Posted on

‘जू’ चे लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचा सन्मान

0

||घोगस पारगाव जि. बीड||

लेखन ही माझ्यासाठी स्वत:ला खोदत जाण्याची गोष्ट आहे.

ही गोष्ट मी फार निगुतीने अन जीव लावून करतो. ज्या कृषीसंस्कृतीत मी वाढलो तिथेच माझी ही धारणा पक्की झालीय. तिच्याशी जराही प्रतारणा केली तर मलाच घुसमटून श्वास कोंडल्यासारखं होईल.

लेखकाने स्वत:ला सतत खणत जावे; असं मी स्वत:ला बजावीत असतो. जसे आपण जमीन खोदत जातो अन पाण्यापर्यंत पोहचतो! पाण्यापर्यंत पोचण्याचा प्रवास इतका सोपा नसतो; हेही मला माझ्या कृषी संस्कृतीने शिकवले आहे. साहित्य लिखाण हा माझ्या छंद नाही. साहित्य मला जिवंत ठेवणारी अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे. शब्दांच्या मुशीत जगता जगता शब्दांच्याच मांडीवर डोकं ठेवून मरून जाण्याची इच्छा मी बाळगतो. ही कवी कल्पना नाही! शब्दांशिवाय मला करमूच शकत नाही.

हे सगळं सांगायचं कारण जेव्हा याच शब्दांची नोंद घेऊन सन्मान बहाल होतो. तेव्हा त्या सन्मानाचं मला अप्रूप वाटतं. स्व. कडुबाई गर्कळ हा पुरस्कार माझ्या ‘जू’ आत्मकथनाला नुकताच मिळाला. या पुरस्काराने मला रोख रक्कम मिळाली. स्मृती चिन्ह मिळालं; पण त्याही पलीकडे जाऊन मला निखळ माणुसकीची व्याख्या जगणारी माणसं मिळाली. साहित्याने माणूस जोडला जावा हीच तर भूमिका घेऊन जर मी लिहीत असेल, अन माणसांच्या घनदाट गर्दीत आपल्याला अशा माणसांचा सुगावा लागावा ही खूप मोठी कमाई मी समजतो. कवी बाळासाहेब गर्कळ या माणसाने जे प्रेम दिलं ते शब्दातीत आहे. ‘घोगस पारगाव’ सारख्या खेडेगावात हा माणूस साहित्याचा जो यज्ञ करतो आहे तो कौतुकासपद आहे. पीक उगवून आणण्याचा कृषी संस्कृतीचा धर्म, मात्र इथे माणुसकीचे अन संवेदनशीलतेचे पीक तरारुन उगवून आलेले मी पाहिले, ते पाहून मी खरोखर हरखून गेलो. त्यांनी केलेला ‘पाहुणचार’; पुरस्कार बिरस्कर ही गोष्टच बाजूला राहून जाते. अशी माणसं मिळत गेली की मला त्या पुरस्काराचं मोल वाटतं. अन्यथा शोकेसमध्ये स्मृतीचिन्ह तेवढं जागा घेवून बसतं…!

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *