“दादर स्टेशन यायला अजून किती वेळ आहे?” मी माझ्या शेजारच्या प्रवाशाला विचारलं.
“साधारणतः १० मिनिटं” ते म्हणाले
“अच्छा Thank You काका”
हळूहळू लोकं आपआपल्या सामानासह दरवाज्याकडे रांग लावत होती. मी सुद्धा माझं सामान एकत्र केलं. गाडीचा वेग आता जरा मंदावला होता पण माझ्या हृदयातली धडधड मात्र वाढली होती. अर्थात नव्या शहरात चाललो आहे ह्याची उत्सुकता होतीच पण त्या सोबत थोडी भीतीही होती.
एक अनोळखी शहर, त्या शहरातील अनोळखी माणसं आणि त्याच शहराचा आता आपणही एक भाग होणार ह्याचं कुतुहल.
मुंबई सारख्या ह्या मायानगरीत येणं हे माझ्यासाठी एक स्वप्नंच होतं जणू. जसं अनेकांचं असतं ना, अगदी तसंच.
आज मला ते पूर्ण होताना दिसत होतं. एक नवीन प्रवास सुरू होणार होता. आनंद तर होताच पण मनाला थोडी हूरहुर लागून राहिली होती. घरून निघताना आईचा तो हळवा झलेला चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता. आईला असं एकटं सोडून इतकं लांब मी ह्या अगोदर कधीच आलो नव्हतो. येताना मलाही खूप त्रास झाला होता पण MBA चं शिक्षण मुंबईत घ्यायचं ही माझीच इच्छा होती आणि आईलाही ती मान्य होती.
बघता बघता दादर स्टेशन आलं. सगळेच घाईघाईने उतरत होते. तसा मीही उतरलो. मुंबापुरीच्या जमिनीवर पाय ठेवताच माझं स्वागत झालं ते स्टेशनवरच्या अलोट गर्दीनं. खरं सांगतो, हे पाहून मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो. ह्या आधी इतकी माणसं कधी पाहिली नव्हती. जिथे बघावं तिथे दिसत होती ती नुसती माणसे. कसाबसा त्यातनं वाट काढत मी स्टेशन बाहेर पोहोचलो अन् सुटकेचा निश्वास सोडला. आईला फोन करून कळवलं.
कधी एकदा रूमवर जातो असं झालं होतं. थकवा जाणवत होता. भूकही प्रचंड लागली होती. खायचं कुठे हा प्रश्न होता. इतक्यात समोरच एक वडा पावची गाडी दिसली. तिथेही चिकार गर्दी. ज्या मुंबईच्या वडा पावाबद्दल ऐकून होतो तो खाल्ला आणि मन अगदी तृप्त झाले.
मुंबईला येण्याआधीच मी फोनवरून PG म्हणून प्लाझा जवळ रूम घेतली होती.
” काका प्लाझाला कसं जायचं? ” मी एका माणसाला विचारलं.
” समोरून तुम्हाला Taxi मिळेल ”
” ओके थँक्यू ”
समोरच्या बाजूला लगेच Taxi मिळाली आणि त्यानं मला प्लाझाकडे सोडलं खर पण नेमका पत्ता शोधताना मात्र माझा गोंधळ उडाला होता. मला माझी बिल्डिंग काही सापडेना. मी माझ्या केअर टेकरना फोन लावला. तो काही लागला नाही.
अनेकांना पत्ता विचारला तर कुणी म्हणालं राईटला आहे, कुणी म्हणालं लेफ्ट. बिल्डिंग कुठल्या एका गल्लीत होती म्हणून लोकाना बहुतेक ती माहीत नसावी. माझी शोध मोहिम सुरुच होती.
जवळपास तास उलटून गेला. आता मात्र मला भिती वाटू लागली. आईची आठवण येत होती. काय करावं तेच समजत नव्हतं. हळूहळू काळोख होत होता. मी हताश होऊन एकटाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. मी आणि माझं सामान. ह्या अनोळखी शहरात जाणार तरी कुठे?
आजूबाजूला गाड्यांची तसंच माणसांची खूप वर्दळ होती पण तरीही एकटं वाटत होतं…
रात्र झाली तशी मनातली भीती अजून वाढत होती. नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी पुन्हा दादर स्टेशनकडे जावं आणि तिथल्या वेटिंग रूममध्ये राहावं असं मी ठरवलं. आईला ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. नाहीतर उगाच ती काळजी करत बसली असती.
सामान उचललं आणि प्लाझावरून दादर स्टेशनला निघालो. नेमका रस्ता माहिती नसल्याने असंच एका गल्लीत शिरलो तर तिथे मला स्वामींचा मठ दिसला. मठाची दारं बंद होती. फक्त एक छोटी खिडकी उघडी होती ज्यातनं स्वामींचा फोटो दिसत होता. मी हातातलं सामान खाली ठेवलं. डोळे मिटले अन् स्वामींकडे प्रार्थना केली.
“स्वामी आज मुंबईत पहिल्यांदा आलोय. काही स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करायला. तुमचा आशीर्वाद असुद्या. आता सुद्धा खूप एकटं एकटं वाटतंय. भीती वाटतेय. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजिले असणार. ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. लक्ष असुद्या”
तिथून पुन्हा स्टेशनकडे चालायला सुरूवात केली. इतक्यात खिशातला फोन वाजला. केअर टेकरांचा होता.
“हेलो…”
“हेलो.. हा कुणाचा नंबर आहे? आताच मी १०-१२ मिस कॉल पाहिले”
“मी समीर बोलतोय. समीर वामन खानोलकर. तुमचा पी. जी.. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. मी मुंबईत आलोय. तुमचं घर सापडेना म्हणून फोन केलेला पण तुम्ही उचलला नाही..”
“सॉरी.. खरंच खूप सॉरी.. मी कामात गुंग होते आणि फोन सायलंटवर होता हे लक्षात आलंच नाही.. आता मिस कॉल पाहिले..”
“मी खूप घाबरलेलो. आता पुन्हा दादर स्टेशनला निघालो होतो.”
“आता कुठे आहेस?”
“मी आता स्वामींच्या मठाजवळ आहे”
“अच्छा.. थांब तिथेच.. मी येते तुला घ्यायला.”
त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या जिवात जीव आला. खरंच ही सारी स्वामींची कृपा होती. मी पुन्हा हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले.
मी उभा होतो. इतक्यात एक वयस्कर बाई येताना दिसली.
“समीर??”
“हो”
“मी मनोरमा दिक्षित. चल सोबत माझ्या.. दोन बिल्डिंग सोडून आपलं घर आहे.”
आम्ही घरी आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. सामान खोलीत ठेवलं इणि फ्रेश झालो. दिवसभरात जाम थकलो होतो पण अखेर मुंबईत आलोच ह्या उत्साहात तो जाणवत नव्हता. मला अतोनात आनंद झाला होता.
“काय रे सामान ठेवलं का व्यवस्थित? ये दोन घास गरम जेवून घे.. थकला असशील.. जेवला की बरं वाटेल. शांत झोप लागेल.. माझ्यामुळ्ये उगाच तुझी गैरसोय झाली.”
“आजी.. All is well that ends well..तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका”
मी जेवायला बसलो. भूक लागलीच होती. आजींच्या हाताला चव होती. जेवल्यावर छान वाटलं. बिछान्यावर पडलो तशी लगेच शांत झोप लागली. मुंबईतली पहिली रात्र. उद्यापासून एक नवं आयुष्य सुरू होणार होतं. एक नवीन प्रवास.. तो पर्यंत डोळ्यांत स्वप्न घेऊन लागलेली ती पहिली शांत झोप..
रात्र ही सरणार
घेऊन स्वप्नं नवी..
दिवस नवा उजाडणार
सुखाचा आरंभ होणार..
मुंबईत येऊन आता जेमतेम दोन दिवस झाले होते. ह्या अनोळख्या बलाढ्य शहरात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं असं जरी मी म्हटलं तरीही आता मात्र मला एक हक्काचं असं माणूस सापडलं होतं. त्या म्हणजे माझ्या केअर टेकर आजी. अगदी दोन दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. वयानं जरी म्हाताऱ्या असल्या तरी त्यांच्यातील ऊर्जा इतकी अफाट होती की एखाद्या लहान मुलालाही लाजवेल.
दिवसभर स्वतःला कामात बुडवून घ्यायचं. सतत काही ना काही काम सुरूच.
“काय रे समीर, आज रात्रीच्या जेवणात काय बेत करायचा?”
“अहो आजी, असं काही नाही तुम्ही नेहमी करता तसंच करा. उगाच माझ्यासाठी म्हणून वेगळं काही नको. खरंच”
“वेगळं वगरे काही नाही. उलट तुझ्या आवडीचं करायला मला आवडेल”
“कशाला हो उगाच. तुम्ही थकत नाही का? दिवसभर इतकं काम करत असता ते.”
“इतकी वर्ष झाली. एकटीच राहतेय. सगळं स्वतः करते. आधी एकटेपणा जाणवायचा. हे रिकामं घर खायला उठायचं. मग स्वतःला कामात बुडवून घेतलं. मसाले, पापड, लोणची करून विकायचे.. असो.. माझ्या मेलीची बडबड आपली सुरूच राहणार.. तू सांग जेवणाचं काय ते? बिर्याणी करू का? आवडेल का?
“हो आजी. आवडेल”
आजीच्या त्या बोलण्यामागे कुठेतरी एक खंत जाणवली. प्रत्येक माणसाची अशी एक स्टोरी असते. तशीच आजींचीही होती. नक्कीच काहीतरी घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. खोलवर कुठेतरी उरात जखम होती.
रात्री आजीच्या हातची चमचमीत बिर्याणी खाल्ली. अगदी मायेने त्यांनी केली होती.
जेवणानंतर आजी सगळं आवरून ठेवायच्या. दोन दिवसांत मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे त्या स्वच्छते बाबत फार काटेकोर होत्या. घर कायम नीट नेटकं असायचं.
“आजी ती ताटं द्या मला. मी आवरून ठेवतो”
“काही नको. तू आराम कर. रात्रही फार झाली आहे. झोप हवं तर. माझं होतच आलंय”
“झोप येत नाही मला. आजी जर तुम्हाला चालणार असेल तर आपण छान गप्पा मारूया का?”
“हो चालेल.”
“तुम्हाला झोप तर आली नाही ना?”
“नाही. उलट तुझ्याशी गप्पा मारल्या तर छानच वाटेल”
आम्ही खिडकीपाशी बसून छान गप्पा टाकल्या. आजी मला मुंबई बद्दल सांगत होत्या. इतक्या वर्षात मुंबई कशी बदलत गेली त्या बद्दलही सांगत होत्या.
एकीकडे आजीच्या गप्पा तर दुसरीकडे खिडकीतून ती शांत तरीही गजबजलेली मुंबई दिसत होती.
“आजी तुमच्याशी गप्पा मारून खूपच मज्जा आली”
“मलाही छान वाटलं. इतक्या वर्षांनी कुणाशी इतक्या गप्पा मारल्या मी. पूर्वी मी आणि रोहन सुद्धा अशाच रात्री गप्पा मारत बसायचो.”
“रोहन?”
“काही नाही. रात्र फार झाली आहे. चल झोपायला”
असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेल्या. अन् मी पाहत राहिलो त्यांच्याकडे.. मनात असंख्य प्रश्न घेऊन.
मन अस्वस्थ झालं होतं. सारखा मनात एकच विचार होता की हा रोहन कोण असेल!
आजींचा मुलगा असेल का? किंवा मग नातू? पण मग त्यांनी त्याच्या बद्दल बोलणं का टाळलं असावं? हा रोहन जो कुणी आहे तो आता कुठे असेल? काय करत असेल? की मग…
मनात भलते सलते विचार येऊ लागले. हे विचारचक्र असंच सुरू राहिलं आणि ह्यातच रात्र सरली पण त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडेना.
कसं सांगू तुम्हाला
अंतरी माझ्या काय चाललंय ?
घुसमटलेले विचार
अन् मन खवळलंय..
सकाळी आजी नेहमीप्रमाणे देव घरात पूजा करत बसल्या होत्या. मी ही देवासमोर हात जोडले. पूजा झाल्यावर आजींनी बनवलेला गरमागरम नाश्ता केला.
“काय रे समीर, कॉलेज कधीपासून सुरू होणार?
“१ तारखेला होणार. तो पर्यंत जरा आराम”
“बरं. मग आज बाहेर जायचं का फिरायला? बघ म्हणजे जर तुला चालत असेल तर”
“अहो का नाही चालणार. नक्कीच चालेल”
“ठरलं तर मग. आज बाहेर फिरू आणि मग बाहेरच जेवू.”
“चालेल”
आम्ही सर्वात आधी सिध्दिविनायक मंदिरात गेलो. तिथून आम्ही मग शिवाजी मंदिरला मस्त नाटक बघितलं. मग तिथून मग आम्ही हॉटेलात जेवलो.
“एक काम करू आता घरी जाऊ आणि मग सायंकाळी शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर बसू. छान गप्पा मारू”
आजी आज फार उत्साहात आणि आनंदात दिसत होत्या. त्यांना बघून मी ही आनंदात होतो. अर्थात मनाच्या एका कोपऱ्यात ‘रोहन कोण’ हा प्रश्न होताच. असो.
संध्याकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही पार्कात गेलो. तिथे कट्ट्यावर बसलो.
“कसा होता मग आजचा दिवस? मजा आली का?” आजींनी विचारलं
“आजचा दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. जाम धमाल आली”
“छान. मलाही बरं वाटलं. खूप दिवसांनी मी अशी बाहेर आले. पूर्वी खूप फिरायचे पण मग सगळंच बंद झालं”
” आजी एक प्रश्न विचारू?”
“मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?”
“हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही.”
“सांगते..” आजी थोड्या हळव्या झाल्या.
“मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी..”
आजी सांगत होत्या आणि तितक्यात माझा फोन वाजला.
रोहन बद्दल सांगताना आजी जरा भावूक झाल्या होत्या.
“२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं कसं छान चाललं होतं. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नातू रोहन. घर अगदी माणसांनी भरलेले असायचे. रोहन तेव्हा पाच वर्षांचा होता. चिमुकल्या पावलांनी घरभर हिंडायचा. बोबड्या आवाजात बोलायचा. आजी..आजी.. करत सारखा अवती भवती फिरायचा. त्याच्या मागे मागे धावताना माझी दमछाक व्हायची खरी पण गंमतही तितकीच यायची. वेळ कसा जायचा हे समजायचंही नाही. आम्ही दोघं खिडकीपाशी बसून गप्पा मारायचो. तो मला कार्टूनच्या गोष्टी सांगायचा तर मी ही त्याला बोध कथा सांगायचे. ते दिवसच वेगळे होते. त्याला कार्टून फिल्मस् खूप आवडायच्या. मग आम्ही असंच बाहेर जायचो. फिल्म बघायचो. हॉटेलात खायचो. इथेच कट्ट्यावर येऊन बसायचो. ही जागा त्याच्या आवडीची होती आणि म्हणूनच माझीही”
आजी सांगता सांगता थांबल्या. त्यांच्या चष्म्यामागून आलेला तो अश्रूचा थेंब खूप काही सांगत होतं. त्यांचं त्यांच्या नातवावर किती प्रेम होतं हेच ह्यातून दिसत होतं.
“आजी मग आता रोहन कुठे असतो? नाही म्हणजे मी इथे आल्यापासून कधी दिसला नाही किंवा कुठला फोन आला नाही म्हणून विचारलं?”
“फोन आला नाही हे खरं आहे पण कधी येणारही नाही हेही तितकंच खरं आहे.”
“मला वाटतं उशीर खूप झाला आहे. आपल्याला निघायला हवं.”
“पण आजी…”
“चल म्हटलं ना..”
सिनेमा ऐन रंगात यावा आणि तेव्हाच नेमकी वीज जावी. उत्कंठता शिगेला पोहोचावी आणि गोष्ट अर्धवट राहवी. तसंच काहीशी अवस्था माझी झाली होती. रोहन बाबत उत्कंठता ताणली गेली होती.
आम्ही घरी पोहोचलो. आजी फार काही बोलल्या नाहीत. आपल्या खोलीत शांत बसून होत्या. मीही त्यांना काही विचारायला गेलो नाही. त्या दुखावल्या होत्या हे जाणवत होतं. रोहनचा विषय काढून अजून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
मी ही स्वतःशी ठरवलं की आता जो पर्यंत आजी रोहन बद्दल सांगत नाही तो पर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही.
दिवसभर आजी सोबत खूप छान वेळ गेला. आईला फोन केला. तिच्याशी दिवसभर घडलेली प्रत्येक गोष्ट शेयर केली. आजींबद्दल सांगत होतो. तिलाही बरं वाटलं ऐकून.
रात्र फार झाली होती . मी खोलीचा दिवा बंद केला. आजींच्या खोलीत डोकावलं तर त्या शांत झोपल्या होत्या. मग मीही झोपलो.
रोहनचा विषय संपला होता माझ्यासाठी पण प्रश्न अनुत्तरीत होताच. रोहन कुठे आहे? आजींचा मुलगा व सून ते कुठे असतील? आजोबा कुठे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी माणसं असूनही आजी अशा एकट्याच का? ह्या २० वर्षात असं काय बदललं?
हा विषय संपला असं म्हटलं खरं पण मन हे आपुले. विचार करायचे थोडीच थांबतंय. विचारचक्र सुरूच.
रोहनचा विषय तात्पुरता तरी माझ्यासाठी संपला होता कारण त्यातच अडकून राहिलो तर मुंबईला येण्याचं माझं मूळ उद्दिष्ट बाजूला राहिलं असतं. आजींना हा विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना दुःख होईल असं काहीही वागायचं नाही असं मी ठरवलं.
सकाळी मी माझं सगळं आवरून खोली बाहेर आलो तेव्हा तिथे आजी बसल्या होत्या. आनंदी दिसत होत्या. स्वतः मधे मग्न होत्या. गाणं गुणगुणत होत्या.
“Good Morning आजी”
“काय मग झोप झाली का छान?”
“हो आजी”
“बरं बस इथे. मी गरम कांदे पोहे केले आहेत ते आणते” असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या.
“लिंबू पिळून देऊ का?” आतून आवाज आला.
“हो चालेल”
“आणि खोबरं?”
“थोडं चालेल”
आजी आतून छान गरमागरम कांदे पोहे घेऊन आल्या.
“काय रे ते तुझ्या कॉलेजमध्ये तुला मार्कशीट का काय द्यायचा होत्या असं म्हणाला होतास. ते कधी जाणार आहेस?”
“अरे हो. मी विसरलो होतो. थँक्स आजी आठवण केल्याबद्दल. आजच जाऊन येतो.”
“चालेल. लगेचच करून टाक. अशा महत्त्वाच्या कामात उगाच दिरंगाई नको.”
“हो नक्की.”
पोहे खाऊन झाल्यावर मी लगेचच कॉलेजला जायला निघालो. आजी म्हणाल्या होत्या की नाक्यावरच्या बस स्टॉपवर मला बस मिळेल.
मी बसची वाट बघत उभा होतो. गरमीचे दिवस असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या.
“वडाळ्याला जायला बस इथेच मिळेल ना?” मी शेजारच्या माणसाला विचारलं.
“होय”
इतक्यात मला बस येताना दिसली. मी त्यात चढलो आणि एक आजोबा बसले होते त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. अगदी साधी वेषभूषा होती त्यांची.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.
मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा, ही चित्र कुठून आणली? अप्रतिम आहेत!”
हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, “बाळा ही मी स्वतः काढली आहेत.”
मला आश्चर्याचा धक्का बसला.
“वाह! तुम्ही चित्रकार आहात ? ”
“हो. म्हणजे अगदीच चित्रकार असं नाही पण हौस म्हणून काढतो.”
“क्या बात है”
“तू विचारलं म्हणून सांगतो. लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.
पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नीचे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव!”
त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रूचा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.
बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…
बस मधून उतरल्यावर समोरच कॉलेजची इमारत दिसली. इंटरनेट वर फोटो पाहिला होता खरा पण प्रत्यक्षात सुद्धा ती वास्तू तितकीच सुंदर होती.
खरंतर शिक्षणाची आवड मला अगदी लहानपणापासून होती. शाळेत असताना नेहमी चांगले मार्क्स असायचे. देवाच्या कृपेने हुशारही होतो. उच्च शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं.
माझं बालपण हे खरंतर एका छोट्याशा खेड्यात गेलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती पण आईने झेपेल तसं सगळं केलं. दिवस रात्र राबायची बिचारी. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च तिने केला. ते कधीच थांबू दिलं नाही. आईने केलेल्या कष्टाची जाणीव मला होती. कॉलेजला जायला लागल्यावर मी सुद्धा एक छोटीशी नोकरी धरली. तिथेच गावातच. पगार काही फार नव्हता पण तेवढीच आईला मदत.
हळूहळू खर्च वाढू लागले. आईच्या ही अवाक्या बाहेर जात होतं सगळं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच टेंशन दिसायचं मला. बाकी कसलंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही ना घेता येत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
एकदा असंच मी तिला म्हटलं की आता पुढचं शिक्षण नको. त्याचा खर्च वाचेल आणि पूर्ण वेळ नोकरी करता येईल. तेव्हा आई खूप चिडली माझ्यावर आणि म्हणाली “जो पर्यंत तुझी आई जिवंत आहे तो पर्यंत तरी तुला असं काहीही करायची गरज नाही. तुला वाटतं ना की पैशाची जुळवाजुळव करताना मला त्रास होतोय. तर हो..होतोय मला त्रास..पण जर तू शिक्षण सोडलं तर मला होणारा त्रास हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यामुळे पुन्हा कधी शिक्षण सोडण्याची भाषा करायची नाही.”
दिवस सरत होते. आम्ही जगत होतो. माझ्या आईची स्वामींवर फार श्रद्धा होती. ती नेहमी म्हणायची की आपण कष्ट करत रहायचे. स्वामी आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील.
तिचा हाच विश्वास खरा ठरला. ऐके दिवशी मावशीचा फोन आमच्या शेजारच्या घरी आला. तिने आईला सांगितलं की कुठलीतरी जुनी जमीन होती म्हणे वडिलांची त्यांच्या. कित्येक वर्ष अशीच होती. ती विकली गेली ३० लाख रुपयांना आणि त्यातून आलेले पैसे तिघं भावंडं वाटून घेणार. आईच्या वाटेला १० लाख रूपये आले.
आमची परिस्थिती बदलत गेली. आईचा ताण कितीतरी कमी झाला. मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तरा नशीब सुद्धा आपलं साथ देतं ह्यावर माझा विश्वास बसला.
हे सगळं सुरू असताना माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबईच्या कॉलेजात MBA करायचं मी ठरवलं.
आपलं नशीब आपल्या हाती
दोष इतरांना देऊ नका..
आपण घडवू तसंच घडेल आयुष्य
रोष इतरांवर काढू नका..
आमच्या घरात तशी अजून एक व्यक्ती सुद्धा रहायची. सांगायला विसरलो. माझे वडील. पण त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं..
कॉलेजमध्ये मार्कशीट देऊन मी पुन्हा घरी आलो. आजींशी गप्पा मारत बसलो. मी माझ्या वडिलांविषयी बोलणं टाळतो हे आजींना ही माहित होतं. त्यांनी मला ह्या विषयी एकदा विचारलं होतं पण नंतर पुन्हा कधीही हा विषय काढला नाही. कदाचित जसं मी त्यांना रोहनबद्दल विचारायचं थांबवलं होतं तसंच.
आम्ही वेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. जाताना बसमध्ये भेटलेल्या त्या आजोबांबद्दल सांगत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटलं की मला लिहायला आवडतं. कविता करतो कधीकधी.
“काय सांगतोस? कविता ?? मला ऐकव की..”
“नाही हो.. येवढं काही चांगलं जमत नाही ”
“असू दे. तरीही ऐकव”
“बरं..”
मी माझ्या कवितांची वही आणली.
आजी मी तुम्हाला ‘माणूस’ ही माझी कविता ऐकवतो. माणूस कसा असावा ह्या संदर्भातील ही कविता आहे.
माणूस
परिस्थितीशी झुंज देणारा
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..
प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही
शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..
मनात झालेला विचारांचा गुंता
अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..
राग आला कितीही तरी
मनात त्याच्या क्रोध नसावा..
कठीण समय आला जरी
चेहरा कायम प्रसन्न असावा..
परिस्थितीशी झुंज देणारा
असा माणूस व्हायला हवा..
आसवे गाळावे त्यांनीही
पण मानसिकरीत्या खंबीर हवा..
“वाह! छान! खरंच आवडली. खूप छान लिहिली आहेस”
“थँक्स आजी”
“अजून एखादी ऐकव ना. आता तर माझ्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत”
“काहीही काय आजी. उगाच माझी मस्करी करताय का..”
“अरे खरंच मनापासून सांगतेय”
“बरं मग मी अजून एक कविता सादर करतो”
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.
जुने रस्ते नव्या वाटा
जुनेच किनारे नव्या लाटा
जुन्या जखमा नवं दुखणं
जुनेच डोळे नवी स्वप्न
जुनी ठेच नव्यानं लागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं
जुनी वस्तू नवी किंमत
जुनाच खेळ नवी गंमत
जुना झोपाळा नवे झोके
जुनंच घड्याळ नवे ठोके
जुना आशीर्वाद नव्यानं मागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं
जुनी माणसं नवे छत्र
जुनीच अक्षरं नवी पत्र
जुने पेच नवे प्रसंग
जुन्याच अपेक्षा नवे भंग
जुना स्वभाव नव्यानं वागणं
जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..
माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.
सकाळ झाली. मी अजूनही त्याच विचारात होतो की मला फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण असेल?
त्या नंबर वर मी पुन्हा फोन लावला. अजूनही लागला नाही. फोनच्या ॲपवर नंबर शोधला तरी सापडला नाही. कदाचित राँग नंबर असेल म्हणून मी विचार सोडून दिला.
बघता बघता मुंबईत येऊन मला दोन आठवडे झाले होते.आज पासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. मी निघताना आजींचा आशीर्वाद घेतला अन् निघालो.
रिमझिम पाऊस पडत होता. कॉलेजचा परिसर छान हिरवागार होता. मी बिल्डिंगच्या आत शिरलो आणि माझा वर्ग शोधला. सगळेच नवे चेहरे होते. एक बाक रिकामा दिसला. तिथे जाऊन मी बसलो.
आमचं इंडक्शन सेशन सुरू झालं. प्रत्येक जण आपली ओळख करून देत होते. मी ही दिली. पहिला दिवस असाच गेला. निघताना काही मुलं घोळक्यात उभी होती. नवी नवी मैत्री झालेली पण माझी नजर गेली ती एका मुलावर. तो एकटाच उभा होता.
मी त्याच्या जवळ गेलो.
“हाय.. मी समीर”
“हाय”
“नाव काय रे तुझं?”
“रोहन.. रोहन दिक्षित”
मी हे नाव ऐकून चक्रावलो. हाच का आजींचा नातू? की फक्त नावात साम्य? मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
to be continued…