Posted on

ह्यांच पण आपल्यासारखं

1+

तो: “उगाच गडगडाट करायचा नाय हां, आपलं डोकं फिरलं ना तर अस्तिनातली वीज खुपसेन च्यायला तुझ्या आरपार. मग कळेल तुला तुझा पोकळपणा.”
ती: पण तू असा काळाकुट्ट होऊन सगळ्या जगातलं कुणाकुणाचं बाष्प साचवून माझ्यावर चाल करून येतोस ते काय मी नुसतं बघत राहायचं?
तो: “हे बघ, ते बाष्प वगैरे आपल्याला कळत नाय. त्यांना स्वतःत ठेवता येत नसतं ते सारं उडून जातं. एकदा सुटलं की वाफ कुणाचीच नसते, माझं भरत जाणं हे सुद्धा काही आयुष्यभर टिकणार नाहीये. शेवटी रीतं होत जाण हे सर्वांनाच हवंय.”
ती: पण मग त्यासाठी त्या विजांशी सलगी कशाला? मला नाही आवडत त्या विजा.
तो: ही असूया आहे तुझी, विजा बाळगून फिरायची काय हौस नाय आपल्याला. च्यायला आपल्याला पण वैताग आला ना की नाय कंट्रोल होत. तुझ्यासारखं नुसतं गडगडाट करत बसता येत नाही. सरळ एखादी वीज पडायची विषय संपला. नाही संपला तर संपेपर्यंत पाडत राहायची.

पुढे सुचवा…

1+
Posted on

छत गळतंय

1+

आज इथे खूप #पाऊस पडला,
रात्रभर.
गडगडाट झाला नसावा,
मी गाढ झोपलो होतो.
छत गळतंय कदाचित
सकाळी सगळं सुकलं होतं
तिची उशीच फक्त चिंब भिजली होती

1+
Posted on

रागाचा इस्तव

1+

आपण गेस वर पाणी गरम करायला ठेवतो एक विशिष्ट वेळेला पाणी गरम होत त्याच्या ही पलीकडे पाणी अजून तापू दिल तर पाण्याला उसळी येते लक्ष नसेल किवा दुर्लक्ष झाले तर गरम पाण्याला अधिक उसळी येवून आपल्या हातावर / अगावर येवून भाजल जावू शकत म्हणून वेळेवरच इस्तव कमी करावा. . . तसच काहीस रागाच ही आहे एका विशिष्ट वेळे पर्यत राग ठीक पण त्या रागाचा इस्तव वेळेवर जर कमी नाही केला तर आपलच शरीर त्यातून जळून निघण्याची शक्यता असते.
मित… पुन्हा एकदा.

1+
Posted on

आई,तुला सगळं कळतं

1+

लहानपणी मला कधी फार आश्चर्य आणि कधी खूप त्रासदायक वाटायच की आईला सगळचं कस कळतं?आणि का कळतं?
बोललेल न बोललेल,व्यक्त अव्यक्त
आवडत नावडतं,रूसणं फुगणं बिनसण
रडणं ,हसणं, फसणं,खाणं,पिणं
जुळलेल,तुटलेल……..
अगदी सगळ कळत सुरवातीपासून ते संपेपर्यंत म्हणून मी अजूनही आईला विचारते की तुला हे अस कस कळत तेव्हा आई एकच उत्तर देते, “तू आई होशिल तेव्हा तुला कळेल.”
खरच देवाची अथांग अदभूत अप्रतिम कलाक्रूती म्हणजे आई .मानवी जीवनात देवाचा अंश असणारी व्यक्ती.तरी थोडे मोठे झालो ,दोन गोष्टी जास्त कळायला लागल्या की आपण किती सहजपणे म्हणतो
आई तुला काहीच कळत नाही..
खरतर तेव्हाही तिला सगळच कळत असत पण तिच्या वागण्यातला ,आपल्याला माणूस म्हणून घडवण्याचा व्यापक द्रुष्टीकोन तिच्याजवळ असतो.
जसजस वय वाढत जात तस तस माझ सगळं आईला कळत ही अनुभूती आत्मिक समाधान आणि सुरक्षितता देणारी ठरते जगात एकच व्यक्ती आणि जागा ती म्हणजे आई आणि तिच्या मांडीवर निर्धास्त झोपणे याहून दुसरे सुख नाही.
कारण तिला सगळच कळतं…..

……. आईची लाडकी
मधुरा

1+
Posted on

ते चार दिवस…

1+

आपण अशा सोसायटीत राहतो याची चीड करण्याशिवाय जेव्हा हातात काहीच उरत नाही… बाईच्या अवयवांपासून ते तिच्या चरित्र्यपर्यंत कुठल्याच गोष्टीचे वाभाडे ज्या समाजाने काढायचे सोडले नाहीत.. त्यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स वर ती चैनीची वस्तू आहे म्हणून टॅक्स लावणे यात मोठी गोष्ट ती काय…??

गावी बस ची सोय नाही म्हणून मी मजबुरीने होस्टेलवर राहू लागले… जिथे साधी अंतरवस्त्रे सुकवायला जागा नव्हती तिथे माझ्यासारख्या दीडशे जणी ती चार दिवस वापरायची कपडे कुठे सुकणार होत्या… घरून मिळणाऱ्या जेमतेम पैशामध्ये ही सुद्धा एक गरजेची गोष्ट होऊन गेली.. त्यात चैन आलीच कुठे…??

असच काहीस प्रवासाच ही… प्रवासात जेव्हा कुठल्यातरी ओंगळवाण्या बस स्टॉप वर 15 मिनिटासाठी गाडी थांबते… दूरच प्रवास म्हणून ईच्छा नसतानाही आम्हाला ती घाणेरडी प्रसाधन गृहे वापरावी लागतात… त्या न तशा ठिकाणी आम्ही वापरलेली पारंपरिक नॅपकिन्स संपूर्ण प्रवासभर जवळ ठेवावी की इतरांच्या आरोग्याची काळजी न करता तशीच फेकून द्यावी…??

त्या चार दिवसात स्वतःचा जन्म नकोसा व्हावा… फक्त बाई म्हणूनच नव्हे तर आपण जन्मालाच का आलो हा प्रश्न सतत भेडसावत राहावा… अशा वेळी आम्ही चैन करतो नाही का… आजपण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या तुटपुंज्या कमाईतून त्या चार दिवसाच्या खर्चासाठी पैसे वाचवून ठेवतात…

सॅनिटरी नॅपकिन्स वर टॅक्स लावून जर देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये खूप फरक पडणार असेल तर आवडेल आम्हालाही टॅक्स भरायला… पण ही चैनीची वस्तू नाही हे विसरू नका…

✍ निकिता चव्हाण

1+
Posted on

पाऊस…

1+

पाऊस…
पाऊस धुंद पडतच होता सतत रिपरिप रिपरिप. भिंतीही घरातील आर्द्र हवेमुळे भिजल्या सारख्या वाटत होत्या आणि बाहेरची झाडी हिरवीगार तर सतत नहातच होती ओघळांवर ओघळ निथळत.  सर्वत्र सामसुमच होती दुपारची. कुठे बेडकांचा आवाज मधेच तर कुठे हवेमुळे फांद्यांची झुळझुळ. मंद सुगंध हवेचा शांतपणे घड्याळाचे काटे फिरवत होता. घड्याळही दुजोरा देत दर अर्ध्या तासाने मधुर संगीताची लकेर ऐकवत होते.. पण तरीही या भिजलेल्या वातावरणात आनंद नव्हता. कारण तो एकटा होता. एकाकी होता.

खरंच कोणी हवं ना आपल्याला गच्च बिलगून या शांत पावसात बरोबर चालणारं. ती प्रेयसीच हवी. या मोकळ्या रस्त्यांवरून वाहाणारा पाऊस आणि आपलं मन यात काहीच फरक नाही खरं तर. जे येतंय ते तसंच वाहून जातंय आयुष्य. पण झाडं मात्र कशी शिरशिरताहेत. कारण झाडं चित्रकार असतात . त्यांचे रंग खुलतात पावसात. काही सुकलेले रंग जिवंत होतात तर काही भळभळते रंग विरळ होतात. फुलंही ओल्या वार्याबरोबर झटकतात पाणी. हा निसर्गाशी सतत एकरूप होणारा आणि निसर्ग याच्याशी सतत बोलणारा. पाऊस पडतच होता. आधिच भिजुन आलेली रात्र त्याच्या मनात रहायला आली. तो निघाला बाहेर एकटाच..
त्याच्या मनात काळोख्या रस्त्यावरील मंद दिव्यांच्या प्रकाशात झिरमिरणारा पाऊस चित्रं काढत होता मनाच्या कॅनवास वर.
पावसाचा घनघोर नाही पण वजनदार आवाज याचं मन ढवळून काढतो. हलणार्या  पानांची भिजरी हसरी झाडं पहाताना हा स्पर्शासाठी तडफडतो त्याच्या सृजनशीलतेला जी कवेत घेईल अशा प्रेयसीची मनानेच वाट पहातो.
अशी पावसासारखी आपल्यावर कोसळणारी प्रेयसी हवीय त्याला.

पाऊस आपल्याला एकटं करून टाकतो का खरंच.. की पाऊस आणि प्रेयसीचं नातं जुनंच. मग तो लिहू लागला पावसाशी हितगुज करत..

पावसात भिजायचंय मला. पण कुठे शोधू तुला. किती पाऊस दरवर्षी आठवणींचा.
ढगांच्या साठवणींचा. येतो दूर देशाहून पण सुगंध इथल्याच मातीचा. तोच असतो दरवर्षी. मन ही तेच दरवर्षी. रस्ते फुललेले असतात छत्र्यांनी. पाण्याच्या रेघोट्या
ओला हवेला बांधणार्या. अंगभर तुझा शहारा. उगाच गर्दीत तुला शोधणारा..
भिजवतो आठवणींना मी छत्री करून जरा डळमळती. या वर्षीच्या पावसात मला हसायचंय. तू नसलीस तरी. शोधतो नवा चेहरा डोळ्यातून हृदयात जो डोकावेल. ज्याला तुझी झालर असेल. तुझा मोहकपणा आणी झिरमिर तुझ्या हास्याची असेल. या पावसात मला भिजायचंय नव्या मैत्रिणीबरोबर. जी तुझी कॉपी असेल वा नसेल पण तुझ्यापेक्षाही सोपी असेल.

पावसात नक्की काय होतं. पावसात नक्की काय होतं. हवा गार पिऊन झाडं म्हणतात. आम्ही कोणाला मिठी मारायची. रस्ते ओलेपणाने मस्त
प्रत्येकाच्या मागे धावतात. म्हणतात मला पण घेऊन चला. हवा म्हणते मलाही रहायला घर हवं. आणी पक्षी एकमेकांना चिकटून आडोश्याने अंधार पांघरून झ़ोपतात..

पुरूषांचा मदन आणि स्त्रियांमधली रति… एकमेकांसाठी कोणी हवं म्हणून भिरभिर भिरभिर भिरभिरतात. नवराबायको असलेले सारे लवकर घरी परततात सळसळत. वयात येणाऱ्या मुली वेड्या होतात. नी मुले बिचारी टकमक टकमक उमलणाऱ्या कळ्या पहात रहातात. साऱ्या जगावर पाऊस हा प्रेमाचा, अंतर्मनाला आग लावणारा, वेडेपणाला जागवणारा. आता सारं काही सुरळीत होईल. प्रत्येकाला एकमेकाची सोबत होईल. नवी फुलं, नव्या कळ्या, नवी फळं. नव्या मोसमाला झाली नव्याने पुन्हा तीच मुलं.

© भूषण भन्साली
bhushanbhansali76@gmail.com

1+
Posted on

पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे मनापासून आभार..

2+

पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे मनापासून आभार..
.
लहानपणी च्या आठवणी उकरून काढल्यावर लक्षात येत कि सगळंच बदललंय.. एक पाऊस सोडून.. चाळीच्या बिल्डिंगी झाल्या.. पत्र्याचा स्लॅब झाला.. गल्लीचे पॅसेज झाले.. आता पहिल्यासारख काही नाही.. पण मग MSEB वाले लाईट घालवतात.. मग एसी बंद होतो.. आणि पंख्याला पण स्टॅच्यू.. मग उघडते खिडकी.. आणि शिरतो गारवा.. थंड गार वारा.. लाईट गेली नसती आणि पाऊस पडला असता तरी पण तो गारवा तसा पूर्वी सारखा जाणवला नसता, कदाचित.. कारण हल्ली अंग भिजतच नाही.. घाम तसा सुटतच नाही.. मग गार काही वाटतच नाही.. बालपण काही आठवत नाही.. आणि म्हणून मग पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. अगदी मनापासून..

खिडकी उघडते.. घराची आणि मनाची.. मग ती उघडी नागडी शेमडी पोरं दिसतात.. धुमाकूळ घालणारी.. एखाद्या डबक्यात डुबकणारी.. आणि मग इथं मन भिजतं.. मनसोक्त..
.
एक खिडकी उघडावी,
अन किती तो फरक पडावा..
तिथे पाऊस पडावा..
अन इथे उर भरावा..
.
ती खिडकी घेऊन जाते लांब कधी ट्रेकिंग ला.. कधी बाईक राईड ला आणि निवांत समुद्र किनाऱ्याला.. एका खिडकीत इतकी ताकत असते हे ठाऊकच नव्हतं कधी.. म्हणून त्या mseb वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. कधी कधी.. खिडकी सुद्धा उघडते.. पाऊस आल्यावर आणि लाईट गेल्यावर.. आणि म्हणून मग पहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे आभार मानावेसे वाटतात.. अगदी मनापासून..

2+
Posted on

पाऊस

2+

हवेतल्या गारव्याला कापत जीवाचा ढग करून आबा शेतकडं पळत गेला,
शेताजवळ आला तेव्हा पावसानं जोर धरला होता,
अंगातलं सारं अवसान गोळा करून त्यानं हातातला दगड त्या गळक्या आभाळाकडे भिरकावला. शिव्या हासडल्या आणि उभ्या उभ्याच कोसळला.
हाताशी आलेलं पीक पोरीच्या लग्नाची सोय करून देणार होतं.

2+
Posted on

Author’s Registration is Open

0

First time in India. Bronato.com is creating Professional Platform for Authors. To begin with we have launched our Blog. Here you can share your stories or articles about ‘How to improve writing skills’.
Author’s Registration is Open. SignUp HERE and Join us.

It will be too early to discuss everything now. But with your joining Bronato and Literature will get enriched for sure.

WELCOME to BRONATO.

0
Posted on

ईबू ते ब्रोनॅटो

2+

माझ्याकडे एक डायरी आहे. तिचं नाव आहे ‘डायरी ऑफ आयडीयाज’ त्यात माझ्या खुरपती डोक्याला सुचलेले ‘उद्योग’ (किंवा उद्योगी डोक्याला सुचलेल्या खुरपती) लिहायची सवय आहे. तिथे मी माझ्या अकलेचे तारे मनमुराद तोडतो (हे माझ्या मित्रांचं मत). एखादी गोष्ट किंवा संकल्पना जेव्हा डोक्यात ‘क्लिक’ होते आणि जेव्हा त्याची ‘किक’ बसते तेव्हा मला कधी ते सगळं नोंदवून ठेवतो असं होतं. अश्या बऱ्याच ‘किक’ लागलेला मी माणूस आहे.

शैक्षणिक संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी २००८ मध्ये मी, चंदन तहसीलदार व साईनाथ टांककर यांनी मिळून एक शैक्षणिक प्रयोगशाळा सुरु केली होतीच. या प्रयोग शाळेत अनेक प्रयोग केले. अशातच २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात ईपुस्तकांच्या बाबतीचा एक लेख वाचनात आला. उत्सुकता वाढली. अधिक वाचन केलं. कल्पनांचे घोडे पिसाळल्या सारखे दाही दिशा उधळू लागले. आपण जे काही वाचतो आहोत त्यात भरमसाठ शक्यता आहेत, संधी आहेत आणि तेथे आपण खुपकाही करू शकतो (असे विचार येणं हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतंच). पुन्हा ‘किक’ लागली होती. ईपुस्तक उद्योगातील असणाऱ्या शक्यता व संधी यांच्या विचारांनी माझी अक्षरशः झोप उडवली होती. तेव्हाच ठरवलं ‘जी गोष्ट आपली झोप उडवू शकते ती गोष्ट करायचीच.’ माझ्या विचारांना एका कागदावर उतरवले ‘या उद्योगात काहीतरी करायचंय’ हा विचार माझी बाल मैत्रीण दिपाली मेस्त्रीला सांगितला, तिने काही सल्ले दिले व ‘कर’ म्हणत प्रोत्साहन दिले.

तेव्हा कामाला लागलो. अधिक माहिती काढली. मित्रांशी बोललो. धागे मिळत गेले. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. काय करायचं हे माहित असण्या सोबतच काय नाही करायचं हे देखील समजून घेतलं. तेव्हा जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मराठीमध्ये ईपुस्तक म्हणजे PDF हे समीकरण पक्क झालं होतं. आणि ते देखील ‘फ्री’.

यामुळे झालं असं होतं कि ‘ईपुस्तक’ क्षेत्र हे उद्योग म्हणून विकसित होण्या ऐवजी त्याची ‘सेवा’ झाली व एक चांगला उद्योग उभारी घेण्याच्या काळात ‘सेवा’ पुरवत राहिला व उद्योगासाठी लागणारे जागतिक मापदंड, गुणवत्ता, संशोधन, समस्या निवारण या गोष्टींचे संघटीत तर सोडाच पण स्पर्धा देखील सुरु झाली नाही.

 

 

मी निर्णय घेतला कि PDF करायचे नाही. त्या ऐवजी कोणत्याही स्मार्टफोनवर मजकूर ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणाऱ्या व वाचकांना उत्तम वाचनानुभव देणाऱ्या EPUB (Electronic PUBlications) प्रणालीचा वापर सुरू केला. खूप प्रयोग केले. अनेकदा चुका केल्या पण शिकत राहिलो. उत्साहच्या भरात अगदीच मोठ्या उड्या (झेप) घेण्याच्या नादात आर्थिक झळ देखील सोसली. एखाद्या उद्योगाची उभारणी करण्यासाठी संयम ठेवून काम करायला हवे हे कळले. ई-कॉमर्स व्यवसायातील बारकावे, आर्थिक तसेच कायदेशीर बाबी समजून घेतल्या. ईपुस्तकांची ‘चोरी’ किंवा ‘अनधिकृत हस्तांतरण’ रोखण्यासाठी DRM (डिजिटल राईट्स मॅनेजमेंट) मिळवणे किंवा स्वतःचे app काढणे यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक लागणार होती. पैसे तर नव्हतेच. तेव्हा ‘जुगाड’ कामी आला. कमीत कमी गुंतवणूक करून उद्योग कसा उभरता येईल यावर काम केलं. ईपुस्तकांसाठी नको तेवढी अत्याधुनिक वेबसाई बनवण्यात दीड वर्षे मेहनत केली. वेबसाईट सुरू झाली पण फसली. पण या दरम्यान लेखकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना EPUB बद्दल जागरूक करणे, काम मिळवणे यासाठी धडपड सुरू होतीच. माझी सहयोगी ‘कीर्ती पाटसकर’ हिचे वडील ‘श्री. श्रीकांत कुलकर्णी’ यांच्या पुस्तकाचे पाहिले काम मिळाले. आणि ईपुस्तकांची गाडी सुरु झाली. कीर्तीची सोबत या संपूर्ण प्रवासात खूप महत्वाची ठरली. वर्षभरात ७-८ पुस्तके मिळाली. मराठीतील बहुतेक पुस्तके युनिकोड फॉन्ट मध्ये नसल्यामुळे प्रिंट पुस्तकांची ई-आवृत्ती करणे हे मुख्य काम सुरू झाले.

हे पुरेसं नव्हतं. येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारण्याची कुठेही सोय नव्हतीच. एकतर संपर्कात येणाऱ्या कुणालाही EPUB माहीत नव्हते, त्याबाबत सगळा रिसर्च केला. शक्य तितक्या प्रकाशकांना भेटलो पण बहुतेकांना त्यांना ह्यात रस नव्हता. ज्यांना रस वाटला त्यांनी ‘रस’ तेवढा काढून घेतला (मला अलगद बाजूला सारून). एकंदरीत ‘चांगलाच’ अनुभव आला.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ‘सोशल मीडिया’ वापरायचं ठरवलं. पण फेसबुकवर तोपर्यंत ई पुस्तकात कार्यरत असणाऱ्यांचे प्रस्थ होतं म्हणून ट्विटर कडे मोर्चा वळवला. मिरवणुकीतला गणपती बघायचा तर गर्दी झालेल्या बिल्डिंग वर उड्या मारण्यापेक्षा दुसऱ्या इमारतीवर मोक्याची जागा शोधण्यासारखा हा प्रकार होता. २०१६ च्या मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने होणाऱ्या #ट्विटरसंमेलन मुळे मोठी संधी मिळाली. #ट्विटरसंमेलन च्या कवितांचे ईपुस्तक करणार म्हंटल्यावर प्रचंड प्रोत्साहन मिळाले. सोबतच EPUB फाईल कशी वाचायची याची माहिती प्रसारित केली. याचा फायदा २०१७ च्या ट्विटरसंमेलनाच्या वेळी झाला.

संकेतस्थळ फसले होते म्हणून ‘गुगल प्ले बुक्स’वर प्रकाशन सुरू केले. १९ सप्टेंबर २०१६ ला १००० डाउनलोडचा टप्पा गाठला.  २८ फेब्रुवारील २०१७ ला Bronato.com  या नावाने नवीन संकेतस्थळ सुरू केले. हे संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी हेमंत आठल्ये यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ब्रोनॅटो लवकरच बाळसं धरू लागलंय.

आज २६ देशांमध्ये २१,५०० डाऊनलोड पूर्ण झाले आहेत. 

स्मार्टफोन व किंडलच्या युगात आपला वावर तिथे देखील असावा हे काही प्रकाशकांनी हेरले असले तरीही PDF म्हणजे ईबुक्स अशीच अनेकांची धारणा आहे. पण जाणकारांनी बदलते वारे हेरले आहेत. EPUB बाबत जागरूकता मूळ धरू लागली आहे. मराठी ईपुस्तक उद्योग अजून बराच बाल्यावस्थेत आहे पण भविष्य उज्वल आहे. या उद्योगाच्या वृद्धीसाठी लागणारे तज्ज्ञ, बाजारपेठ अभ्यासक, गुंतवणूकदार व इतर संलग्न व्यावसायिक यांची मोट बांधत ईपुस्तक उद्योजकांमधील ‘स्पर्धात्मक सहकार्य’ यावर बरेच काही अवलंबून आहे.

पेपरलेस शिक्षणाच्या दृष्टीनेही EPUB खूप महत्वाचे आहे. भारतीय भाषांवर आधारित एक खुप मोठी बाजारपेठ आहे. व्यावसायिकता, जागतिक दर्जा व सृजनशीलाता यांवर आधारित व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. मराठी ई पुस्तक उद्योग यात आपले कर्तृत्व नक्कीच सिद्ध करेल. तोपर्यंत तुम्ही ई पुस्तके (EPUB) वाचा आणि इतरांना देखील सांगा.

या प्रवासात मोलाची साथ देणारे प्राजक्ता तांडेल, राजेंद्र सानप, विजय पडघन, जुईली मेस्त्री यांच्या सोबत पुढील प्रवास सुरु आहे. या उद्योगात आमच्यासोबत येण्यासाठी नक्की संपर्क करा.

लोभ असावा.
शैलेश खडतरे– 9970051413.
www.bronato.com

2+