Posted on

‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी

0

||सोन्याचा सर्वा||

माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली
“नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो,
असं एकसारखं वाचशी तं.”
मी म्हणालो, “माडी, तेज जानार नही,
उलट नवी दृष्टी भेटी ऱ्हायनी माले,
हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से.
येम्हा चेहरा दिखस आपला सोताना!”

आई म्हणाली, “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.”
मी आईला ‘जू’विषयी थोडक्यात सांगितलं.
आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं अन प्रतिक्रीया दिली,
“नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत
या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी.
पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं.
एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ”

हा मायलेकातला संवाद
प्रसिद्ध कवी आणि कथाकार प्रा. बी. एन. चौधरी
आणि त्यांची माउली यांच्यातील आहे!
खरंतर हा संवाद नाहीच
हा सोन्याचा सर्वा आहे माझ्यासाठी
या माउलीच्या तोंडून निघालेला एक एक शब्द
म्हणजे ‘जू’ ची झालेली उत्कृष्ट समीक्षा.
त्या माउलीला चरणस्पर्श करत
आपल्या समोर ठेवतो आहे
हा सोन्याचा सर्वा.

||‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी||

सर्वत्र गाजत असलेलं आणि वाचायलाच हवं अशी मनात उर्मी दाटून आलेली असतांना अचानक एक दिवस पोस्टमन दादांनी एक पार्सल आणून दिलं. माझे सन्मित्र विजय पाटील यांच्या स्नेहाग्रहाने थेट लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचे कडूनच मला “जू” ची अविस्मरणीय भेट मिळाली. एकदाच नव्हे तर दोन, तीनदा मी “जू” अघाश्यासारखं वाचून काढलं. माझं ते रात्रंदिवसाचं वाचन पाहून माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली “नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो, असं एकसारखं वाचशी तं.” आम्ही घरात आहिराणी भाषा बोलतो. मी म्हणालो….. “माडी, तेज जानार नही, उलट नवी दृष्टी भेटी -हायनी माले, हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से. येम्हा चेहरा दिखस आपला सोताना.” आई म्हणाली “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.” मी आईला “जू” विषयी थोडक्यात सांगितलं. तिचीही उत्सुकता चाळवली आणि आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं. संपूर्ण वाचन झाल्यावर तिची प्रतिक्रीया होती “नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी. पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं. एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ” माझ्या आईची ही प्रतिक्रियाच मला “जू” चं वास्तव अस्तित्व अधोरेखित करणारी समिक्षा वाटली.


समाजात संकटं आली म्हणजे माणसं हतबल होतात. पुरुषच नव्हे तर स्त्रीयांही स्वतःचा प्राण त्यागतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःसह लेकरांचाही जीव घेतात. अशी नकारात्मक, निराशावादी परीस्थिती असतांना एक आई संकटांचा निकराने मुकाबला करते. स्वतः जगते. आपल्या लेकरांना जगवते. त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणते. हे संकट नैसर्गिक, परक्यांनी दिलेलं नसतं तर आपल्या माणसांनी दिलेलं असतं. ज्यांनी जीव वाचवावा तेच जीवावर उठले तर कुणाला सांगायचं अशी परीस्थिती असतांना आई ही कधीही अबला, परावलंबी, हताश, हतबल नसते हे सिध्द करणारी कहाणी म्हणजे ऐश्वर्य पाटेकर याचे “जू” आहे. “जू ” जगण्याचं शास्त्र आहे. लढण्याचा मंत्र आहे, नातं टिकवण्याचं तंत्र आहे. आई प्रसंगी रणरागिणीचे रुप धारण करते तर कधी ती माया, ममतेची करुणा मूर्ती होते. अशी अनेक रुपे यात दिसून येतात.

मी अनेक आत्मकथनं वाचली आहेत. त्यातली बरीचशी मला रंजक, कलात्मक, मढवलेली, सजवलेली वाटली. मात्र, “जू” मला अकृत्रिम, प्रामाणिक आणि पारदर्शी वाटलं. जसं घडलं तसंच मांडलंय असं वाटलं. अनेकांनी अत्मकथनं लिहिली ती त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात. आयुष्याच्या शेवटच्या पडावावर. यात स्वतःच्या महिमामंडनाचा मोहही अनेकांना टाळता आला नाही. मात्र, ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात “जू” लिहून स्वतःच्या जगण्याचं डोळस मूल्यमापन केलं आहे. अवघ्या पंधरा वर्षाचा कालावधी. मात्र, तो जिवंत करुन समोर मांडतो. हे मांडताना कुठेही स्वतःचं अवास्तव महत्त्व वाढवून घेतलेलं नाही. वरवर ही भावड्याची आत्मकथा वाटत असली तरी ती ख-या अर्थाने भावड्याच्या आईच्या जगण्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. गोष्ट कसली ? हा तर एक जीवघेणा प्रवास आहे जगणं आणि मरण यातला. यातला प्रत्येक प्रसंग, घटना इतकी जोरकसपणे मांडली गेली आहे की त्याआपल्या आसपास घडत आहेत असा सतत आपल्याला भास होतो. ते इतके अकल्पित, वेदनादायी आहेत की ते आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. भावड्या हा “जू”चा सूत्रधार असून तो एका विशाल पटाला वाचकांसमोर उलगडत जातो.

“जू”ची सुरवातच आईने गायलेल्या एका ओवीने होते. चार माझ्या लेकी/ चार गावच्या बारवा/अन् माझा गं लेक बाई/ मध्ये हिरवा जोंधळा. या ओवीतच आई, भावड्या आणि त्याच्या चार बहिणी समोर उभे ठाकतात. पाटेगांवच्या इंदूबाई आणि नामदेव या दाम्पत्याला चार मुली आणि एक लेक. एकापाठोपाठ तीन मुली होतात इथून सुरवात होते आईच्या अवहेलना, दुःख आणि कष्टाची. नवरा, सासू, सासरा, नणंद सारे मिळून तिला छळतात. जगणं कठिण करतात. घरातून परागंदा करतात. ती माहेराला जवळ करते. येथे भाऊ प्रेमळ असला तरी भावजया दावेदार होतात. आई स्वाभिमान, जिद्द सांभाळत सासरी परतते. स्वतःचं घर उभं करते. घायाळ पक्षिणी आपल्या पिलांना पंखांखाली घेत त्यांचं संरक्षण करते तशी आई लेकरांची ढाल बनते. एकीकडे नवऱ्याची क्रूर, उलट्या काळजाची राक्षसी वृत्ती तर दुसरीकडे आईचं सोशीक, लढाऊ, संस्कारी, सोज्वळ नंदादीपासारखं तेवणं. मुलगा होत नाही,आवडत नाही असं म्हणून नवरा सवत आणतो.नातेवाईक जमिन हडपण्याचा प्रयत्न करतात. तरी ही माऊली संकटांना घाबरत नाही. धीराने उभी राहते. समोर संकटांचा पहाड, वेदनांची रास मांडलेली असतांना ती लेकरांमध्ये सकारात्मकतेची उर्जा पेरते. दु:खाच्या बाजारात द:खाच्या विरोधात लढण्याचं बळ एकवटते. त्या लढ्याची ही सकारात्मक गोष्ट आहे.

घरात वणवा पेटलेला असतांना सर्वबहिणींची मदार भावड्यावर एकवटलेली. तो मोठा होईल? शिकेल? साहेब होईल? आईचे दिवस पालटतील हेच त्यांच्या इवल्या डोळ्यातलं भव्य स्वप्न. भूक, संघर्ष आणि आकांशाच्या वाटेवर भावड्याला सोबत करते ती कविता. ती त्याची उपजत सोबती. हीच कविता त्याला बळ देते. त्याला शाळेत, शिक्षकात, नातेवाईक, समाजात मान मिळवून देते. त्याचा बापाला मात्र याचं कौतुक नाही. उलट सावत्र आई सोबत तो त्याच्या जीवावर उठतो. नशिब बलवत्तर म्हणून यातून तो वाचतो. या साऱ्यात माय त्याच्या पाठी सावलीसारखी उभी राहते. संस्कारांचं रोपण करते. नात्यातली नकारात्मकता, भय घालवण्यासाठी ती जगणं फुलवते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आदर्श उभा करते. संकटकाळी? कठीण समयीही ती निश्चयापासून ढळत नाही. तीच्या मुखातून निघालेली वाक्य विद्यापीठीय पुस्तकांपेक्षा मोलाची वाटतात. तिच्या पायाला पडलेल्या भागांना भावड्या रात्री मलम लावतो. तेव्हा ती म्हणते “लेका, दून्यातल्या समद्या क्रिमा घेवून आला तरी त्या माझ्या भेगायपुढे हरतील. भेगामातूर हरनार नाही. त्या लढतच राहतील….. पाय रक्तबंबाळ करत !” यातून तिच्या कष्टाची व जिद्दीची व संकटांना भिडण्याची कल्पना येते. ती हार मानायला तयार नाही. स्वतःचं मुल्य तिला माहित आहे व पुढे बरे दिवस येतील हे ही तिला माहित आहे. ती म्हणते “लेका, उकिरड्याची दैनाबी एकना एक दिवस फिटतेच. तशी ती आपलीबी फिटेन. यातून तिचा दुर्दम्य आशावाद दिसून येतो. बाजारात एका म्हातारीच्या तोंडी आलेलं वाक्य ” गरीबाची इज्जत रस्त्यावर पडलेली असते, ती कुणीही तुडवून जाते.” यातून गरिबांची आगतिकता व असहायता व्यक्त होते. एका ठिकाणी आई म्हणते “चांगली माणसं जोडण्यासाठी अंतःकरणाला डोळे हवेत.” यातून माणसाला अंतरकरणाची भाषा अवगत असावी असं तिला वाटतं. हे संकटांनी भरलेलं जीवन सुसह्य कसं झालं हे सांगतांना भावड्या म्हणतो “आम्ही भावंड जशी एक भाकर सर्वात वाटून खायला शिकलो तसंच खांद्यावर लागलेल्या जू चा भारही वाटून घ्यायला शिकलो.” यातून त्यांची नात्यांची घट्ट वीण व एकमेकांप्रती असलेली सह- संवेदना दिसून येते. अशी साधी, सोपी, सुटसुटीत वाक्ये ही “जू” ची बलस्थाने आहेत. भाषा हे या आत्मकथेचं आभुषण आहे. लासलगाव-चांदवड परिसरातील बोलीभाषा व तिचे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते यांच्या चपखल वापराने “जू”चं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. ते तिच्या अनघड स्वाभाविक स्वरुपात प्रकटले आहे.

यातील काही प्रसंग तर काळजाचा ठाव घेतात. घरगाडा ओढतांना कराव्या लागणाऱ्या कसरतीत आई लासलगावच्या कांद्याच्या खळ्यावर रात्रपाळीचं काम स्विकारते. दूधपिता भावड्या घरी असतो. रात्रीचे अकरा वाजतात. आईचा पान्हा दाटून येतो. ती तशीच काम सोडून लेकासाठी अंधारात घराची वाट धरते. आणि वाट चुकते. पहाटेचे पाच वाजतात. आणि मग घर दिसतं. मायचा उमाळा फुटून निघतो. या प्रसंगात आईची माया मला लेकरासाठी गडाचा बुरुज उतरुन जाणाऱ्या हिरकणीपेक्षा तसूभरही कमी वाटत नाही. एका प्रसंगात भावड्याचा बाप दुसऱ्या बायकोला झालेल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी भावड्या आणि त्याच्या बहिणींचा लाडका बोकड खाटकासारखा फरफटत ओढून नेतो. तेव्हाचा त्या भावंडांचा आक्रोश वाचकांच्या काळजाला घरे पाडतो. भावड्याची आई अनेक संकटं येतात तेव्हा मनाने खचत नाही तुटत नाही. तीच आई तिची पाळलेली शेळी जेव्हा कुत्री फाडून खातात तेव्हा आंतर्बाह्य हादरून जाते. आपलं सर्वस्व हरवलय अशी तिची व्याकूळता आपल्यालाही आतून हलवून सोडते. हे प्रसंग म्हणजे मानवी भावभावनांचे अत्युच्च दर्शन आहे असे मला वाटते. अश्या प्रसंगांनी “जू” वाचकाला आपलीच कथा वाटते. आणि ती लेखक-वाचकादरम्यान एक अदृष्य बंध निर्माण करते.

“जू” मध्ये पात्रांचा मोठा गोतावळा आहे. भावड्याचं घर, परीसर, गावातील माणसं अशी किमान पन्नासेक माणसं आपणास भेटतात. तरीही त्यांचा गुंता होत नाही हे लेखकाचं यश आहे. इंदूबाई, नामदेव, भावड्या, अक्का, माई, तावडी, पमी, सर्व मेहुणे, आजी, आजोबा, आत्या, फुवा, सावत्र आई, काका, भाऊबंद, भावड्याचे मित्र संतू, पंग्या, गण्या, दिवड्या. गावातील शांताबाई, दुर्गावहिनी, सीतावहिनी, तानाई, जिजामावशी, कौसाई, राधा, वच्छिआक्का, चंद्रभागा, केरसुणी आजी, वेणूआत्या, भोकरडोळ्या अश्या अनेकांशी आपली भेट होते आणि ते मनात घर करुन राहतात.

“जू” चं वैशिष्ट्य असं आहे की ते दुःख उकळत बसत नाही दुःखावर फुंकर घालते. संकटांचा बाऊ करत नाही. संकटांना भिडायला आणि लढायला शिकवते. वेदना मिरवायला नाही तर त्या आतल्या आत जिरवायला शिकवते. हे मांडताना कुठेही कृत्रिमता दिसत नाही. दिसतं ते प्रासादिक हळवंपण. प्रसंगोत्पात निरागसता झळकते. यातल्या शब्दाशब्दांना कष्टातून, श्रमातून आलेल्या घामाचा सुगंध आहे. तो वाचकाला धुंद करतो. लेखक स्वतः एक कवी असल्याने लिखाणातून वेळोवेळी एक निखळ काव्यात्मकता झळकते. “जू” ला पाठबळ देतांना आदरणीय द.ता.भोसले म्हणतात की या लिखाणाला आत्मबळाचे कोंदण आहे. संपत्तीबळ, शस्त्रबळ, शब्दबळ हे अशाश्वत असतात मात्र, आत्मबळ हे श्रेष्ठ व शाश्वत असते. आत्मबळाचे कोंदण असल्यामुळेच हे लिखाण वाचतांना मन हेलावतं, हृदय पिळवटून निघतं आणि काळजाला भेगा पडतात.

ऐश्वर्य पाटेकर हे कवी म्हणून सिध्द झाले आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे हे लिखाण दु:खाच्या प्रदर्शनासाठी अथवा पुरस्कारासाठी केलेलं लिखाण नाही. हे लिखाण आहे मातेच्या कष्टांचे, तिने भोगलेल्या दैन्याचे आणि संकटांशी दिलेल्या लढण्याचे. ते एका मातेचे मंगलगान आहे. आपण कितीही लिहलं तरी आईच्या भोगलेल्या व्यथांना आपण साधा स्पर्शही करु शकणार नाही असं ते मानतात. आईकडून आपण काय शिकलात याचं उत्तर देतांना ते म्हणतात “मातीत गाडून घेतलं तर उगवता आलं पाहिजे, पाण्यात फेकले तर पोहता आलं पाहिजे, वादळात धरलं तर तगता आलं पाहिजे आणि काट्यात फेकले तर फूल होता आलं पाहिजे. हे जगण्याचं सूत्र मी आई कडून शिकलो.” भावड्याच्या आईनं जगण्याचं साधंसुधं तत्वज्ञान दिलं आहे. इतरांच्या पोटात शिरून राहता आलं पाहिजे. माणसांच्या काळजात खोपाकरुन राहता आलं पाहिजे. ज्याच्या पायाशी झुकलो त्यानेच पाठीत बुक्का हाणला तर तो आपला नाही हे ओळखता आलं पाहिजे. त्याचा नाद सोडायचा. जो काळजाला लावेल त्यालाच आपला समजायचं. किती सुलभ तत्वज्ञान आहे या माऊलीचं. म्हणून “जू” हे केवळ एक पुस्तक, आत्मकथा एव्हढं मर्यादित स्वरुपात न राहता “संस्कारांची गाथा” म्हणून ते समोर येतं. कुणी त्याला विद्यापीठाचा दर्जा देतं तर कुणी त्याला मातृभक्तीचं महंन्मंगल स्तोत्र म्हणतं. मला माझ्या अल्पबुध्दीला ती “आईच्या संघर्षाची गोष्ट” वाटते. गोष्टीची गोडी आजही अबालवृध्द, स्त्री-पुरष यांच्यात आबाधीत आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज संक्रमित होते. पिढ्या, पिढ्यांना जोडते. आणि तोच दर्जा “जू” लाही मिळेल असे मला वाटते. ऐश्वर्य पाटेकर (संपर्क – ९८२२२९५६७२) या सन्मित्राला मी त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(४२५१०५).
९४२३४९२५९३

0

One thought on “‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी

  1. व्वा….. हे भावलं. अधिकाधीक लोकांपर्यंत पोहचायला हे छान ! आभाळभर शुभेच्छा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *