आजचं युग हे सोशल मिडियाचं युग …ग्लोबलाईजेशन झालं आणि जग जवळ आलं …वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सरळ आणि सोपी झाली तशी वेगवेगळ्या भाषाही एकमेकीत मिसळल्या. काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण गरजेचं झालं. ग्लोबल नेटवर्कमुळे फायदे झालेच पण न कळत आपण दुरावलो ते आपल्या मातृभाषेला.
आजच्या पिढीला आणि येणार्याही पिढीला इंग्रजी ही व्यवहाराची भाषा यायलाच हवी पण मातृभाषेला विसरून मात्र चालणार नाही. महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरल्या जाणार्या ३ प्रमुख भाषा हिंदी, उर्दू आणि मराठी. युवा पिढीला पुन्हा ह्या भाषांकडे वळवण्यासाठी अनेक ठिकाणांहून अनेक संस्था आज महाराष्ट्रात सातत्याने कार्यरत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून भाषा चळवळी उभ्या राहिल्या आहेत. आणि ह्यातलीच एक अग्रगण्य संस्था “पासबान – ए – अदब”.
पाश्चिमात्य अंधानुकरण करणाऱ्या आजच्या युगात समृद्ध भारतीय भाषा आणि परंपरा लोप पावत असल्याने, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि मानबिंदू असलेल्या ह्या भाषांशी युवा पिढीला जोडून ठेवण्याच्या हेतूने ‘पासबान – ए- अदब’ ह्या सेवाभावी संस्थेने साहित्याची एक चळवळ हाती घेतली आहे. आणि त्या साठी गेल्या दशकापासून हिंदी आणि उर्दू भाषेतील साहित्य संमेलना’चे निशुल्क आयोजन केले जाते.
पोलीस सेवेत गेले २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले आणि आज पोलीस महानिरीक्षक अशा अतिशय आदरणीय आणि महत्वाच्या हुद्द्यावर असलेले माननीय श्री.कैसर खालिद हे “पासबान – ए – अदब” चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. पोलिस सेवेत असूनही आपली सृजनशीलता उत्तम प्रकारे जपणारे श्री. कैसर खालिदजी हे स्वतः देखील अतिशय उत्तम शायर आहेत. त्यांना लिखाणाची प्रेरणा त्यांच्या कामातूनच मिळते असं ते म्हणतात. भाषा हाच केंद्रबिंदू असलेल्या“पासबान” च्या माध्यमातून मुंबई,दिल्ली,लखनऊ अशा अनेक ठिकाणी“अनुभूती – हिंदी काव्य उत्सव”, “इजहार” आणि मिराज – द हेरीटेज” ह्या उर्दू साहित्य रसिकांसमोर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. फक्त काव्य वाचना पुरतेच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, भाषा संमेलन ह्या माध्यमातून देखील पासबान– ए – अदब युवा पिढीला विविध ठिकाणी रसिकांपर्यंत पोचतवत असतो.
पासबान च्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन प्रसिद्ध सिनेकलावंत श्री. अमिताभजी बच्चन , श्री. राजपाल यादव, श्री. गुलजार साहेब, श्री. जावेद जी अख्तर, श्री. सुनील शेट्टी,श्री. शत्रुघ्न सिन्हा , श्री. टोम अल्टर क्रीडाजगताचे उत्तुंग व्यक्तिमत्व श्री मिल्खा सिंग , साहित्यक्षेत्रातील पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पद्मविभूषण गोपालदास निरज, इत्यादी नामवंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी कार्यक्रमात सहभागी होऊन आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे.
नुसतेच मनोरंजन नाही तर आलेल्या रसिकाने परत जाताना एक ‘विचार’ घेऊन जाणं हा ह्या कार्यक्रमांचा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिग्गज आणि पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ साहित्यिकांबरोबर चर्चासत्र, अनेक भाषाविशारद, नृत्य विशारद, गायक ह्यांच्या मार्फत भारतीय संस्कृती आणि कला जपण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न देखील ह्या संस्थेच्या माध्यमातून करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.
अतिशय सुंदर आणि दर्जेदार कार्यक्रम, उत्कृष्ट नियोजन , सकारात्मक उर्जा घेऊन सदैव तत्पर असलेले सभासद हे पासबान चं वैशिष्ट्य आहे. उर्दू, हिंदी ह्या दोन्ही भाषांतून केलेल्या सर्व कार्यक्रमांना रसिकांची पसंती मिळाल्यावर “पासबान – ए – अदब” ह्या वर्षी मराठी भाषा राजदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेतून पहिल्यांदाच एक अनोखी काव्य मैफल घेऊन येत आहेत. “काव्यांजली – नातं मराठी मातीशी”
दिनांक २७ फेब्रुवारी हा वि. वा. शिरवाडकरांची म्हणजेच कुसुमाग्रजांची जयंती अर्थात ‘मराठी राजभाषा दिवस” ह्या दिवसाचे औचित्य साधून दिनांक २५ फेब्रुवारी,२०१८ ला काव्यांजली – नातं मराठी मातीशी ही एक आगळी वेगळी काव्य संध्या घेऊन ‘पासबान – ए – अदब’ मराठीत आपल्या सेवेला येत आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम ‘पासबान – ए – अदब’ च्या इतर कार्यक्रमांसारखाच विनामुल्य असणार आहे.
आजचे आघाडीचे कवी श्री. वैभव जोशी , लहानांपासून मोठ्यांपर्यंतच नाही तर थेट स्पायडरमन ला सुद्धा आपल्या कवितेत घेऊन येणारे श्री संदीप खरे, गारवा ची भुरळ प्रत्येक रसिकाला आजही रसिकाला पडतेच. गारवा मधून प्रत्येक मराठी मनाला भेटलेले सौमित्र, सुप्रसिद्ध हास्य कवी श्री. अशोक नायगावकर आणि आपल्या सशक्त अभिनयातून आपल्या समोर सतत विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्या कविता घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहेत. कधी कविता तर कधी कथांमधून आणि कधी आपल्या खुमासदार निवेदन शैलीतून आपल्याला कार्यक्रमाशी बांधून टाकणारी प्रसिद्ध कवयित्री शिल्पा देशपांडे ह्या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे.