Posted on

नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0

माध्यमान्तराचा अभ्यासयुक्त धांडोळा

डॉ. प्रकाश शेवाळे

“साहित्यकृतीचे माध्यमांतर” ही अतिशय महत्वाची व निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या त्या साहित्यकृतीच्या आशय, कथनशैली व दृश्यात्मकतेमध्ये असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविधांगी दृष्टिकोनातून आजच्या काळातील अतिशय महत्वाचा व कलावंतांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संशोधनाचे व समीक्षेचे विविध परिप्रेक्ष्य माध्यमांतराच्या अभ्यासातून निर्माण झाले आहेत व आज निर्माण होत असतांना आपणास दिसतात. साहित्य व माध्यमांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास समतोल व सखोल समीक्षेसाठी आवश्यक आहे आणि नेमका ह्याच महत्वाच्या व उपयुक्त अशा विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांनी “साहित्यकृतीचे माध्यमांतर” या ग्रंथाचे संपादन नुकतेच प्रकाशित केले.

जब्बार पटेल या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अर्पण केलेल्या या ग्रंथाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. माध्यमांतराची प्रक्रिया मंजुळे यांनी स्वतःच्या अनुभवातून विशद केली असून साहित्यकृतीच्या माध्यमांतराविषयी ते म्हणतात, ‘साहित्यकृतीचे माध्यमांतर हे ओंजळीतून पाणी घेऊन येण्याचा प्रकार असून आशयाची गळती होऊ न देण्याची मोठी जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. कादंबरी, कथा, कवितेतील आशय सिनेमात माध्यमांतरित करत असतांना खूप तयारी करावी लागते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आशयात मोठा बदल होतो’. या ग्रंथाची एकूण पाच विभागांमध्ये विभागणी केली आहे. ‘माध्यमांतर संकल्पना व स्वरूप’ या विभागामध्ये माध्यमांतर ही संकल्पना स्पष्ट केली आहे. सिनेमा समीक्षक श्यामला वनारसे यांनी माध्यमांतरामध्ये आशयाची ‘नक्कल’ अपेक्षित नसते याविषयी भाष्य केले आहे. माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांनी ‘माध्यमांतर’ संकल्पना नेमकेपणाने विशद केली आहे. कोसला किंवा लव्हाळी यासारख्या आत्मकथनपर कादंब-यांचे सिनेमा-नाटकात माध्यमांतर करणे हे आव्हानात्मक आहे याविषयीचे विवेचन केले आहे. माध्यमांतर ही निरंतर प्रक्रिया असून माध्यमांतरामध्ये पटकथाचे महत्वाचे स्थान आहे यावरील पटकथाकार व समीक्षक डाॅ अनिल सपकाळ यांचा लेख अभ्यासकांनी मूळातून वाचणे आवश्यक आहे. संपादक डॉ. राजेंद्र थोरात यांनी साहित्यकृतीचे माध्यमांतर ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करतांना कथा ते सिनेमा, कथा ते मालिका असा प्रवास सोदाहरण स्पष्ट करतांना माध्यमांतरात दिग्दर्शकाची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे हे स्पष्ट केले आहे. साहित्याचे माध्यमांतर होताना साहित्याचे साहित्यपण राखणे हे मोठे आव्हानात्मक कार्य असते याविषयी प्रा. संतोष पवार यांनी भाष्य केले आहे. डाॅ रंजना नेमाडे व डाॅ देवेंद्र भावे यांचेही लेख महत्वाचे आहेत.

‘दूरचित्रवाणीवरील माध्यमांतर’ या विभागामध्ये साहित्यकृती छोट्या पडद्यावर कशी अवतरली याविषयी माध्यमतज्ज्ञ डाॅ उज्जवला बर्वे व रविराज गंधे यांनी अतियोग्य मांडणी केली आहे. ए.बी.पी. माझाचे आश्विन बापट यांनी ‘बातम्याच्या विश्वातला प्रवास’ स्वअनुभवातून रेखाटला आहे. न्यूज वाहिन्यावर युवकांना मोठ्या प्रमाणात संधी आहे हे या लेखातून जाणवते.डाॅ शुभश्री काळे यांनी झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेचे माध्यमांतर स्पष्ट केले आहे.

‘कवितेचे माध्यमांतर’ या विभागातील सर्वच लेख महत्वाचे आहेत. ‘आयुष्यावर बोलू काही’ असे म्हणणाऱ्या संदीप खरे यांनी ‘कवितेचे गीतामध्ये माध्यमांतर होणे फुलपाखरू होण्यासारखे आहे हे काव्यात्मकतेने स्पष्ट केले आहे. नसतेस घरी तू जेव्हा, मी संप केला नाही, आताशा नकोसे मला वाटते, दमलेल्या बाबाची कहाणी या कवितांचे अनुषंगाने संदीप खरे यांचा लेख वाचनीय झाला आहे. मंचीय कवितेच्या सामर्थ्याचे व कवितेच्या माध्यमांतराचे विवेचन कविवर्य भरत दौंडकर यांनी केले आहे. जैत रे जैत या सिनेमातील ‘मी रात टाकली’ या कवितेचे माध्यमांतर डाॅ शिरीष लांडगे यांनी उलगडून दाखवले आहे. ‘नाटकाचे माध्यमांतर’ या विभागामध्ये विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’,’शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांच्या माध्यमांतराची प्रक्रिया प्रा. वंदना जोशी व डाॅ विजय केसकर यांनी स्पष्ट केली आहे. ‘नाटक ते सिनेमा’ माध्यमांतर हा प्रा.गजानन चव्हाण यांचा चांगला लेख आहे.

‘साहित्यकृतीचे सिनेमारूप’ या विभागामध्ये विविध लेखकांनी साहित्य व सिनेमा माध्यमांतरप्रक्रिया उलगडून दाखवली आहे. शर्यत क्रीडा सिनेमांची या लेखातून क्रीडा पत्रकार संजय दुधाने यांनी क्रीडा क्षेत्रातील सिनेमांचा मनोरंजक व अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. डाॅ राहुल पाटील यांचा ‘चरित्र-आत्मचरित्रांचे सिनेमारूप’ हा लेख अनेकार्थाने महत्वाचा आहे .नटरंग ,सिंहासन, थ्री इडियट ,द दा व्हिन्ची कोड, दुनियादारी, जोगवा, बनगरवाडी, 72 मैल एक प्रवास, भूमिका या सिनेमांवरील लेख आहेत.

‘साहित्यकृतीवरील चरित्रपट’ हा या संपादित पुस्तकातील शेवटचा विभाग आहे. डाॅ शैलेश त्रिभुवन यांनी र.धो.कर्वे यांच्या जीवनावरील अमोल पालेकर यांच्या ‘ध्यासपर्व’ या सिनेमाविषयी विवेचन केले आहे. डाॅ जब्बार पटेल यांच्या ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकर’ या सिनेमाच्या निर्मितीविषयीचे सूक्ष्म तपशील प्रा.स्वप्नील गायकवाड यांनी आपल्या लेखातून दिले आहेत. अनाथांची आई सिंधुताईं सपकाळ यांच्या ‘मी वनवासी’ या आत्मकथनावरील ‘मी सिंधुताईं सपकाळ’ या सिनेमाविषयी उपयुक्त माहिती प्रा.वसंत गावडे यांनी आपल्या लेखातून दिली आहे .यशवंतराव चव्हाण यांच्या वरील सिनेमाचा आढावा डाॅ नानासाहेब पवार यांनी आपल्या लेखातून घेतला आहे. डाॅ मृणालिनी गायकवाड यांनी ‘डाॅ प्रकाश बाबा आमटे’ या चरित्रपटाविषयी भाष्य केले आहे.हे संपादित पुस्तक रसिकांसह संशोधक-अभ्यासकांना नक्कीच उपयुक्त ठरेल.

साहित्यकृतीचे माध्यमांतर
संपादक : डॉ. राजेंद्र थोरात
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती, नोव्हेंबर २०१७
पृष्ठ : २७२ किंमत : ३०० रुपये

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *