Posted on

पुस्तक परिचय: ‘व्हर्जिन’- नितीन वाघ

1+

सेक्स, व्हर्जिनिटी, कोरी स्त्री आणि मी सह आपण सारे

नितिनची ही कादंबरी खरं तर तीन महिन्यांपूर्वी आणली होती. पण वेळ मिळत नव्हता. तरीही तिला सतत वाचण्यासाठी खुणावणार्या पुस्तकात ठेवलेलं. तर दुपारी पाहुणे गेल्यावर तिला सहज हातात घेऊन बसलो. म्हटलं न चाळता थेट वाचायलाच घेऊ. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या साडेतीन तासांत ही कादंबरी वाचून संपवली.

योगायोग असतात. सकाळी मी “ऐसे अक्षरे” मधली किरण नगरकरांची मुलाखत वाचीत होतो. ती वाचताना आपल्या व्यवस्थेचा दांभिकपणा त्यांच्या तोंडून वाचताना मला स्वतःला खूप अपराधी वाटत होतं. तेवढ्यात पाहुणे आल्याची बायकोने वर्दी दिल्यानं ती मुलाखत (दोन भागात आहे. ) अर्धीच राहिली. ती फेबुवर सापडेना म्हणून मी नितिनचा वाघ काय म्हणतोय बघूया म्हणून “व्हर्जिन ” हातात घेतली. वाघ आणि व्हर्जिन, मुखपृष्ठावरील स्त्री हे सगळे एकदम इतक॔ अंगावर आलं की बस्स !!!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था. त्यातच हे वाचताना मला विजय तेंडुलकरांच्या कमलाची आणि शांततेच्या कोर्टाची आठवण झाली आणि भारतीय माणूस म्हणून मीच नितिनने उभ्या केलेल्या कटघर्यात उभा राहिलो. त्यातून सुटण्यासाठी मला साडेतीन तास लागले. पण तो काळ वाचक म्हणून फारच मोठा आहे. म्हणून हा सगळा प्रपंच. …

नाईल (नदीचे नाव ) सखाराम नावाच्या तरुणीला उत्तम मार्क असूनही पैशाअभावी मेडिकलला प्रवेश मिळत नाही. शेतकरी बापाची आत्महत्या सोबत घेऊन संघर्षाला निघाली आहे. मेडिकलसाठी ती डान्सबार मध्ये जाते, कार्पोरेट क्षेत्रात जाते,बॅक, सामाजिक संस्था सगळे उंबरठे झिजवते. हायी काहीही येत नाही. अनेक ठिकाणी शरीराची मागणी पुढे येते. तिला तर डॉक्टर व्हायचंय. मग ती आणि तिची मैत्रीण जाना एक प्लान करतात. वेबसाईटवर जाहिरात टाकतात.

Just turned eighteen year young beautiful Indian girl want to sale her virginity through auction….

आणि इंटरनेट मायाजालाचा वापर करून मेलवर मागणी करतात. तर सहा हजारापेक्षा जास्त मेल प्राप्त होतात. त्यांची स्क्रुटिनी करू तीनेकशे लोकांना बोलीसाठी नक्की करतात. पण या सगळ्या मागावर असणारा एक पत्रकार त्यांना खिंडीत गाठतो आणि लाईव्ह शो करण्यासाठी दडपण आणतो. त्यासाठी तो साडेपाच कोटी रुपये नाईलच्या खात्यावर वर्ग करतो. आणि मग सुरु होतो खरा खेळ…….

या खेळात नाईल,पत्रकार, बोली लावणारा, जिंकणारा अशा सगळ्या भूमिका वाचकालाच पार पाडाव्या लागतात. बघता-बघता सगळ्या समाजालाच नाईल, आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करुन निरुत्तर करते. अडीच इंच जागेच्या व्हर्जिनिटीची किंमत आजही साडेपाच कोटी रुपये होऊ शकते आणि तो बोलीचा लाईव्ह शो पाहण्यासाठी करोडो रुपयांचा सट्टा लागतो, हे कशाचे चिन्ह आहे, असा प्रश्न ही कादंबरी उभा करते.

वास्तव,कल्पित, मिथ, अभासी मायाजाल,वेगवान निवेदन, पकड घेणारी आणि उत्कंठा वाढवणारी रहस्यकथेसारखी मांडणी यामुळे ही कादंबरी अधिकच परिणामकारक झाली आहे.
स्वतःच्या अपराधीपणासकट भर चौकात आपणाला नागडं करणारी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी.

ता.क. : फेबुवरची नगरकरांची मुलाखत मुलाकडून शोधून घ्यायला हवी.

—-महेंद्र कदम

1+
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *