Posted on

तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१८

तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१८ :: १६ ते १८ फेब्रूवारी २०१८ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन

 ” प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! “

ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणी मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.

यंदाचे #ट्विटरसंमेलन आम्ही १६,१७,१८ फेब्रुवारी २०१८ रोजी भरवणार आहोत.चार दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून आपण ह्यात सहभागी होऊ शकता.संमेलनाबद्दल माहितीसाठी @MarathiWord ट्विटरखात्याशी संलग्न व्हावे.

आता आपण ट्विटर संमेलनाची थोडी ओळख करून घेऊया. संमेलनाचा मुख्य हॅशटॅग असेल #ट्विटरसंमेलन आणि सोबत असतील
“बारा हॅशटॅग मित्र”.व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे विषय निवडूण त्याचे हॅशटॅग केले आहेत.थोडक्यात तुम्हाला ट्विट करताना दोन हॅश टॅग वापरायचे आहेत, मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आणि सोबत बारा हॅश टॅग पैकी एक हॅशटॅग.

ओळख “बारा हॅश टॅग मित्रांची ” :

#माझीकविता :
तुम्ही कविता करता ? ती कविता हजारो लोकांनी वाचावी असे तुम्हाला वाटते ? उत्तर हो असेल तर वापरा #माझीकविता. तुम्हाला आवडलेल्या इतर कविता #माझीकविता वापरून तुम्ही ट्विट करू शकता.कविता मोठी असेल तर ती कागदावर लिहुन किंवा मोबाईलवर टंकित करून त्याचे छायाचित्र काढून ट्विटावे.मागील संमेलनातील निवडक कवितांचे इबुक तयार करण्यात आले होते, यंदाही तो प्रयत्न राहिल.

#माझीकथा :
चला ट्विटरवर मराठी कथा लिहूया शंभर ट्विट्स मध्ये.फक्त शंभर ट्विट्स मध्ये तुम्हाला लिहायची आहे एक कथा वापरून #माझीकथा.तुम्ही एखादी दिर्घ कथा सुद्धा आपल्या ब्लाॅगवर लिहून #माझीकथा वापरून दुवा ट्विट करू शकता.

#माझाब्लाॅग :
तुम्ही लिहलेल्या ब्लाॅग बद्दल चर्चा #माझाब्लाॅग वापरून करू शकता. ब्लाॅगचा दुवा देऊन ट्विटमध्ये ब्लाॅग बद्दल थोडक्यात माहिती लिहावी.

#माझीबोली :
महाराष्ट्रात आपण जरी मराठी बोलत असलो,तरी राज्यातील प्रत्येक भागात मराठीच्या वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत.प्रत्येक बोलीत प्रचंड समृद्ध असे ज्ञान भांडार आहे. ह्या बोली डीजीटल युगात टिकल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते.त्या बोलीने वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेले ज्ञान जगासमोर येणे गरजेचे आहे.
म्हणुन #माझीबोली वापरून आपण आपल्याला माहित असलेल्या बोलींबद्दल ट्विट करू शकता. बोलीतील शब्द,गाणी,म्हणी,अभंग,ओवी,काव्य आणि तिचे स्वतःचे असे व्याकरण इतर मराठी माणसांना समजावून सांगु शकता.

#साहित्यसंमेलन :
साहित्य संमेलनात व्यक्त झालेल्या विचारांवर ,इतर घडामोडींवर आणि अध्यक्षीय भाषणावर आपण आपले मत #साहित्यसंमेलन वापरून नोंदवू शकता.

#वाचनीय :
तुम्हाला कुठले पुस्तक आवडले ? सध्या तुम्ही काय वाचत आहात ? कुठले लेखक/लेखिका तुम्हाला विशेष आवडतात?.तुमच्या वाचन प्रेमाबद्दल आम्हाला जाणुन घ्यायला आवडेल.समृद्ध अशा मराठी साहित्याबद्दल #वाचनिय वापरून तुम्ही चर्चा करू शकता.

#हायटेकमराठी :
मराठीच्या कक्षा आता रूंदावत आहेत.आता मराठी संगणकावर दिसते,मोबाईलवर दिसते ,परंतु मराठीसाठी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी मराठी तयार करण्यासाठी अजुनही कल्पक प्रयत्नांची गरज आहे.मराठीला हायटेक आणि डिजिटल माध्यमांवर सुपरहिट बनवण्यासाठी तुमच्या डोक्यातील कल्पना तुम्ही  #हायटेकमराठी वापरून ट्विट करू शकता.मराठी संकेतस्थळ,अॅप्स, फाॅन्ट्स बद्दल माहिती तुम्ही #हायटेकमराठी वापरून देऊ शकता.

#बोलतोमराठी :
आपण जाल तिथे मराठी बोलता का ? तुमचे अर्थ आणि सामाजिक व्यवहार मराठीत करता का ? तुम्हाला
कुठल्या अडचणी येतात ? महाराष्ट्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी काय करायला हवं ? .तुम्ही प्रतिकूल वातावरणातही मराठी आवर्जुन वापरली त्याचे किस्से आणि वरील प्रश्नांवर चर्चा तुम्ही #बोलतोमराठी वापरून करू शकता.

#मराठीशाळा :
मराठी शाळांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची #मराठीशाळा वापरून आपण चर्चा करू शकता.आपल्या भागांतील यशस्वीपणे चालणा-या मराठी शाळांची ओळख आम्हाला करून देऊ शकता.मराठी शाळेत शिकून आज विविध ज्ञानशाखांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींची ओळख करून देऊ शकता.मराठी शाळेत शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आणि आठवणी आपण #मराठीशाळा वापरून ट्विट करू शकता.

#भटकंती :
तुम्ही महाराष्ट्रातील कानाकोप-यात असणा-या गडकिल्ले,मंदिरे,जंगले,डोंगरद-यां बद्दल चर्चा #भटकंती वापरून करू शकता.आपल्या भागातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देऊ शकता.#भटकंती प्रवासाची आवड असणा-या पावलांच्या अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ आहे.

#खमंग :
खवैयांसाठी हे खास हॅशटॅग.महाराष्ट्र आणि जगात इतर कुठेही बनवल्या जाणा-या स्वादिष्ट पाककृतींची चर्चा आपण #खमंग वापरून करू शकता.आपण पदार्थ
आणि तो बनवण्याची कृती कागदावर किंवा मोबाईल मध्ये मराठीत लिहून, त्याचे छायाचित्र काढून ट्विट करायचे आहे.

#माझाछंद :
तुमच्या छंदाविषयी तुम्ही #माझाछंद वापरून चर्चा करू शकता.तुम्ही काढलेले छायाचित्र,रांगोळी,चित्र आम्हाला ट्विट करू शकता.तुम्ही एखादे गायलेले गाणे ट्विट करू शकता. मन रमवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या छंदाविषयी व्यक्त होण्यासाठी #माझाछंद हे व्यासपीठ आहे.

संमेलनातील इतर उपक्रम :
1. ट्विट व्याख्यान : वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचे व्याख्यान.
2. मराठी भाषेसाठीचे ठराव मांडणे.
3. मराठी भाषेसंबंधीच्या प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करणे.

आभार,
आयोजक ट्विटर खाते : @MarathiWord
संपर्क पत्ता : swapshingote@gmail.com

0
Posted on

सर्वसामान्याच्या बांधापर्यंत पोहचलेलं ‘जू’

आपलं जग केवढं तर आपापल्या डोक्याएवढं तसचं माणसाचं जीवन कसं तर ज्याला त्याला समजेल तसं.’ हे आत्ता सूचण्याचं कारण नुकतीच ‘जू’ ही कादंबरी वाचून काढली. प्रत्येकाचा जीवन संघर्ष वेगळा असतो; जो वाचताना आपल्याला नवे अनुभव देतो, समृद्ध करून जातो याची प्रचीती ही कादंबरी वाचताना सतत येते. पूर्वी एकेका साहित्यिकाने मराठी साहित्यावर वर्चस्व गाजवलं. त्यांचा प्रभाव इतका होता की, तो समग्र कालखंडच त्यांच्या नावाने ओळखला जावू लागला. आता मात्र साहित्यात विशेषत: मराठीत विविध परिसरातील विविध जीवनानुभव घेतलेले साहित्यिक आपण जीवन- विचारविश्व मांडत आहेत. इतकंच नाही तर, सोशल मिडियासारख्या प्रभावी माध्यमांमुळे ते सर्वदूर पोहोचत आहेत. कथा, कविता आणि कादंबरी यासोबतच फेसबुकवर आपले हे वर्चस्व राखणा-या अलिकडच्या तरुण मराठी साहित्यिकामध्ये नाशिकच्या ऐश्वर्य पाटेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

Image may contain: drawing

नाशिकपासून साधारण ६० कि.मी. अंतरावर राहणा-या आणि साहित्य अकादमीचा पहिला युवा साहित्य पुरस्कार जिंकणा-या मराठीतील या सारस्वताला खरी ओळख मिळाली ती त्यांच्या `भुईशास्त्र’ या काव्यसंग्रहामुळे! २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहाने महाराष्ट्रातील सर्व मानाच्या पुरस्कारांसह साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कारही जिंकला. साहजिकच, त्यांच्या पुढील पुस्तकाबाबत साहित्यातील जाणकार व रसिकांना उत्सुकता होती. ती पूर्ण झाली २०१६ मध्ये ‘जू’ या कादंबरीच्यारुपाने…या कादंबरीने समीक्षक, साहित्यिक, रसिक यांचे समाधान तर केलेच; पण मोठया प्रमाणात सातत्याने न वाचणारा सर्वसामान्य वाचकही नव्याने जोडला.

अनेक जाणकारांनी `जू’चे नवी कादंबरी, वेगळी कादंबरी म्हणून स्वागतही केले पण एक वाचक म्हणून मला या कादंबरीचे सगळयात मोठे यश हे जाणवले की, ही कादंबरी सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचली आणि तिने अनेक साहित्यबाहय घटकांना बोलतं केलं. सर्वसामान्य वाचकांचे प्रेम गेल्या पाच- दहा वर्षांत ज्या मोजक्या पुस्तकांना मिळाले त्यात या कादंबरीचा क्रमांक बराच वरचा आहे. वाचनसंस्कृती कमी झाली आहे. नवी पिढी वाचत नाही अशी ओरड होणा-या आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळात या कादंबरीने वय वर्ष दहा ते नव्वद अशी शेकडो सर्वसामान्य माणसे जोडली.

मराठीतील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे, डॉ. द. ता. भोसले, बाबाराव मुसळे, नागनाथ कोत्तापल्ले, अरुणा ढेरे, मिलिंद जोशी, कौतिक ढाले- पाटील, अभिराम भडकमकर, प्रा. बी. एन. चौधरी, कमलाकर देसले, आबा महाजन या साहित्यातील दिग्गजांनी जसे आपले मत- निरीक्षण नोंदविले तसेच अनेक सर्वसामान्य वाचकांनी आपल्या भाषेत, उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया पाटेकरांच्या फेसबुकवर नोंदविल्या, फोनवर कळवल्या तर काहींनी पत्रातूनही व्यक्त केल्या.

काय आहे `जू’ तर एका मुलाची, त्याच्या कुटुंबाची विशेषत: त्याच्या आईच्या जीवनसंघर्षाची कहाणी. जग विरोधात गेले तरी चालते फक्त रक्ताचे सोबत पाहिजे जग जिंकता येते. पण इथे तर त्या मुलाचे वडिल, आजी, आत्या, मामा, चुलते सारे विरोधात एकवटतात. काहीही गुन्हा नसताना या स्त्रीला एकाकी पाडले जाते, तिच्या हक्कांपासून वंचित केले जाते. थोडक्यात, तिच्यावर स्वकियांकडून अन्याय होतो. ती आपल्या चार मुली आणि एका मुलाला वाढविण्यासाठी उघड्यावर जगते, दिवसरात्र कष्ट करते आणि समोर येणाऱ्या संकटांना धीराने तोंड देते. त्यावर मात करते आणि आला दिवस ढकलत पुढे चालत राहते. या संघर्षाची तुलना होवू शकत नाही कारण प्रत्येक लढाई वेगळी असते आणि ती वेगवेगळया रणांगणांवर लढली जाते. इथे सारे जग एकीकडे असताना त्या आईचा संघर्ष संतांनी सांगितल्याप्रमाणे अंतर्बाहय स्वरुपाचा आहे. नातेसंबंध, त्यांच्या अपेक्षा, त्यांचा एकांगी विचार, आरोप, कोर्ट- कचे-या, त्यातील दु:खे, उपासमार अशा विविध यातनांशी या माऊलीची रोजच गाठभेट आहे. ‘जू’ वाचून आपण अंतर्मुख होवून स्वत:च्या जीवनाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागतो. छोटयामोठया गोष्टीसाठी कुरकुरणा-या आपल्याला आपलीच लाज वाटू लागते. कुणाला ही कादंबरी म्हणजे त्या मुलाची भावडयाची वाटचाल- आत्मकथन वाटते, कुणाला त्याच्या आईची जीवन- संघर्षकहाणी, कुणाला ती बदलते मानवी स्वभाव- स्वार्थीपणाचे चित्रण वाटते तर कुणाला चार पिढयांचे समग्र चित्र काढणारी साहित्यकृती. अनेकांना मात्र ती ग्रामीण भागातील एका सक्षम (खमक्या) महिलेची लढाई वाटते. पुरूषप्रधान जोखडातून स्त्रीला दुबळी मानणाऱ्या संकुचित मनोवृत्तीला ही चपराक आहे.

खरे तर, मराठीत ग्रामीण साहित्य विपुल आणि विविध प्रकारे लिहिले गेले आहे. या लिहिणाऱ्यांपैकी अनेकांची नाळ आनंद यादव यांच्याशी घट्ट आहे. ऐश्वर्य पाटेकरही त्याला अपवाद नाहीत. मात्र ते या मातृसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुख-दु:खासह; जो भवताल, जे गाव आणि समकालीन चित्र रेखाटतात ते सामर्थ्याने आणि सर्वांगीण स्वरुपात येते. अनुभवसंपन्नता, अस्सल अनुभूती आणि ओघवत्या लेखन शैलीमुळे वास्तव ग्राम्यजीवन पाटेकर प्रभावीपणे व तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने मांडतात. या लेखनात उत्स्फूर्तता तर आहेच पण त्याचसोबत एक विशिष्ट संयम पण आहे. आततायीपणा, राग-द्वेष या भावनांना नियंत्रित ठेवून रेखाटलेले हे जीवन वाचणाऱ्याला सकस अनुभव देते. विचार संपन्न करते. म्हणून अगदी दहा वर्षांच्या मुला-मुलीपासून तर नव्वद वर्षांचे वयस्कसुद्धा भारावलेपणातून `जू’वर अभिव्यक्त होतात. मला वाटते, ही कादंबरी बहुजन समाजाच्या आत असणाऱ्या विविध वृत्ती- प्रवृत्ती, समग्र गावगाडयाचे व त्यातील भावभावनांचे चित्रीकरण आहे. ‘भुईशास्त्र’च्या यशाची पुढची पायरी म्हणून `जू’कडे पाहता येते. तसेच, मराठी कादंबरीच्या मांडणीची नवी वेगळी सुरुवात म्हणूनही ही कादंबरी काही नवे सांगू पाहते. ज्यांना बदलता गाव, समग्र ग्रामीण जीवन आणि तेथील जगण्यातील ताणेबाणे समजावून घ्यायचे आहेत, त्यांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे असे ठामपणे सांगता येते.

डॉ. राहुल अशोक पाटील

Continue reading सर्वसामान्याच्या बांधापर्यंत पोहचलेलं ‘जू’

0
Posted on

काव्यांजली “जतन साहित्य संपदेचे”

आजचं युग हे सोशल मिडियाचं युग …ग्लोबलाईजेशन झालं आणि जग जवळ आलं …वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सरळ आणि सोपी झाली तशी वेगवेगळ्या भाषाही एकमेकीत मिसळल्या. काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण गरजेचं झालं. ग्लोबल नेटवर्कमुळे फायदे झालेच पण न कळत आपण दुरावलो ते आपल्या मातृभाषेला.

आजच्या पिढीला आणि येणार्याही पिढीला इंग्रजी ही व्यवहाराची भाषा यायलाच हवी पण मातृभाषेला विसरून मात्र चालणार नाही. महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरल्या जाणार्या ३ प्रमुख भाषा हिंदी, उर्दू आणि मराठी. युवा पिढीला पुन्हा ह्या भाषांकडे वळवण्यासाठी अनेक ठिकाणांहून अनेक संस्था आज महाराष्ट्रात सातत्याने कार्यरत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून भाषा चळवळी उभ्या राहिल्या आहेत. आणि ह्यातलीच एक अग्रगण्य संस्था “पासबान – ए – अदब”.

पाश्चिमात्य अंधानुकरण करणाऱ्या आजच्या युगात समृद्ध भारतीय भाषा आणि परंपरा लोप पावत असल्याने, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि मानबिंदू असलेल्या ह्या भाषांशी युवा पिढीला जोडून Continue reading काव्यांजली “जतन साहित्य संपदेचे”

0
Posted on

मन क्षितिजावरती… पुस्तक परिचय – बापू भोंग

मन क्षितिजावरती…

सौ.राणी कदम लिखित काव्य संग्रह आयुष्यातील अनेक भावनांचे विश्व सांगणारी कलाकृती डोळ्यांसमोर अनेक चित्र उभे करते.
आव्हान देईल एखादी गझल
नीट बघ जरा
भिनव रक्ताच्या कणाकणात
अन् सामोरा जा जरा……..
खरच आपले आयुष्य अनेकदा आव्हानच होऊन बसते.जेव्हा दुःख सागरापेक्षा ही मोठे होऊन बसते .अन् त्यातूनच कवयत्री सामोरे जाण्याचा प्रयत्न करते अन् ति पुढे म्हणते.
आठवां मधून पाझरुन
पुन्हा थकून नाही जाव
आयुष्याच्या चित्रात
रंग नवीन भराव…….


हे आगदी खर आहे माणसाला आयुष्यात कितीही दुःख ,वेदना झाल्या तरी कधीच थकून नजाता प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे.अन् आपले आयुष्य आनंदाने घालवले पाहिजे .म्हणजे अनेक प्रकारचे रंग या संसारात भरावेत,
मन थेंब आठवांत डूबता
मन वेंदनात हरवूनी जावा
भिजल्या मनात असा
मन प्रिय धावून यावा…..
माणसाच्या आयुष्यातील दुःख कधीच संपत नाही . आपले मन रमवण्यासाठी जुन्या आठवणीत जाते.अन् ति प्रियकराला म्हणते अरे माझे दुःख ,वेदना ,माझे संकट वाटून घेण्यासाठी कधीतरी धावून ये.
तुझ्या उबदार मिठीत
मला हरवून जायचंय……
तुझी मला आठवण आली आहे आणि तुझ्यात मला हरवून जायाचे आहे.पण,…
व्याकूळ तुझ्या भेटीसाठी
तू कधी भेटलाच नाही
साथ ती एकदुज्याची
तू आलाच नाही ………
प्रत्येकाच एक स्वप्न असत.पण ते निरागस असते त्या मुळे स्वप्न स्वप्नच राहत.अन् प्रत्येक जण केव्हाना केव्हा तरी जुन्या आठवणीच्या विहरात जातो .पण ति प्रिय व्यक्ती कधीच येत नाही आपण मात्र उगाच मनातून जळत राहतो.
ति पण येत नाही अन् तो पण येत नाही.म्हणून ती पुढे लिहते.
विरहच तो आनंद मानते
नको ती भेट पुन्हा ……
खर तर लिहण्या सारख खूप आहे पण असो मर्यादा आहेत .
एकंदरीत काही रचना सोडल्यातर कविता संग्रह खूपच वाचनीय झाला आहे.
आपणांस पुढील लिखाणास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा .असच छान छान लिहत चला .अन् आपले आयुष्य आनंदाने जगत चला .
कळावे .
आ.नम्र
बापू भोंग
लेखक,कवी
इंदापूर ,पुणे
9763989823

0
Posted on

‘अस्वस्थ नोंदींचा हिशेब’

-सुरेंद्र गोंडाणे
surendra.gondane@timesgroup.com
…..
पी. विठ्ठल. विद्यमान मराठी साहित्य परंपरेतील महत्त्वाचे सर्जनशील कवी. ‘माझ्या वर्तमानाची नोंद’ या २०११मध्ये प्रकाशित काव्यसंग्रहानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह त्यांनी वाचकांसमोर ठेवला आहे. एकीकडे कवितांचा ‘काऊंट’ वाढवून ‘लाइक्स’ची संख्या मोजणाऱ्यांची संख्या वाढत असताना पी. विठ्ठल यांच्यातील काव्यसंवेदना संयत तरीही अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ घेऊन येते. ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह म्हणजे कवीच्या सर्जनशीलवृत्तीला पडलेल्या प्रश्नांचा मोहोळ आहे. त्यामुळेच संवेदनशीलता आणि प्रतिभेचा अंगभूत स्थायीभाव असलेल्या त्यांच्या कवितेतील प्रतिमा-प्रतिकांतून अस्सल जीवनानुभवाचे दर्शन घडते. जगण्यातल्या वास्तवाकडे अत्यंत संवेदनशीलपणे बघणाऱ्या पी. विठ्ठल यांच्या कवितेतील प्रतिमा-प्रतिकांत जसे माणसाच्या झालेल्या शहरीकरणाचे चित्र आहे, तसे त्यांचा भवताल अधोरेखित करणाऱ्या ग्रामीण जीवनातील चित्रणही तेवढ्याच ताकदीने आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन ते माणसाचे झालेले शहरीकरण हा प्रवास उलगडताना कवीतील सर्जनशील जाणिवा सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधतात. या तिन्ही वेष्टनाखाली दबलेल्या कारुण्यमयी जीवनाच्या अस्वस्थ हुंकारात त्यांची कविता आकार घेते. त्यामुळे पी. विठ्ठल यांच्या कवितेतील ‘शून्य एक मी’चा शोध अनेकार्थानं शोषितांच्या जीवनानुभवाशी येऊन प्रत्येकाच्या समाजभानाला आव्हान देतो; तसा तो चंगळवादी, भौतिकवादी मानसिकतेतील अस्वस्थेच्या रुपाने प्रकट होत ‘माणूस’ म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाच्या आत्मभानालाही साद घालतो.


‘शून्य एक मी’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरूनच संग्रहातील गूढगर्भी, वलयांकित अस्वस्थ नोंदी असलेल्या अंतरंगाचा वास्तवाभास अस्वस्थ करतो. कदाचित ‘अस्वस्थता’ हेच आपल्या जाण्याचे वास्तव असावे. कारण, जोपर्यंत आपण अस्वस्थ होत नाही तोपर्यंत आपल्या अंतरंगात साचलेलं… अनेकदा आपल्याला आतल्या आत ओरबाडून काढणारं ‘शब्द’ होऊन बाहेर येत नाही. ‘शून्य एक मी’ हा काव्यसंग्रह म्हणजे पी. विठ्ठल यांच्यातील अस्वस्थतेचे शब्दरूप आहे. त्यामुळेच या संग्रहातील प्रत्येक कविता जगण्यातलं मूल्यभान घेऊन येणारी आहे. ‘माझ्या जगण्याची संहिता’ या पहिल्याच कवितेतून जगण्याकडे चिकित्सकतेने बघण्याच्या पी. विठ्ठल यांच्या नजरेचा प्रत्यय येतो…

अभिरुचीचे केंद्र हलले आहे आपले
गोपनीय गोष्टींनाही प्रतिष्ठा मिळत गेली हळूहळू
आणि शोकेसमध्ये कधी येऊन उभी राहिली न्यूड बाहुली
कळूच दिलं नाही माझ्या एकरेषीय जगण्यानं

आपलं जगणं आपण भौतिक सुविधांच्या वेष्टणांत लपेटून घेत त्याला सजवित असतो. मात्र, माणूस म्हणून आपलं नग्नपण लपवणं इतकं सहजसोपं असतं काय? हा अस्वस्थ आणि सार्वभौम सवाल कवी पी. विठ्ठल यांची कविता विचारते. ‘हुसेनची अचानक मौल्यवान होणारी चित्र अन् कबीर, तुकारामावर साचत चाललेली धूळ’, या प्रतिकांतून आपलं एकरेषीय जगणं मूल्यरेषांपासून ढासळत चालल्याचं वास्तव कवी प्रभावीपणे शब्दबद्ध करतो. त्यानंतरच्या प्रत्येक कवितेतील वेगवेगळ्या संदर्भजाणिवांतून हा अस्वस्थ कोलाहल वाचकांना जगण्याच्या परिमाणांमागील वास्तवाशी समरस करतो.

गावातल्या बीएएमएस डॉक्टरानं शरीर थंड
पडल्यावरही लावून दिली सलाइन
टपकणाऱ्या थेंबाकडं बघून डोळे गोठून गेले तरी
पेशंट हलेना तेव्हा कुणी तरी म्हणालं,
‘लाकडं गोळा करा’
इतका कसा क्रूर असतो सामांन्याचा मृत्यू

‘दुसऱ्या जगातल्या माणसांबद्दल…’ या कवितेतील वरील ओळींतून पी. विठ्ठल यांनी शब्दबद्ध केलेलं माणसाच्या अधांतरी जगण्याचं वास्तव प्रत्येक संवेदनशील मनाला सुन्न करते. या कवितेतून व्यक्त झालेला जगण्यातला विरोधाभास अधिक हेलावून सोडतो… संग्रहातील प्रत्येक कवितेतील प्रतीमा-प्रतिकांतून व्यक्त होणारा हा अस्वस्थ भवताल चंगळवादी मानसिकतेवर प्रहार करतो. ‘पाणी’ या कवितेतील पुढील ओळींतून पी. विठ्ठल हे समाजातील बेगडी प्रवृतींचा नेमकेपणाने बुरखाफाड करतात…

दाबून धरा नाक
तोंडावरती लावून घ्या मास्क
महासत्तेचा काळा ढग फुटलाय पुन्हा
आणि गटार गटारीसारखीच वाहतेय

आपण लोकशाही मूल्यांच्या कितीही गप्पा मारल्या, तरी प्रत्यक्षात मात्र माणसामाणसांतील दरी वाढत आहे. चंगळवादी मानसिकतेनं इथल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या हक्काचंही पोहोचू दिलं नाही, हे अस्वस्थ वर्तमान पी. विठ्ठल यांची कविता तेवढ्याच ताकदीने शब्दबद्ध करते. ‘घर सजवायचं असतं म्हणून’ या कवितेतून माणसाचं जगणं किती बेगडी होत चाललंय याचं चित्रण आणि शहराच्या सिमेंटच्या भिंतीआडचं जगणं बघून स्वत:चंच अस्तित्व शोधणारा बाप पी. विठ्ठल यांच्यातील कवीला खोलवर अस्वस्थ करतो…

बापाची आश्वासक नजर फिरते घरभर
आणि भव्य वगैरे असणारं घर
केविलवाणं दिसू लागतं

घरासारखं बापाला सजवता येत नाही
बाप घरापेक्षाही थोर असतो

एकीकडे अशी स्वस्थता दाटून येत असताना ‘मुली’ या कवितेतून कवी आश्वासकपणे व्यक्त होतो. परंपरेचा पदर झुगारून देत भूतकाळातील पुरातन ओझं दूर सारणाऱ्या ‘मुली’ कवीला नवोत्कर्षाची निरभ्र पहाट फुलविणाऱ्या भासतात…

दफ्तरांच्या ओझ्यानं दबणारी पावलं
आता तुडवत नाहीत
चिखलमातीचा प्रतिगामी रस्ता
त्यांच्या आतूनच उमलून आलंय एक
स्वाभिमानाचं सुंदर फूल
जे कोमेजणार नाही कधीच कुठल्याही
पुरुषी अहंतेनं किंवा
उखडूनही पडणार नाही कुठल्याच
सुनामीनं!

‘आपण सारे शून्य..!’ ही कविता जगण्यातील वास्तवाचं तत्त्वचिंतन मांडणारी आहे. माणसाच्या देहाचे अस्तित्व क्षणात नाहीसे होतात; हे सांगताना, माणसं पोरकी होण्यासोबतच निस्तेज होणाऱ्या घराच्या भिंती, आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीने वापरलेल्या चष्मा, काठी, कपडे, चपला अशा वस्तू बेवारस होण्याची प्रतिमा पी. विठ्ठल यांच्यातील प्राध्यापक, सर्जनशील कवी, समीक्षक संवेदनशीलपणे उलगडत जातो.

शेवटी काय?
–तर माणूस शून्य
त्याच्या भावना शून्य
त्याचे अस्तित्व शून्य

असं सांगत माणसाच्या आयुष्यातील शून्याची ‘बेरीज’ जीवनातील ‘वजाबाक्यां’चंच गणित मांडत जाते. माणसाला आपल्या आयुष्यील ‘शून्या’ची सांगड घालता आली पाहिजे, हा आशावाद समाजाला मानवतेचा विचार देणारा आहे. कॉन्टिनेन्टलतर्फे प्रकाशित ‘एक शून्य मी’ या काव्यसंग्रहाचे दिनकर मनवर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ या काव्यसंग्रहाचा आशय वाचकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविणारे आहे. एकूणच ‘एक शून्य मी’ हा पी. विठ्ठल या संवेदनशील कवीचा संग्रह मानवी अस्वस्थता उलगडण्यासोबतच माणसाच्या जगण्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी जागविणारा आहे, तसा तो मराठी काव्यपरंपरेतील आपल्या अंगभूत सशक्ततेने माणसाच्या जगण्याच्या नोंदी मांडणारा आहे.
……..
‘शून्य एक मी’ (कवितासंग्रह)
कवी : पी. विठ्ठल
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पृष्ठ : १२८
किंमत : १५० रुपये
…………………

1+
Posted on

‘ई-बुकमुळे वाचकांचा टक्का वाढतोय’

Maharashtra Times | Updated: Jan 28, 2018, 01:02AM IST

म. टा. वृत्तसेवा, ठाणे 

गेल्या काही वर्षांत वाचकांचा टक्का कमी होत असल्याची टीका होत आहे. मात्र, यात तथ्य नाही. कारण ई-बुक वाचकांची संख्या वाढत आहे. ई-बुक हे मुद्रीत पुस्तकांच्या तुलनेने स्वस्त आणि पटकन उपलब्ध होणारे असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वाचकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रतिपादन ब्रोनेटो डॉट कॉमचे शैलेश खडतरे यांनी केले. शनिवारी गडकरी रंगायतन कट्टा येथे लेखक व इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांच्या ई-बुक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘ई-बुक’मुळे वाचनसंस्कृती सर्वदूर पोहोचण्यास मदतच होणार आहे. मुद्रित पुस्तकांच्या वितरणाला मर्यादा असतात. शिवाय पुस्तकांचा खर्चही अफाट असतो. त्यामुळे या पुस्तकांच्या किंमतीही तुलनेने अधिक असतात. त्याउलट ई-बुक स्वस्त आणि जगभर उपलब्ध असते. कुणीही पैसे मोजून ते पुस्तक डाऊनलोड करू शकतो. त्याचा वितरणाचा आणि छपाईचा खर्च नसल्याने पुस्तकाच्या किंमती थेट अर्ध्यावर येतात. त्यामुळे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकजण ई-बुक वाचतात, असे खडतरे म्हणाले. ई-बुक प्रकारातील कोणत्याही पुस्तकाची २० पाने विनामूल्य वाचता येतात. मात्र ती कॉपी करता येत नाहीत. त्यामुळे पायरसी रोखली जाते. पैसे थेट लेखकाच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय अनेक पुस्तके विनामूल्यही मिळतात. तसेच लेखकाचे लिखाणही जगभर पोहचण्यास मदत होते, अशी माहिती खडतरे यांनी दिली.

टेटविलकर यांच्या महाराष्ट्रातील वीरगळ, ‘दुर्गलेणी : दिव, दमण आणि गोव्याची’ ही दोन पुस्तके ब्रोनॅटो डॉट कॉमने इंग्रजीत ई-बुक रूपात प्रकाशित केली. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठीतील पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण इतिहास परिषदेच्यावतीने गडकरी कट्टा येथे आयोजित एका समारंभात या तीन ई-बुकचे औपचारिक प्रकाशन झाले. रविंद्र लाड यांनी ई-बुक या आधुनिक माध्यमात ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनुवाद करणाऱ्या माधुरी गोखले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. टेटविलकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात नव्या माध्यमात ऐतिहासिक लेखन उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रोनॅटो डॉट कॉमचे आभार मानले.

मूळ वृत्त येथे वाचा

0
Posted on

‘मुक्त व्यासपीठ’ आणि Bronato प्रस्तुत ‘काव्य स्पर्धा’

प्रत्येक माणूस हा रसिक असतो आणि त्याच्या आत कुठे ना कुठे तरी एक कलाकार दडलेला असतो. तुमच्या आत देखील असाच एखादा कलाकार दडलेला असेल. अशा कलाकारांसाठी सुरवात झाली मुक्त व्यासपीठाची.. मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल गेले एक वर्ष साहित्यातील अनेक कलाकृती रसिकांसमोर आणायचा प्रयत्न करत आहे. ह्या मुक्त व्यासपीठाला दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आम्ही, म्हणजेच ‘मुक्त व्यासपीठ’ आणि ‘bronato.com’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्पर्धा आयोजित केली आहे, जिथे तुमच्या आत दडलेल्या कवीमनाला संधी मिळेल. तुम्हाला इतकंच करायचं आहे कि तुमची एक रचना आम्हाला ईमेल करायची आहे.

तुम्ही पाठवलेल्या कवितांपैकी काही निवडक कविता आम्ही bronato.com वर ब्लॉग स्वरूपात प्रसिद्ध करू. त्या नंतर सर्व निर्णय हा रसिकांचा असेल. प्रत्येक कविते खाली रसिकांना लाईक करण्याचं ऑप्शन असेल. सर्वाधिक लाईक असलेल्या ३ कवींना संधी मिळणार आहे ‘मुक्त व्यासपिठावर’ झळकण्याची. जिंकलेल्या ३ कवी आणि त्यांच्या कवितांचे मुक्त व्यासपीठ तर्फे व्हीडीओ बनवले जातील. आणि आपल्या चॅनल वरून प्रसिद्ध केले जातील.

आम्ही तुम्हाला संधी देत आहोत जगा समोर तुमच्या कवितेला सादर करण्याची. तर वेळ दवडू नका. लवकरात लवकर आम्हाला तुमची कविता पाठवा.

 

तुमच्या कविता आम्हाला ह्या इमेल आयडी वर पाठवा

mukt.sanvad@gmail.com

स्पर्धेचे नियम व अटी:

१. तुम्ही मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलेलं असावे..

२. ब्रॉनतो.कॉम वर तुम्ही रजिस्टर असावे..

३. तुम्ही पाठवलेली कविता हि तुम्ही स्वतः रचलेली असावी..

४. पाठवलेली कविता जर ह्या पूर्वी कुठे हि प्रकाशित झाली असेल तर त्या कवितेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

५. स्पर्धे दरम्यान किंवा त्या नंतर हि जर कुणी हि त्या कवितेवर तुमच्या व्यतिरिक्त हक्क सांगितला आणि जर ती कविता तुमची नाही असं सिद्ध झालं तर ती कविता स्पर्धेतून रद्द केली जाईल..

या स्पर्धेची माहिती तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा.

7+

Users who have LIKED this post:

  • avatar
Posted on

सदाशिव टेटविलकरांची पुस्तके आता इंग्रजीत 

ई-बुक आवत्तीचे शनिवारी प्रकाशन 

प्रतिनिधी, ठाणे 

सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची ‘महाराष्ट्रातील वीरगळ’, ‘दुर्गलेणी-दिव, दमण आणि गोवा’ ही दोन पुस्तके आता इंग्रजीत इ-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने ठाण्यात शनिवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गडकरी कट्ट्यावर या ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन होईल. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठी पुस्तकही आता ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार आहे.


प्राचीन काळापासून युद्धभूमीवर मरण पावलेल्या शूरवीरांचे स्मारक उभारण्याची प्रथा प्रचलीत होती. आताही या स्मारकशिळा ठिकठिकाणी आढळून येतात. सदाशिव टेटविलकर यांनी  महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून वैशिष्ट्यपूर्ण वीरगळांचा अभ्यास केला. त्यांच्या पुस्तकामुळे प्रथमच इतिहासातील हा दुर्लक्षित धागा प्रकाशात आला. आता ‘हीरोस्टोन ऑफ महाराष्ट्र’ या नावाने हे पुस्तक इंग्रजीत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे गोवा, दिव आणि दमण या प्रांतातील गड, किल्ल्यांची माहिती देणारे त्यांचे मूळ मराठी पुस्तकही ‘फोर्ट केव्हजस्’ म्हणून इंग्रजीत उपलब्ध होईल. या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद पुण्यातील माधुरी गोखले यांनी केला आहे. ब्रोनॅटो डॉट कॉमच्या शैलेश खडतरे यांनी ई-बुक आवृत्ती वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. इतिहासप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण इतिहास परिषदेने केले आहे.

0
Posted on

“अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

।। सस्नेह निमंत्रण ।।

गझलकार प्रशांत वैद्य यांच्या “अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा
दि. २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा . वैश्य समाज मंदिर हॉल, कासार हाट, कल्याण (प) येथे संपन्न होणार आहे.प्रमुख पाहुणे
मा. श्री. राजेंद्रजी देवळेकर – महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इतर मान्यवर !

आणि

शब्दांकित” डोंबिवली निर्मित मराठी गझल मुशायरा “गझल तुझी नि माझी” !

सहभागी गझलकार
गोविंद नाईक, विजय उतेकर, वैभव कुलकर्णी, सुनील खांडेकर, राधिका फराटे, निर्मिती कोलते, संचिता कारखानीस, सानिका दशसहस्त्र, रेश्मा कारखानीस,

निवेदन : दत्तप्रसाद जोग
नेपथ्य आणि संकल्पना – निलेश गायधनी
नेपथ्य सहाय्य– गोविंद नाईक
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण !

प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे
निमंत्रक – प्रज्ञा प्रशांत वैद्य

0
Posted on

‘क’ मुळे ठाणेकरांनी अनुभवाला एक वेगळा नायगावकरी काव्यानुभव

 

कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या प्रसिध्द कवींच्या कवितांचा “क” हा प्रयोग रविवारी सहयोग मंदिर येथे कोलाज तर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगात जेष्ठ कवी अशोक नायगावकरांच्या अनहर्ड, अनरेड कवितांचे वाचन नायगावकरांसोबत नव्या दमाचे कवी गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे आणि पंकज दळवी यांनी केले. डावे उजवे, शाकाहारी, टिळक या नायगावकरांच्या लोकप्रिय कविता टाळून उपहासात्मक आणि अंतर्मुख करणा-या कवितांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. मिडल क्लास कुटूंबातील पती पत्नीच्या प्रेमळ नात्याचे चित्रण नायगावकरांच्या आठवणी या कवितेतून घडले. या निमित्ताने त्यांच्या कवितेची तरल बाजूही समोर आली. अशीच तिंबत कणीक रहा तू, ज्योतिबा आभार या कवितांतून नायगावकरांनी समाजातील दांभिकतेवर अचूक बोट ठेवेले. हाच धागा पकडत संकेत म्हात्रे यांनी तू कर सत्कार तूला दिलेल्या व्रणांचे म्हणत एका गृहिणीचं घराभोवती फिरणारं आणि त्यातच समाधान मानायला लावणारं आयुष्य रेखाटलं, तर गीतेश शिंदे यांनी नवरा वारल्यावर या कवितेतून नवरा गेलेल्या बाईच्या मनाची घुसमट व्यक्त केली. पंकज दळवी यांनी नथूरामचं बॅडलक या कवितेतून हरवलेल्या तत्त्वांचा आणि गांधीवादाचा शोध घेतला.

या प्रसंगी या तिनही कवींनी नायगावकरांना विविध प्रश्न विचारून त्यांचा कवितेचा प्रवास उलगडला. कवितेने मनोरंजनही व्हायला हरकत नाही पण कवीचा आतला सूर सच्चा हवा त्यामुळेच कार्यक्रमात भरभरून हसणारा प्रेक्षक घरी जाताना मात्र अंतर्मुख झालेला असतो अशा भावना नायगावकरांनी व्यक्त केल्या. त्यांच्या अभिमान या कवितेने उपहासाचा सूर इतका टिपेला नेला की माणूस असण्याचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटावी अशी भावना निर्माण झाली. निसर्गाचा घोटाळा या कवितेने निसर्गाकडे वेगळ्या चष्म्यातून बघायला भाग पाडले. भोपाळ चिकित्सा, केशवसूत म्हणाले, मूळाक्षरं या कवितांनी शेवटाकडे कार्यक्रमावर चढवलेल्या कळसाला प्रेक्षकांनी टाळ्यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमास अरूण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळूसकर, राजीव जोशी असे जेष्ठ कवी देखील प्रेक्षकांत उपस्थित होते. या निमित्ताने कोलाज तर्फे ह्या मान्यवरांच्या हस्ते नायगावकरांचा एक हृदय सत्कारही करण्यात आला. लवकरच ’क’चा नायगावकर विशेष हा पुढील प्रयोग रत्नागिरीस होणार असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.

0