोगशाळा सुरु केली होतीच. या प्रयोग शाळेत अनेक प्रयोग केले. अशातच २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात ईपुस्तकांच्या बाबतीचा एक लेख वाचनात आला. उत्सुकता वाढली. अधिक वाचन केलं. कल्पनांचे घोडे पिसाळल्या सारखे दाही दिशा उधळू लागले. आपण जे काही वाचतो आहोत त्यात भरमसाठ शक्यता आहेत, संधी आहेत आणि तेथे आपण खुपकाही करू शकतो (असे विचार येणं हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतंच). पुन्हा ‘किक’ लागली होती. ईपुस्तक उद्योगातील असणाऱ्या शक्यता व संधी यांच्या विचारांनी माझी अक्षरशः झोप उडवली होती. तेव्हाच ठरवलं ‘जी गोष्ट आपली झोप उडवू शकते ती गोष्ट करायचीच.’ माझ्या विचारांना एका कागदावर उतरवले ‘या उद्योगात काहीतरी करायचंय’ हा विचार माझी बाल मैत्रीण दिपाली मेस्त्रीला सांगितला, तिने काही सल्ले दिले व ‘कर’ म्हणत प्रोत्साहन दिले.

तेव्हा कामाला लागलो. अधिक माहिती काढली. मित्रांशी बोललो. धागे मिळत गेले. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. काय करायचं हे माहित असण्या सोबतच काय नाही करायचं हे देखील समजून घेतलं. तेव्हा जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मराठीमध्ये ईपुस्तक म्हणजे PDF हे समीकरण पक्क झालं होतं. आणि ते देखील ‘फ्री’.

यामुळे झालं असं होतं कि ‘ईपुस्तक’ क्षेत्र हे उद्योग म्हणून विकसित होण्या ऐवजी त्याची ‘सेवा’ झाली व एक चांगला उद्योग उभारी घेण्याच्या काळात ‘सेवा’ पुरवत राहिला व उद्योगासाठी लागणारे जागतिक मापदंड, गुणवत्ता, संशोधन, समस्या निवारण या गोष्टींचे संघटीत तर सोडाच पण स्पर्धा देखील सुरु झाली नाही.

 

 

मी निर्णय घेतला कि PDF करायचे नाही. त्या ऐवजी कोणत्याही स्मार्टफोनवर मजकूर ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणाऱ्या व वाचकांना उत्तम वाचनानुभव देणाऱ्या EPUB (Electronic PUBlications) प्रणालीचा वापर सुरू केला. खूप प्रयोग केले. अनेकदा चुका केल्या पण शिकत राहिलो. उत्साहच्या भरात अगदीच मोठ्या उड्या (झेप) घेण्याच्या नादात आर्थिक झळ देखील सोसली. एखाद्या उद्योगाची उभारणी करण्यासाठी संयम ठेवून काम करायला हवे हे कळले. ई-कॉमर्स व्यवसायातील बारकावे, आर्थिक तसेच कायदेशीर बाबी समजून घेतल्या. ईपुस्तकांची ‘चोरी’ किंवा ‘अनधिकृत हस्तांतरण’ रोखण्यासाठी DRM (डिजिटल राईट्स मॅनेजमेंट) मिळवणे किंवा स्वतःचे app काढणे यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक लागणार होती. पैसे तर नव्हतेच. तेव्हा ‘जुगाड’ कामी आला. कमीत कमी गुंतवणूक करून उद्योग कसा उभरता येईल यावर काम केलं. ईपुस्तकांसाठी नको तेवढी अत्याधुनिक वेबसाई बनवण्यात दीड वर्षे मेहनत केली. वेबसाईट सुरू झाली पण फसली. पण या दरम्यान लेखकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना EPUB बद्दल जागरूक करणे, काम मिळवणे यासाठी धडपड सुरू होतीच. माझी सहयोगी ‘कीर्ती पाटसकर’ हिचे वडील ‘श्री. श्रीकांत कुलकर्णी’ यांच्या पुस्तकाचे पाहिले काम मिळाले. आणि ईपुस्तकांची गाडी सुरु झाली. कीर्तीची सोबत या संपूर्ण प्रवासात खूप महत्वाची ठरली. वर्षभरात ७-८ पुस्तके मिळाली. मराठीतील बहुतेक पुस्तके युनिकोड फॉन्ट मध्ये नसल्यामुळे प्रिंट पुस्तकांची ई-आवृत्ती करणे हे मुख्य काम सुरू झाले.

हे पुरेसं नव्हतं. येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारण्याची कुठेही सोय नव्हतीच. एकतर संपर्कात येणाऱ्या कुणालाही EPUB माहीत नव्हते, त्याबाबत सगळा रिसर्च केला. शक्य तितक्या प्रकाशकांना भेटलो पण बहुतेकांना त्यांना ह्यात रस नव्हता. ज्यांना रस वाटला त्यांनी ‘रस’ तेवढा काढून घेतला (मला अलगद बाजूला सारून). एकंदरीत ‘चांगलाच’ अनुभव आला.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ‘सोशल मीडिया’ वापरायचं ठरवलं. पण फेसबुकवर तोपर्यंत ई पुस्तकात कार्यरत असणाऱ्यांचे प्रस्थ होतं म्हणून ट्विटर कडे मोर्चा वळवला. मिरवणुकीतला गणपती बघायचा तर गर्दी झालेल्या बिल्डिंग वर उड्या मारण्यापेक्षा दुसऱ्या इमारतीवर मोक्याची जागा शोधण्यासारखा हा प्रकार होता. २०१६ च्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने होणाऱ्या #ट्विटरसंमेलन मुळे मोठी संधी मिळाली. #ट्विटरसंमेलन च्या कवितांचे ईपुस्तक करणार म्हंटल्यावर प्रचंड प्रोत्साहन मिळाले. सोबतच EPUB फाईल कशी वाचायची याची माहिती प्रसारित केली. याचा फायदा २०१७ च्या ट्विटरसंमेलनाच्या वेळी झाला.

संकेतस्थळ फसले होते म्हणून ‘गुगल प्ले बुक्स’वर प्रकाशन सुरू केले. १९ सप्टेंबर २०१६ ला १००० डाउनलोडचा टप्पा गाठला.  २८ फेब्रुवारील २०१७ ला Bronato.com  या नावाने नवीन संकेतस्थळ सुरू केले. हे संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी हेमंत आठल्ये यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ब्रोनॅटो लवकरच बाळसं धरू लागलंय.

आज २६ देशांमध्ये २१,५०० डाऊनलोड पूर्ण झाले आहेत. 

स्मार्टफोन व किंडलच्या युगात आपला वावर तिथे देखील असावा हे काही प्रकाशकांनी हेरले असले तरीही PDF म्हणजे ईबुक्स अशीच अनेकांची धारणा आहे. पण जाणकारांनी बदलते वारे हेरले आहेत. EPUB बाबत जागरूकता मूळ धरू लागली आहे. मराठी ईपुस्तक उद्योग अजून बराच बाल्यावस्थेत आहे पण भविष्य उज्वल आहे. या उद्योगाच्या वृद्धीसाठी लागणारे तज्ज्ञ, बाजारपेठ अभ्यासक, गुंतवणूकदार व इतर संलग्न व्यावसायिक यांची मोट बांधत ईपुस्तक उद्योजकांमधील ‘स्पर्धात्मक सहकार्य’ यावर बरेच काही अवलंबून आहे.

पेपरलेस शिक्षणाच्या दृष्टीनेही EPUB खूप महत्वाचे आहे. भारतीय भाषांवर आधारित एक खुप मोठी बाजारपेठ आहे. व्यावसायिकता, जागतिक दर्जा व सृजनशीलाता यांवर आधारित व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. मराठी ई पुस्तक उद्योग यात आपले कर्तृत्व नक्कीच सिद्ध करेल. तोपर्यंत तुम्ही ई पुस्तके (EPUB) वाचा आणि इतरांना देखील सांगा.

या प्रवासात मोलाची साथ देणारे प्राजक्ता तांडेल, राजेंद्र सानप, विजय पडघन, जुईली मेस्त्री यांच्या सोबत पुढील प्रवास सुरु आहे. या उद्योगात आमच्यासोबत येण्यासाठी नक्की संपर्क करा.

लोभ असावा.
शैलेश खडतरे– 9970051413.
www.bronato.com

2+
Posted on

पुस्तक तुमचे, जाहिरात तुमची.

2+

हल्ली बरीच पुस्तके संकेतस्थळांच्या माध्यमाने विकली जात आहेत. तुमचे अमुक पुस्तक अमुक अमुक संकेतस्थळावर विक्रीसाठी असल्यास आम्ही त्याची निःशुल्क जाहिरात करू. Bronato.com ला भेट देणाऱ्या आमच्या वाचक वर्गाला तुमचे पुस्तक देखील नजरेस पडावे व त्यातून तुमच्या पुस्तकांच्या प्रसारास आमचा देखील हातभार लागावा असा आमचा हेतू आहे.

या निःशुल्क जाहिरातीसाठी काय करावे लागेल?

अगदी सोपे आहे.

Bronato.com वर अकाउंट उघडा (साईन अप करा).
आणि मग पुढील माहिती आम्हाला WhatsApp ने ९९७००५१४१३ येथे पाठवा.

१. पुस्तकाचे शीर्षक-
२. प्रकाशन दिनांक-
३. प्रकाशनाची वेळ-
४. पुस्तकाची लिंक- *(संकेतस्थळावर जेथे पुस्तक उपलब्ध आहे ती लिंक)
५. मुखपृष्ठ- 600 x 900 pixels
६. मनोगत-
७. प्रस्तावना-
८. किंमत-

तुम्ही आम्हाला माहिती पाठवल्यावर पुढील काम आमचे. इतकं सोपं आहे.

कृपया नोंद घ्या:
१. BRONATO.com कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करणार नाही.
२. तुमच्या पुस्तकावर क्लिक केल्यावर वापरकर्ते तुम्ही दिलेल्या लिंक वर पोचतील. खरेदी तिकडे होईल.
३. पुस्तकांची लिंक स्वीकारण्याचा व जाहिरात करण्याचा निर्णय सर्वस्वी आमचा असेल.
४. अक्षेपार्य लिंक देणाऱ्यांचे अकाउंट रद्द केले जाईल.

विनंती : इतर लेखकांपर्यंत या निःशुल्क सेवेची माहिती पाठवा.

लोभ असावा.

2+
Posted on

ब्रोनॅटो संकल्पना

0

‘ब्रोनॅटो’ हा एक अर्थमुक्त शब्द आहे. मी संकेतस्थळासाठी नवीन नावाचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा अचानक हा शब्द मनात चमकला. त्याची चमक इतकी मस्त होती की ‘हेच ते नाव’ ‘यस!!’असा अनुभव झाला आणि मनात ‘ब्रोनॅटो… ब्रोनॅटो’ नावाचा जप सुरु झाला.

ब्रोनॅटो हा शब्द नेट वर शोधला तर हा शब्दच इंग्रजी भाषेत नव्हता. हायसं वाटल. म्हणजे या शब्दाचा ‘अर्थ’ आपण निर्माण करू शकतो असे वाटले. Continue reading ब्रोनॅटो संकल्पना

0