Posted on

“थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” जाहीर

0

 

—————————————————————–

प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी मानकरी
——————————————————————

सोलापूर : प्रतिनिधी
थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूरतर्फे “थिंक टँक राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” प्रा. श्रीमंत कोकाटे, डॉ. सुनील अवचार, वंदना कुलकर्णी यांच्या ग्रंथांना जाहीर झाल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पुरस्काराचे वितरण शनिवार, 27 जानेवारी 2018 रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

थिंक टँक पब्लिकेशन्सतर्फे चौथ्या वर्धापनदिनानिमित्त यंदापासून प्रथमच “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार” देण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जवळपास 113 ग्रंथांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र चरित्र)” या ग्रंथास दिवंगत पोलिस अधिकारी वसंतराव पगारे यांच्या स्मरणार्थ, डॉ. सुनील अवचार यांच्या “केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ (काव्यसंग्रह)” ग्रंथास दिवंगत सुभेदार सोनाप्पा मागाडे यांच्या स्मरणार्थ, तसेच वंदना कुलकर्णी यांच्या “काव्य सरिता सोलापुरी (संपादन)” या ग्रंथास दिवंगत जनार्दन गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत.


रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. शनिवारी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भरत शेळके, भविष्य निर्वाह निधी विभागाचे क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, डॉ. बाळकृष्ण मागाडे (वाई, जि. सातारा), सामाजिक कार्यकर्ते सुधीर चंदनशिवे, श्रीकांत गायकवाड उपस्थित राहतील.
ग्रंथांची निवड ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.

कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन थिंक टँक पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका रसिका भंडारे, संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे तसेच ऋषीकेश खाकसे, धनंजय पाटील यांनी केले आहे.
📚📚📚📚📚📚📚📚📚

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *