नांदेड : २४ डिसेंबर
भावकवितेतील चिंतनशुद्धता कवी निशांत पवार यांच्याकडे आहे. ओनामा हा नितळ मनाने लिहिलेला पहिलाच कवितासंग्रह होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
कवी निशांत यांच्या ‘ओनामा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ कुसुम सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवंत क्षीरसागर तर भाष्यकार म्हणून प्रा. बी. एन. चौधरी व प्रा. यशपाल भिंगे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवकुमार राठोड, निर्माता, जय जगदंबा प्रॉडक्शन्स हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. त्यानंतर प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी निशांत पवार यांनी यावेळी कवितालेखनामागची भूमिका विषद केली.
प्रा. तांबोळी पुढे म्हणाले की कवी हा जन्मावा लागतो. त्याचे आयुष्य त्याला कवी म्हणून शिक्कामोर्तब करते. कवीत्व ही नैसर्गिक देण आहे. निशांत पवार हा अंतर्बाह्य कवी आहे.
प्रा. यशलाल भिंगे कवितासंग्रहावर भाष्य करतांना म्हणाले, एकच एक भूमिका घेऊन कवितेकडे पाहता येत नाही. कवी हा सर्व जिवांचे मांगल्य मागत असतो. कवितेची उत्कृष्टता ही कमीजास्त शब्दांवर अवलंबून नसते.
प्रा. बी. एन. चौधरी याप्रसंगी म्हणाले, कवितेतले वैविध्य, प्रतिमा, प्रतिमांचा चपखल वापर आणि सहज, सोपी भाषा ही या कवितेची वैशिष्टे. या संग्रहातील कविता नाविन्याचा उंबरा ओलांडत असतांना प्रगल्भतेची कास धरुन आहे.
प्रमुख पाहुणे संजीवकुमार राठोड यांनी त्यांच्या मराठवाडा कृषी विद्यापीठातील आठवणी ताज्या केल्या तसेच त्यांचा नांदेड ते नवी दिल्ली प्रवास व संघर्ष थोडक्यात मांडला. गझल मुशायऱ्यानिमित्त जमलेल्या सर्व गझककारांचे स्वागत केले.
अध्यक्षीत समारोपात प्रा. भगवंत क्षीरसागर म्हणाले, कवीला अगोदर जीवन जगावे लागते. अनुभव घ्यावा लागतो. तेच कवितेत उतरत असते.
प्रकाशन सोहळ्यानंतर लगेचच जय जगदंबा प्रॉडक्शन्सतर्फे आयोजित व गझलनिष्ठ प्रतिष्ठान, महाराष्ट्रतर्फे प्रस्तुत मराठी गझल मुशायरा पार पडला. मुशायऱ्याचे अध्यक्षपद बापू दासरी ( नांदेड ) यांनी भूषविले तसेच संचलन उभरते गझलकार रत्नाकर जोशी यांनी पार पाडले.
मुशायऱ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नामवंत गझलकार नांदेड नगरीत जमले होते. गझलनिष्ठ प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या अध्यक्षा सुनंदा पाटील ( मुंबई ), आबेद शेख & सुरेश धनवे ( पुसद, यवतमाळ ), प्रीती जामगडे ( नागपूर ), बी एन चौधरी ( देवरूप, धरणगाव जि. जळगाव ), सचिन तारो ( करमाड, औरंगाबाद ), नारायण सुरंदसे ( धामणगाव रेल्वे ), निशांत पवार ( नांदेड ) या गझलकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुगंधी बाग आहे ती तिला माहीतही नाही
तिच्या श्वासापरी दरवळ जुई जाईतही नाही
वाचले ना जाळले त्यांनी मला
बघ कसे चुरगाळले त्यांनी मला
आबेद शेख यांच्या वरील गझलांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
भावास सोबतीला घेऊन चालले मी
पुसले मला जगाने हा कोण यार आहे
वरील रचनेतून सुनंदा पाटील यांनी समाजमनाचे नागडे रूप जगासमोर उघडे केले.
अंगठा त्यांनीच माझा छाटला होता
सूर्य माझा यार ज्यांनी झाकला होता
सुरेश धनवे यांच्या या रचनेतून परखड सामाजिक भाष्य समोर आले.
नमवू शकला नाही मजला वादळवारा
आला गेला केवळ थोडी सळसळ झाली
प्रीती जामगडे यांनी त्यांच्या गझलेतून विजीगिषू वृत्तीचे दर्शन घडविले.
मला गाव नेईल मिरवित आता
किती एकटा मीच गर्दीत आता
सचिन तारोंनी आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर मार्मिक भाष्य केले.
पीकपाणी जीव त्याचा तीच त्याची देवपूजा
त्याग समतेचीच झाला आज ग्वाही बाप माझा
प्रा. बी. एन. चौधरी यांनी त्यांच्या रचनेतून कष्टकरी बाप वर्णन केला.
मी पायवाट होतो ग्रामीण जीवनाची
माझे मला कळेना झालो कधी शहर मी
निशांत पवार यांनी त्यांच्या रचनेतून बदलत्या ग्रामीण जीवनावर भाष्य केले.
मरणाराच्या मरणाचे का कारण कळते
श्वासामधले केवळ नाते तुटले होते
रत्नाकर जोशी यांनी जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे अचूक वर्णन केले.
सैनिक कलेवरास घेऊन येत होते
मी कुंकवास माझ्या पाहून घेत होते
वीरपत्नीची व्यथा मांडून नारायण सुरंदसे यांनी रसिकांची मने जिंकली.
ज्येष्ठ गझलकार बापू दासरी यांनी खालील रचनेने अध्यक्षीय समारोप केला.
कळीने प्राण त्यागावा हळू देहास खुडताना
रडावे पूर्ण बागेने फुलाचा जीव जाताना
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुशायऱ्यास प्रेक्षकांची उस्फूर्त साथ लाभली.