Posted on

‘पार्कातल्या कविता’चा वर्षपूर्ती सोहळा

6+

कला आणि सातत्य यांची सांगड बसली की काहीतरी विलक्षण जन्माला येतं. आपल्या मराठी संस्कृतीत कलेची नाळ ही थेट मातीशी जोडली गेलेली आहे. हीच मानसिकता रुजवणारा, अल्पावधीतच लोकप्रिय झालेला कवितांचा एक सरळ साधा कार्यक्रम “पार्कातल्या कविता” आपला वर्षपूर्तीचा बारावा प्रयोग सादर करत आहेत. हा सोहळा संपन्न होत आहे डोंबिवली येथील सर्वेश सभागृह, तिसरा मजला येथे दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता. यात विविध कवींकडून बहारदार काव्याची भरगच्च मेजवानी मिळणार आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून स्थानिक कवींना व्यासपीठ उपलब्ध करण्याचं कार्य “पार्कातल्या कविता” गेले वर्षभर करत आहे. त्या त्या गावातील पार्कात स्थानिक दहा कवींसह त्यांच्या कवितांनी रंगणारा हा प्रयोग आजपर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, पुणे अशा अकरा ठिकाणच्या पार्कात साजरा झाला आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, अनौपचारिक मैफिलीत निसर्गाच्या सानिध्यात कवी आपल्या रचना सादर करतात व थेट दाद मिळवतात. उतरणीला लागलेल्या उन्हाच्या साक्षीने पश्चिमेचा वारा अंगावर घेत ही मैफल फुलते.

वर्षपूर्ती सोहळा सभागृहात का ? असे विचारले असता, आयोजक स्वरूपा सामंत आणि विजय उतेकर यांनी असे सांगितले की, “या बाराव्या प्रयोगाचे स्वरूप वेगळे आहे, खास आहे. आयोजकांच्या कविता, वर्षपूर्ती सोहळा तसेच त्रिवेणी अशा तीन विभागांत कवितेची भरगच्च मेजवानी आपण डोंबिवलीकर रसिकांना देत आहोत. अनेकांचे ऋणनिर्देश तसेच पार्कातल्या कविताच्या शीर्षक गीताचे अनावरण असा सोहळा रंगणार आहे.”

संपूर्ण सोहळ्याचे आणि त्रिवेणी पर्वाचे सूत्रसंचालन महेश देशपांडे करतील तसेच आयोजकांच्या कविता या आगळ्यावेगळ्या काव्यमैफिलीचे सुत्रसंचालन गझलकार विजय उतेकर करतील.

सामान्यांच्या पसंतीस उतरलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद जास्तीत जास्त लोकांना घेता यावा यासाठी हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असल्याचे देखील आयोजकांनी नमूद केले आहे.

6+
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *