Posted on

सर्वसामान्याच्या बांधापर्यंत पोहचलेलं ‘जू’

0

आपलं जग केवढं तर आपापल्या डोक्याएवढं तसचं माणसाचं जीवन कसं तर ज्याला त्याला समजेल तसं.’ हे आत्ता सूचण्याचं कारण नुकतीच ‘जू’ ही कादंबरी वाचून काढली. प्रत्येकाचा जीवन संघर्ष वेगळा असतो; जो वाचताना आपल्याला नवे अनुभव देतो, समृद्ध करून जातो याची प्रचीती ही कादंबरी वाचताना सतत येते. पूर्वी एकेका साहित्यिकाने मराठी साहित्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांचा प्रभाव इतका होता की, तो समग्र कालखंडच त्यांच्या नावाने ओळखला जावू लागला. आता मात्र साहित्यात विशेषत: मराठीत विविध परिसरातील विविध जीवनानुभव घेतलेले साहित्यिक आपण जीवन- विचारविश्व मांडत आहेत. इतकंच नाही तर, सोशल मिडियासारख्या प्रभावी माध्यमांमुळे ते सर्वदूर पोहोचत आहेत. कथा, कविता आणि कादंबरी यासोबतच फेसबुकवर आपले हे वर्चस्व राखणा-या अलिकडच्या तरुण मराठी साहित्यिकामध्ये नाशिकच्या ऐश्वर्य पाटेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

Image may contain: drawing

नाशिकपासून साधारण ६० कि.मी. अंतरावर राहणा-या आणि साहित्य अकादमीचा पहिला युवा साहित्य पुरस्कार जिंकणा-या मराठीतील या सारस्वताला खरी ओळख मिळाली ती त्यांच्या `भुईशास्त्र’ या काव्यसंग्रहामुळे! २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहाने महाराष्ट्रातील सर्व मानाच्या पुरस्कारांसह साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कारही जिंकला. साहजिकच, त्यांच्या पुढील पुस्तकाबाबत साहित्यातील जाणकार व रसिकांना उत्सुकता होती. ती पूर्ण झाली २०१६ मध्ये ‘जू’ या कादंबरीच्यारुपाने…या कादंबरीने समीक्षक, साहित्यिक, रसिक यांचे समाधान तर केलेच; पण मोठया प्रमाणात सातत्याने न वाचणारा सर्वसामान्य वाचकही नव्याने जोडला.

अनेक जाणकारांनी `जू’चे नवी कादंबरी, वेगळी कादंबरी म्हणून स्वागतही केले पण एक वाचक म्हणून मला या कादंबरीचे सगळयात मोठे यश हे जाणवले की, ही कादंबरी सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचली आणि तिने अनेक साहित्यबाहय घटकांना बोलतं केलं. सर्वसामान्य वाचकांचे प्रेम गेल्या पाच- दहा वर्षांत ज्या मोजक्या पुस्तकांना मिळाले त्यात या कादंबरीचा क्रमांक बराच वरचा आहे. वाचनसंस्कृती कमी झाली आहे. नवी पिढी वाचत नाही अशी ओरड होणा-या आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात या कादंबरीने वय वर्ष दहा ते नव्वद अशी शेकडो सर्वसामान्य माणसे जोडली.

मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे, डॉ. द. ता. भोसले, बाबाराव मुसळे, नागनाथ कोत्तापल्ले, अरुणा ढेरे, मिलिंद जोशी, कौतिक ढाले- पाटील, अभिराम भडकमकर, प्रा. बी. एन. चौधरी, कमलाकर देसले, आबा महाजन या साहित्यातील दिग्गजांनी जसे आपले मत- निरीक्षण नोंदविले तसेच अनेक सर्वसामान्य वाचकांनी आपल्या भाषेत, उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया पाटेकरांच्या फेसबुकवर नोंदविल्या, फोनवर कळवल्या तर काहींनी पत्रातूनही व्यक्त केल्या.

काय आहे `जू’ तर एका मुलाची, त्याच्या कुटुंबाची विशेषत: त्याच्या आईच्या जीवनसंघर्षाची कहाणी. जग विरोधात गेले तरी चालते फक्त रक्ताचे सोबत पाहिजे जग जिंकता येते. पण इथे तर त्या मुलाचे वडिल, आजी, आत्या, मामा, चुलते सारे विरोधात एकवटतात. काहीही गुन्हा नसताना या स्त्रीला एकाकी पाडले जाते, तिच्या हक्कांपासून वंचित केले जाते. थोडक्यात, तिच्यावर स्वकियांकडून अन्याय होतो. ती आपल्या चार मुली आणि एका मुलाला वाढविण्यासाठी उघड्यावर जगते, दिवसरात्र कष्ट करते आणि समोर येणाऱ्या संकटांना धीराने तोंड देते. त्यावर मात करते आणि आला दिवस ढकलत पुढे चालत राहते. या संघर्षाची तुलना होवू शकत नाही कारण प्रत्येक लढाई वेगळी असते आणि ती वेगवेगळया रणांगणांवर लढली जाते. इथे सारे जग एकीकडे असताना त्या आईचा संघर्ष संतांनी सांगितल्याप्रमाणे अंतर्बाहय स्वरुपाचा आहे. नातेसंबंध, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा एकांगी विचार, आरोप, कोर्ट- कचे-या, त्यातील दु:खे, उपासमार अशा विविध यातनांशी या माऊलीची रोजच गाठभेट आहे. ‘जू’ वाचून आपण अंतर्मुख होवून स्वत:च्या जीवनाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागतो. छोटयामोठया गोष्टीसाठी कुरकुरणा-या आपल्याला आपलीच लाज वाटू लागते. कुणाला ही कादंबरी म्हणजे त्या मुलाची भावडयाची वाटचाल- आत्मकथन वाटते, कुणाला त्याच्या आईची जीवन- संघर्षकहाणी, कुणाला ती बदलते मानवी स्वभाव- स्वार्थीपणाचे चित्रण वाटते तर कुणाला चार पिढयांचे समग्र चित्र काढणारी साहित्यकृती. अनेकांना मात्र ती ग्रामीण भागातील एका सक्षम (खमक्या) महिलेची लढाई वाटते. पुरूषप्रधान जोखडातून स्त्रीला दुबळी मानणाऱ्या संकुचित मनोवृत्तीला ही चपराक आहे.

खरे तर, मराठीत ग्रामीण साहित्य विपुल आणि विविध प्रकारे लिहिले गेले आहे. या लिहिणाऱ्यांपैकी अनेकांची नाळ आनंद यादव यांच्याशी घट्ट आहे. ऐश्वर्य पाटेकरही त्याला अपवाद नाहीत. मात्र ते या मातृसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुख-दु:खासह; जो भवताल, जे गाव आणि समकालीन चित्र रेखाटतात ते सामर्थ्याने आणि सर्वांगीण स्वरुपात येते. अनुभवसंपन्नता, अस्सल अनुभूती आणि ओघवत्या लेखन शैलीमुळे वास्तव ग्राम्यजीवन पाटेकर प्रभावीपणे व तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने मांडतात. या लेखनात उत्स्फूर्तता तर आहेच पण त्याचसोबत एक विशिष्ट संयम पण आहे. आततायीपणा, राग-द्वेष या भावनांना नियंत्रित ठेवून रेखाटलेले हे जीवन वाचणाऱ्याला सकस अनुभव देते. विचार संपन्न करते. म्हणून अगदी दहा वर्षांच्या मुला-मुलीपासून तर नव्वद वर्षांचे वयस्कसुद्धा भारावलेपणातून `जू’वर अभिव्यक्त होतात. मला वाटते, ही कादंबरी बहुजन समाजाच्या आत असणाऱ्या विविध वृत्ती- प्रवृत्ती, समग्र गावगाडयाचे व त्यातील भावभावनांचे चित्रीकरण आहे. ‘भुईशास्त्र’च्या यशाची पुढची पायरी म्हणून `जू’कडे पाहता येते. तसेच, मराठी कादंबरीच्या मांडणीची नवी वेगळी सुरुवात म्हणूनही ही कादंबरी काही नवे सांगू पाहते. ज्यांना बदलता गाव, समग्र ग्रामीण जीवन आणि तेथील जगण्यातील ताणेबाणे समजावून घ्यायचे आहेत, त्यांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे असे ठामपणे सांगता येते.

डॉ. राहुल अशोक पाटील

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *