Posted on

‘चिन्ह’चा महत्वाकांक्षी प्रकल्प

‘चिन्ह’च्या फेसबुक फ्रेंड्सना, चित्रकारांना तसेच चित्र रसिकांना त्याचप्रमाणे वाचकांना किंवा चाहत्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

यंदाच्या वर्षी आम्ही तीन प्रकल्प पूर्ण करण्याचं निश्चित केलं आहे. त्यातला पहिला आहे ‘निवडक चिन्ह’ मालिकेतील तिसऱ्या म्हणजेच ‘जे जे जगी जगले…’ ग्रंथाचा. जो येत्या सहा महिन्यात पूर्णत्वाला जाईल. तर दुसरा आहे ‘व्यक्तीचित्रं पण शब्दातली’ या ‘निवडक’ मालिकेतील चौथ्या ग्रंथाचा. जो पुढल्या सहा महिन्यात पूर्णत्वाला जाईल. आणखीन एक महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला तो म्हणजे ‘चिन्ह’ App चा. जो येत्या तीन ते चार महिन्यात प्रत्यक्षात येईल. त्या विषयी आम्ही आता फार काही सांगू इच्छित नाही. कारण त्याचीही कॉपी व्हायची. इतकंच सांगतो की, ‘चिन्ह’ची आणि आपली भेट पूर्वी वर्षातून एकदा व्हायची ती आता दररोजच होऊ शकेल. तूर्त इतकेच. यावर तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यावयास आम्ही उत्सुक आहोत.

 

पुन्हा एकदा ‘चिन्ह’च्या चाहत्यांना मनापासून शुभेच्छा.

0
Posted on

सह्याद्री आज पोरका झाला….!

“दुर्गमहर्षी प्रमोद मांडे (भाऊ) हा स्वयंप्रकाशित सुर्य अस्त पावला…!

गेले ४० वर्षे सह्याद्रीच्या गिरीशिखरांवर लखलखणारा स्वयंप्रकाशित सुर्य आज दीर्घ आजाराने अस्त पावला, खरं तर गडकिल्यांवर भाऊंचे इतके प्रेम होते कि भाऊंच्या जाण्याने आज सह्याद्रीला हि अश्रू अनावर झाले असतील..

दुर्गांचे चालते-बोलते विद्यापीठ, क्रांतीकारकांच्या इतिहासाचे ज्ञानपीठ दुर्गमहर्षी प्रमोद मांडे(भाऊ) आज आपल्यातुन कायमचे निघुन गेले. भाऊ आपल्या जाण्याने दुर्गसंवर्धन क्षेत्रात जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही.भाऊ सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र परिवाराच्या वतीने आपणांस भावपूर्ण श्रद्धांजली..

“शिवाजी” हे फक्त एक तीन अक्षरी नावं, ज्याभोवती आज तीनशे वर्षांनंतरही अनेक छोटे-मोठे इतिहासकार अगदी सॅटेलाईट सारखे फिरत असतात, पण या सूर्याभोवती जणू त्याच्याच सूर्यमालेतील एक ग्रहासमान, डोळ्यात भरणारा किंवा सलणारा हि म्हणू शकू असा एक ठिपका सतत फिरत असतो, नव्हे तर सूर्याच्या तेजातून इतर मंडळींना प्रकाशित करत असतो असा एक सूर्यासमोर खुजा असला तरी त्याचं उर्जेने प्रकाशित झालेला ग्रह म्हणजे “दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे”.

 

शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हिचं म्हण आणि हीच चालीरित अवघ्या महाराष्ट्रात रूढ आहे. त्याचे कारणही अगदी समर्पकचं आहे म्हणा, कारण भोसले कुळानं केलेला संघर्ष, पराकोटीचं बलिदानं, या गोष्टी आमच्यासारख्या येरा-गबाळ्याचरणी होणे नाही. आपल्या सर्वांनाचं बदल हवे आहेत. पण त्यासाठी झिजण्याची तयारी कुणाचीचं नसते. मस्तपैकी आरामखुर्चीवर आपली कमान टाकून चहाच्या फुरक्या मारत आपल्या देशाच्या भवितव्याविषयी दीर्घकाळ काळजी करणाऱ्या (म्हणजेचं चहाचा गोडवा जोपर्यंत जिभेवर रेंगाळतो) लोकांचे जसे इथे मोठ्या प्रमाणावर घडले आणि इथून पुढेही घडतीलचं. पण या सह्याद्रीची उंची वाढविण्यासाठी स्वतःला त्याच्या पायाशी गाडून घेणाऱ्यांच्या रक्ताचा एक अंशच जणू स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रभूमीवर प्रगटला असं म्हणायला हरकत नाही.

प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या या महाराष्ट्रात सबंध राष्ट्राला दिल्या. शिवाजी महाराजांचे मिर्झाराजे जयसिंह यांच्या बरोबर झालेलं तहाचं बोलणंही त्यातलाचं एक भाग, अख्खी एक पिढी फक्त दिल्ली तख्ताच्या रक्षणासाठी, सबंध हिंदुस्थानावर आलेलेल्या अब्दालीनामक दुश्मनाचा बिमोड करण्यासाठी धारातीर्थी पडले, पण त्यांनी या राष्ट्रासाठीचं तर स्वतःला गाडून घेतलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात कुठेतरी हा राष्ट्रवाद हरविला होता., तेव्हा त्याचे पुनरुज्जीवन केलं ते लोकमान्य टिळकांनी, आणि एकसंध देशासाठी लढा सुरु झाला.

स्वातंत्र्य मिळाले, आणि हे एकसंध राष्ट्र पुन्हा तुकड्या – तुकड्यामध्ये विखुरले गेले. उत्तरेतल्या माणसाला आता दक्षिणेकडल्या लोकांसाठी ओढा नव्हता, तर पूर्वेच्या लोकांच्या त्रासाने कधी पश्चिमेच्या लोकांना आसवांचा ओलावा आला नाही.इतिहासाचा इतिर्हास झाला, आपल्या समाजाची टिमकी वाजवत कर्तुत्वाचा आलेख रेखाटन करण्याची पद्धत समाजात रूढ झाली. आणि त्यांनाचं पुस्तकातून – मौखीकतेतून मिरवले गेले. या सगळ्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातील पुण्यवंताच्या भूमीतील (पुण्यात) सोमवार पेठेतील एक सद्गृहस्थाच्या पोटी, जणू एक अखंड चळवळचं जन्माला आली., कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मारुती मांडे यांच्या घराण्यात “प्रमोद”[भाऊ] जन्माला आले.

मोठ्यातमोठे पराक्रम, कर्तुत्व आपल्या नावावर नोंदविणारे, हे अगदी आपल्या वयाच्या नाकर्त्या वयापासूनचं आदर्श म्हणूनचं जन्माला येतात, या जग-रीत असणाऱ्या समीकरणाला माझ्या आयुष्यात मिळालेलं हे पहिलेवाहिले उदाहरण म्हणजे प्रमोद मारुती मांडे. या बाळाचे पाय लहाणपणापासूनचं पाळण्याच्या बाहेरचं दिसायला सुरवात झाली होती. आवडीनं जवळ घेणाऱ्या प्रत्येकालाचं प्रसाद देत भाउंनी आपल्या वेगवेगळ्या रंगछटा दाखवायला सुरवात केली होती., रेल्वेयार्डातून चोरलेल्या चकारी घेऊन साऱ्या गावभर हुंदडनाऱ्या भाऊंचे वडील हे स्वतः रेल्वे खात्यातचं नोकरीला होते., त्यामुळे असे काही करताना, किंवा कुणाच्या सांगण्याने, हि टोळभैरवगिरी वडिलांच्या कानी गेली, कि खलबत्ता मशीन हि सर्रास चालूचं असायची, आणि हे प्रेम इतर कुठल्याही भावंडाच्या वाट्याला तसूभरही आलं नाही याचं सारं श्रेय खरं तर भाऊंचचं. यार्डातून चाकरी चोरीला गेल्या कि ती लपविण्याची सगळी जबाबदारी भाऊ बिनबोभाट पारं पाडत असतं. पण मुद्देमाल अगदी सेफमध्ये ठस राहत असे, मग लघवीच्या बहाण्यानं घराबाहेर पडून रस्त्यावरल्या वराती बघणं, त्यासाठीसुद्धा मार खानं अश्या बऱ्याचं गोष्टी. आईचा तर भाऊंवर जरा जास्तीचं जीव.,कधीचं मेल्या, मुडद्या, कारस्तान्याशिवाय त्या माउलीनं हाका मारल्या नाहीत. कदाचित यातच त्यांना प्रमोद मिळत असावा.

पानशेतच्या पुरानं पुण्यात हाहाकार केला. आजोबांचं दोन घराच्या खुराड्यातलं एक घर पडलं, एक वाहून गेलं, तेव्हा नोकरी निमित्तानं भुसावळला असणाऱ्या वडिलांनी आपलं सुलक्षणी पार्सल भुसावळला हालावलं. तिथेचं भाऊंच अडकत धडकत शिक्षण सुरु झालं. आई वडिलांना असणारी वाचनाची आवड पुढं भाऊंना जडली आणि खऱ्या अर्थानं एका ओघळाचा महासागराच्या दिशेने विस्तारण्याचा प्रवास सुरु झाला होता. आता आवड म्हणून वाचन वगरे या गोष्टी सुरु असल्यातरी दुनियादारी करतं पाचवीला पुजलेल्या हाणामार्या वगैरे गोष्टीही सुरुचं होत्या. या गोष्टी नाही म्हटल्यातरी घरापर्यंत पोहचायच्याचं आणि मग “मारुती” हे नाव असलेल्या वडीलांकरवी भाऊंना बजरंग बनवले जायचे., यात पुन्हा पुण्याकडे रवानगी झाली पण यावेळी घरचे सुद्धा सोबत होते., मुंबईला नोकरीला असणारे वडील आपल्या लाडल्यामुळे बरीचं वर्षे पुणे मुंबई अश्या रोजच्या खेपा करीत होते.

अशातचं भटक्यांची जमात एकत्र येऊ लागली, ठरलेल्या एका दिवशी सिंहगड अजूनकाही ठिकाणं वगैरे ठरलेली असायची. अडकत धडकत चालेलेल्या शाळेला रीतसर दांड्या हाणत – हाणत सारं पालथं घातलं जात होतं, जणू स्वतःचं एक MAP Portal म्हणून भाऊ सिध्द होतं होते. खरं तर भटकायचे कशाला तर हरवून जाण्यासाठी आणि हरवून का जायचे तर फक्त भटकण्यासाठी या आशयाचं साधं सरळ सूत्र भाउंनी स्वतः साठी तयार करून घेतलं होतं.“आजही ते अविरत वापरात आहेचं.,आत्ताच्या स्पर्धेचा काळ हा खूपचं धकाधकीचा आपल्याला वाटतो खरा पण याची सुरवात झाली ती, आपल्या जन्माच्या आधीपासूनचं., मिशीवर तावमारून आपण किती किल्ले हिंडलो आहोत या सगळ्या गोष्टी अगदी छाती दीड दीड इंच फुगवूनचं सांगितले जायचे., पण ते भाऊना कधी जमले नाही., कारण नुसते भोज्जा शिवून आपली नावं कुठंतरी नोंदविण्यासाठी, लोकांना आपले फुगलेले आकडे दाखविण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी त्यांना किल्ले बघायचे होते. आणि हा भटकाजोगी अगदी तासाचं भटकत राहिला., किल्ले बघणे त्यावर आढळणाऱ्या वेगळ्या गोष्टींचे, वनस्पतींची नोंद करणे, मृदेचे नमुने गोळा करणे, याचं सोबत किल्ल्यावरील खरा इतिहास, रंगविलेला इतिहास याची भौगोलिकदृष्ट्या शहानिशा करणे ह्या साऱ्या गोष्टींचे अगदी व्यवस्थितपणे आपल्या नोंदी राहण्यासाठी त्यांचे चित्रीकरण करण्याची काम या भटकंतीत अगदी व्यवस्थितपणे सुरु होती.

वेल्डिंग करणारे हात कॅमेऱ्याच्या बटणावर असे काही चालू लागले की विचारता सोय नाही., आज जेव्हा आपण भाऊंच्या घरी भेट द्यायला जातो. तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्याची कमाल नक्कीचं दिसून येईल., भारतातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, तालुक्यातील प्रत्येक गावातील हरएक ऐतिहासिक वास्तू, गड, मंदिर, वाडे, खंदक, खंडरं सारं सारं आपल्या नजरेने टिपून ठेवलं आहे. स्त्री आणि पुरुषांच्या पायांच्या बोटातील नैसर्गिकरीत्या प्राप्त झालेले वेगळेपण जसे मूर्तिकारांनी आपल्या मूर्तीत उतरवले तेचं वेगळेपण समजण्यासाठी, मूर्तीचा अधिक सखोल अभ्यासासाठी त्या त्या प्रकारे भाऊंनी आपल्या कॅमेरामध्ये टीपल्या आहेत यातूनचं आमच्यासारख्या नर्मदेच्या गोट्यांना आकार देण्याचे काम भाऊ करत असतात.”

अशातचं भाउंचा भटकंतीचं नकाशा आणि आयुष्याला सुरवात झाली. एकीकडे आई वडील मंडळी संसार आणि दुसरीकडे मित्र, काम, सह्याद्री आणि त्याची भटकंती या गोष्टींना सुरवात झाली. गटांगळ्या खात खात (अ)पूर्ण झालेल्या शिक्षणाच्या जोरावर दुनियाभरचे जॅक लावून टेल्कोमध्ये कामाची सोय झाली आणि आयुष्याचा खऱ्याखुऱ्या अर्थानं सजलेला गाडा समाधान चौकातून लाईनीला लागला. तरी भटकण्याच्या नावाखाली भरकटत आणि भरकटण्याच्या नावाखाली भटकणे हे चालूच होते. गडकोट भटकंती सोबत भाऊंचे लहानपणी जडलेलं पुस्तक वाचण्याचे वेड याकाळात जास्तचं जोरावर होतं असं म्हणनं चुकीचे ठरणार नाही.

सातवाहनांपासून मराठ्यांपर्यंत दुर्गबांधणी करणारा हर एक कालखंड हा भाउंचा अक्षरशः मित्रचं ठरला होता. वाकाटक, कलचुरी, आभीर, सेन्द्र्क, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव, सिंद, कदंब, मानांक, भोज सगळी सगळी मंडळी जणू एकसाथ पंगतीलाचं येऊन बसत., त्यामुळे यांच्या दुर्गबांधणीसोबत त्यांचा इतिहास, त्यांचे राहणीमान, त्यांचे कलह, राजकारण सगळ्या सगळ्याचं गोष्टी अक्षरशः रक्तात भिनल्यासारख्या यांच्याशी एकजीव होऊन गेल्या, हे सगळं उरकलं तेव्हा उरलेल्या मराठेशाहीच्या अभ्यासाचा घास घेण्याकडे यांचा होरा वळू लागला., आणि कित्येक गुरुजणांच्या शिकवणीतील मराठेशाही कालबाह्य ठरून, एका नव्या पर्वाला सुरवात झाली. (इथून मागे आणि आजही हयात असलेले आणि नसलेले इतिहासकार एखाद्या प्रकरणावरील माथापच्ची करून वैतागतं तेव्हा अडलेल्या गणिताचा ईलाज शोधण्यासाठी आपला एक अनुयायी भाऊंकडे पाठवतात).

मनुष्य पुस्तक वाचू लागला की जास्त विचार करू लागतो. हे विचार चांगले होत असतील किंवा वाईटही होतं असतील ही गोष्टचं निराळी पण माणूस विचार करू लागतो एवढं मात्र नक्की, कधी कधी माणसाचे विचार त्याला समाज विघातक म्हणून कुप्रसिद्धीस आणतात तर कधी कधी आपले विचार आपल्यालं समाजहितवादीही ठरवून टाकतात., जग रहाटणीला फाट्यावर मारतचं भाऊंची यात्रा चालू होती, प्रस्थापितांना शह बसला म्हणून कधीकधी हे नसलेले कुप्रसिद्ध ठरले तर दगडधोंड्यात जीव ओतणाऱ्या लोकांसाठी हे व्यक्तिमत्व प्रसिद्धीस आले खरे पण नाव आडनावाच्या सुरसतेवर माणसाची पत प्रतिष्ठा ठरविली जाते आणि त्यांना जनमाणसात, समाजभूषणाची मानमरातब प्राप्त होते. पण वेगळ्या धाटणीचे आडनावचं यांच्या आडनावा आडचं दूषण ठरलं असावं आणि त्यामुळेचं हा लाखोंचा पोशिंदा आमच्या वाटेला आला असं म्हणनं गैर ठरणार नाही.

आता भटकंतीचा ध्यासचं भाऊंची ओळख होती तरी ते या जोडीला, रोजचे पुस्तकवाचनं आणि टेल्को कंपनीतील आपल्या नोकरीसाठी वेळ काढत असतं. इनमिन गुरुवारची एक दिवस साप्ताहिक सुट्टी असायची, ती येण्याआधीचं तिचं नियोजन ठरलेलं असायचं. त्यात एखादी सुट्टी जोडून आलीचं तर मग दुग्धशर्करायोगच समजायचा…. दुसरं काय. मग तिसऱ्या दिवशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टला गडावरून डायरेक्ट ड्युटीला उभे राहणे असले उलटे पालटे उद्योग चालू असायचे.
आपण घेतलेल्या धाडसी निर्णयातूनचं आपली समाजातील छबी निर्माण होतं असते. आणि प्रमोद मांडे म्हणजे जरा जास्तचं परखड, तिरसट व्यक्तिमत्व हे आता सगळ्यांना माहिती आहे. साप्ताहिक सुट्टीचं एक दिवस मिळणारं यातचं काय ते भटकंती आणि इतर गोष्टी. आपल्या या छंदाला पुरेसा वेळ देता येत नाही, काहीतरी करायला पाहिजे याचं विचारांतून एक चमत्कारिक नंतर त्या घटनेला क्रांतिकारी ठरवले गेले अशी घटना घडली.

लाखलफडी करून मिळवलेली टेल्को कंपनीतील नोकरी या माणसानं चक्क सोडली. स्वेच्छा निवृत्ती पत्करली. एवढा अवघड निर्णय घेऊन पुढे यांनी काय ठरवले होते, ते फक्त त्यांनाचं माहिती असावं.,निवृत्ती स्वीकारल्यानंतर मिळालेल्या रकमेतून संसाराच्या अर्ध्या समुद्रात येऊन ठेपलेल्या आपल्या संसाराचा या माणसानं विचार केला नाही. आपल्या पार्थिवाला अग्नीदेण्यासाठी केलेल्या आपल्या वंशजांच्या, पोटापाण्याची सोय यांनी बघितली नाही तर होणाऱ्या वाचनातून क्रांतीकारकांच्या अपार प्रेमाने बहरून जाऊन आपल्या VRS चा उपयोग अज्ञात क्रांतीकारकंच्या चरित्राला उजाळा देण्यासाठी केला.
काही लोकं वेडी असतात हे खरचं आणि ही वेडी माणसचं इतिहास घडवीत असली तरी, या वेडेपणाला कसल्याचं मर्यादा नसतात. हे दाखवून दिले तर ते फक्त भाऊनीचं आम्हाला लोकांनी सांगतीलं होतं की इतिहासात वेडं होण्यासाठीही काही मर्यादा असतात. त्या बाळगल्या नाहीतर हा इतिहास एकदिवस भिक मागायला लावल्याशिवाय राहत नाही.

पण इथं वेड्यापणात सगळ्याचं गोष्टी मातीमोल ठरल्या., घरसंसार, समाज काम बघतं बघतं सगळ्याच गोष्टी कराव्यात हे एक सर्वमान्य सूत्र पण इथे स्वतःसाठी स्वतःची सूत्र बनली आणि जगावेगळं कर्तुत्व उदयाला आलं. आज शेकडो शाळांमध्ये, हाजारो संस्थांच्या माध्यमातून भाऊंचे हे क्रांतिकारकांवर आधारित प्रदर्शन व्याख्यानं साऱ्या महाराष्ट्रभर आयोजित केलं गेलं, पण या सगळ्या पसाऱ्यामागचा त्याग भाऊंनी कधीही दाखविला नाही वा याचे भांडवलही केले नाही. आणि खरचं आहे म्हणा “शिरपेचात रोवलेले तोरे दिसतात लोकांना पण त्यासाठी झालेलं काळजाचं पाणी दिसून येत नाही.” खरचं भाउंनी मोठा त्याग केला आहे एवढं मात्र नक्की., एखाद्याला सुतकं पडलं तर जवळपास महिनाभर माणूस फक्त आपल्या दुःखातचं हरवलेला असतो., त्याची आर्थिक सामाजिक सगळी वाढ खुंटली जाते. आणि हि जगरीतचं आहे यात काही फेरफार झालेला नाही., जेव्हा भाऊंच्या मातोश्री कालवश झाल्या, प्रत्येक मुलावर जसे आभाळ कोसळतं, मतृत्वाचं छत्र हरविते, तसे भाऊंच्या बाबतीत झाले., विष्शण्य अवस्थेत, सुतकातील काही दिवस काढले पण. चित्तमात्र थारेवर राहू देत नव्हतं., आपल्या वडिलांशी बोलून भाऊंनी दहाव्याच्या आधीचं धोपट पाठकुळी मारून घराचा निरोप घेतला. आणि आपल्या दक्षिण भारताच्या मोहिमेवर ते निघून गेले., दहाव्याच्या दिवशी, वडिलांनी, भावंडांनी, पै पाहुण्यांनी काय ते विधी उरकले, तेव्हा हा अथांग ज्ञानाचा सागर असणारा हा मूर्तिमंत विवेकानंद कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी एकटक मावळत्या सूर्याकडे पाहत उभा होता.

अनुभवातून मोठा होत जाणारा माणूस हा चार पावसाळे अनुभवूनचं मोठा होत असतो. पण या श्रीमंतयोग्यानं किते पावसाळे पाहिले, आणि किती विजा झेलल्या याचा मागोवा आपल्याला घेताचं येणार नाही., भरल्या मळवटानं सईबाईंनी जसा मराठेशाहीला निरोप दिला, तसेचं पेच प्रसंग भाऊंसमोर सुद्धा उभे ठाकले, कॅन्सरच्या असाध्य रोगाशी बराच काळ चाललेल्या युद्धामध्ये भाउंचा भावगड ढासळला…… पण तरही या निश्चयाच्या तटबंदीला खिंडारं पडलीचं नाहीत. वाचन करता करता साठत चाललेल्या पुस्तकांचा फुगवटा सुद्धा एवढा झाली कि साधारण ५ हजार पुस्तकांचा संग्रह भाऊंकडे जमा झाला, आणि ज्ञानाचा तर फुगवटा तर विचारायलाचं नको. स्वतःच्या पोटाला त्यांनी किती चिमटा काढला हे फक्त त्यांनाचं माहिती, पण आपल्या बुद्धीची भूक भागविताना मात्र अक्षरशः मोगलाईचं माजली असावी असं म्हणायला हरकत नाही.

या भारतभूमी वरल्या फारचं कमी जागा अश्या आहेत. ज्या भाऊंनी पादाक्रांत केल्या नाहीत. माणूस काश्मीरमध्ये गेल्यावर, तिथल्या निसर्गसौंदर्यावर बहरून जाऊन आकंठ त्याच्या प्रेमात बुडालेला असतो., पण हा मनुष्य तिथेही इतिहासाच्या पाउलखुणा शोधात किल्ले पालथे घालत होता हे विशेष. या माणसानं आयुष्या कमविली ती फक्त व्यक्तीरूपी दौलत आणि हिच्याचं तर जोरावर भाउंनी आयुष्यात अनेक कोलांट्याउद्या घेतल्या म्हणता येईल., “एकदा मध्यप्रदेश दौऱ्यावर असताना बुंदेलखंडच्या छत्रसाल बुन्देलांच्या, बाजीरावांनी बांधायला घेतलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या समाधीचे निरीक्षण करत असताना, शेजारी उभा असणाऱ्या एकाने भाऊंना आपण कुठले काय या आशयाची विचारणा केली., यावर महाराष्ट्र आणि मुक्कामपोस्ट हा पत्ता कळल्यावर तो इसम जाम खुश झाला “म्हणजे आपण तर मराठ्यांच्या राज्यातील, तुमच्याच माणसानं हि समाधी बांधायला घेतली होती, आणि बांधणारचं असं वचनही दिलं होत, आता ते तर नाही पण तुम्ही हे काम पूर्ण करा हा हट्ट त्यानं भाऊंकडे धरला.

“आज महिना झाला, घरातील फुटलेल्या बेसिनवर खर्च करायचा विचार करतो आहे.” या अवस्थेत माझ्यासारख्या भणंग माणसाकडून यांनी अपेक्षा तरी काय बाळगावी या विचारातचं ते ठिकाणं सुटत होतं”..कार्यक्रम, उपक्रम, आणि भटकंती यातचं भाउंनी जीवनाचं सार मानलं, कोल्हापूरकर छत्रपती घराण्यानं दिलेल्या दुर्गमहर्षी या किताबापलीकडं काखोटीला एकही दमडी साठविली नाही. कधी आपण कमी दरात मिळणाऱ्या जागे विषयी सांगण्याचे धाडसं केलं कि घ्या भाऊ जागा गावाकडल्या घरासाठी चांगला स्पॉट आहे., तर मोठ्या अभिमानाने ते सांगणार कि अरे आता काय करायचय मी घेतली आधीचं जागा विकतं… कुठं आणि किती अशी विचारणा आपण केली तर उत्तर असणार “अरे मसणात घेतलीये ना २ बाय ६”……!

आता आपणचं यावर मान मुटकून थंड घेण्यापलीकडे काही करू शकणार नाही हे त्यांनाही माहिती असायचे…. पण भाऊंमुळेच आज विचारांत आणि त्यामुळे कृतीत बदल आलाय एवढं मात्र नक्की….!

– गणेश उर्फ अभिजित कदम
साभार- शिव-शंभू चरित्र

0
Posted on

अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी

कौशिक लेले यांनी अमराठी व्यक्तींना मराठी शिकवण्यासाठी ऑनलाईन ट्युटोरियल्स तयार केली आहेत; जी त्यांच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.

http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/

http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/

Learn Marathi from English मध्ये १३९ धडे आहेत.

Learn Marathi from Hindi मध्ये १०१ धडे आहेत.

या ब्लॉग मध्ये देवनागरी लिपी, प्राथमिक व्याकरण (नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे शॉर्ट फॉर्म्स इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात मराठी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ असा हा ब्लॉग आहे.

या ब्लॉग मधील संभाषणाच्या २०६ साउन्ड क्लिप्स ही YouTube channel वर “Kaushik Lele” नावाच्या चॅनल वर टाकल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्याना मराठी उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

You Tube Channel name :- Kaushik Lele

https://www.youtube.com/c/KaushikLele_Learn_Marathi

कौशिक ने ‘मे २०१२’ मध्ये मी या उपक्रमाची सुरुवात केली.

कौशिकने तयार केलेले ट्युटोरियल्स वापरून मराठी शिकत असल्याचे आत्तापर्यंत दोनशे लोकांनी ईमेलवर कळवले आहे. तर यूट्यूब चॅनलचे दीड हजार हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

त्यात महाराष्ट्रात शिक्षण किंवा कामनिमित्त परराज्यातून आलेल्या व्यक्ती, स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचा अभ्यास करणाऱ्या अमराठी व्यक्ती, भाषांची आवड असणारे परदेशी नागरिक, अनिवासी मराठी आहेत. तसेच मराठी व्यक्तींच्या प्रेमात पडलेले किंवा लग्न केलेले परदेशी नागरिकही आहेत.

दोन्ही ब्लॉग आणि यूट्यूब चॅनलना साडे पाच लाखांपेक्षा जास्त वेळा लोकांनी भेट दिली आहे

मॅथ्यू चँग नावाचा एक चायनीज-अमेरिकन माणूस माझ्या वेबसाईट्सवरून मराठी शिकला आणि आता खूप चांगले मराठी बोलू शकतो. त्याचा व्हिडिओ अवश्य पहा.

जॉन हा लंडनस्थित ब्रिटिश पीएचडी चा विद्यार्थी देखील मझ्या ब्लॉग वरून किती आत्मविश्वासपूर्वक मराठी बोलतो अहे ते पहा.

लोकसत्ता, म.टा. , आयबीएन लोकमत व इतर माध्यमांतून दखल

लोकसत्ता, म.टा., सकाळ, लोकमत , इंडियन एक्स्प्रेस  सारख्या मान्यवर वृत्तपत्रांतून तसेच स्थानिक मासिकांमधून या उपक्रमाबद्दलचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.

  • आयबीएन लोकमत टीव्हीवर कौशिक व त्याच्या ब्लॉगवरून मराठी शिकलेला जॉन यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. ५ फेब २०१७ रोजी  दुपारी एकच्या सुमारास दाखवली होती. ती मुलाखत तुम्ही ऑनलाईन बघू शकाल आयबीएन लोकमतच्या संकेतस्थळावर

https://www.youtube.com/watch?v=Z7APUITrbnA

अधिक माहिती

कौशिक स्वतः छंद म्हणून शाळेत असताना तमिळ शिकवणाऱ्या पुस्तकावरून तमिळ शिकला. आणि थेट पुस्तकं, मासिकं वाचून गुजराती शिकला.

“ऑफिसमधले माझे काही सहकारी मराठी शिकायचा प्रयत्न करत होते.  त्यावेळी इतरांना मराठी शिकण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासायचा मी प्रयत्न केला. काही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत पण मला ती समाधानकारक वाटली नाहीत. इंटरनेट वर मराठी  शिकण्यासाठीचे पर्याय फारच तुटपुंजे आणि अर्धवट सोडलेले दिसले. त्या तुलनेत परकीय भाषा शिकण्यासाठी खूपच पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तुस्थितीमुळे  मी अस्वस्थ झालो. मराठी भाषेचा आग्रह आपण धरतो, अमराठी लोकांनी मराठी शिकलंच पाहिजे असं आपण म्हणतो पण मराठी शिकण्यासाठीचे पुरेसे पर्याय आपण तयार केलेले नाहीत हे मला जाणवलं.”

इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट नेट वरच शोधली जाते. त्यामुळे नेटवरच अशा प्रकारचे साहित्य असले पाहिजे आणि तेही मोफत असावे असे कौशिकला वाटले.

“मला स्वतःला भाषा शिकणे-शिकवणे आवडते आणि मी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याने स्वतः हे काम करायचं  ठरवलं. मी ज्या व्याकरणाधारित पद्धतीने तमिळ आणि गुजराती शिकलो त्या पद्धतीने इतरांना मराठी शिकवायचं ठरवलं. फेसबुक सारख्या माध्यमातून अनेकांना माझ्या वेबसाईट्स बद्दल कळले आणि चांगला प्रतिसाद मिळाला.”

कौशिक च्या अन्य उपक्रमांची यादी येथे देत आहोत. मराठीच्या प्रसारासाठी या सर्व उपक्रमांची खूप मोठी मदत होईल.

डिक्शनरी वेबसाईट स्वरूपात

१ मे २०१६ ला या डिक्शनरीची वेबसाईटही सुरू झाली आहे

www.learnMarathiWithKaushik.com

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली

जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच अशा परदेशी भाषांसाठी अशी संकेतस्थळे/अ‍ॅप्स आहेत. मराठीसाठी मात्र याची उणीव भासत होती. ती पूर्ण करण्याचा हा माझा प्रयत्न आहे.

http://learnmarathiwithkaushik.com

कौशिकच्या ब्लॉगवरून अनेक अमराठी व्यक्ती मराठी वाक्यरचनेचे नियम शिकत आहेतच. पण हे नियम वापरून जेव्हा ते क्रियापद रूपे बनवतात तेव्हा त्यांना आपण बनवलेले वाक्य बरोबर आहे का नाही याची शंका आल्यास त्यांना कौशिकशी मेलवर किंवा फेसबुकवर संपर्क करून शंकानिरसन करावे लागते. आता त्यांना या संकेतस्थळवरून लगेच उत्तर मिळेल. सर्व वाक्यांचे इंग्रजी(रोमन लिपीत) रूपांतरही दिले आहे. जेणेकरून नवख्या विद्यार्थ्याला उच्चारही समजतील.

“माझ्या माहितीप्रमाणे असे संकेतस्थळ सध्या नाहिये. जर आपल्याला माहित असल्यास जरूर सांगा मला. मला बघायला आवडेल.” असे कौशिक मोकळेपणाने सांगतो.

कौशिक एकटाच हा उपक्रम चालवत असल्याने सध्या माहिती(कंटेण्ट्स) वर भर दिला आहे. लुक-अँड-फील अगदी साधा आहे.

कौशिकचे काम इतके मोठे आहे कि आम्ही सलग एका लेखात ते मांडू शकलो नाही. पुढील लेखात अधिक माहिती व चित्रके जोडू.

[पूर्वार्ध]

 

0
Posted on

डॉ. प्रेरणा पारवे-सिंह यांच्या कथेला पुरस्कार

आपण सहज लेखनाला सुरुवात करतो. काव्य लेखन करता करता कथा लिहिण्याचा प्रयत्न करतो. कला शाखेची कुठलीच पार्श्वभूमी नसताना हे अवजड शिवधनुष्य पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.. प्रामाणिक याकरता, कारण कथा लिहिण्यापूर्वी कथाकार तिचा तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण अभ्यास करून, ती अक्षरशः जगून बघतो आणि मगच लेखनाचे स्वतःचे विशेष तंत्र वापरून ती प्रत्यक्षात उतरवतो… अनेक टिकांना तोंड देत, लेखनाचे धाडस करतो. आपण हे करू शकलो हे माझ्याचसाठी अविश्वसनीय आहे.
पण आपली कथा ज्यावेळी fb तून लोकांच्या वाचनात येते ..त्याला मिळालेला प्रतिसाद ही अतिशय आनंदाची गोष्ट ठरते . त्यात जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेत शेकडो जाणकार लेखकांच्या कथांमधून आपल्या कथेची निवड केली जाते. एका प्रतिष्ठित मंचावर अतिशय अनुभवी परीक्षक आणि समीक्षक यांच्या उपस्थितीत आपल्या कथेला विशेष पारितोषिक मिळावे यासारखे दूसरे सुख नाही .
चार दिवस डोकं भंजाळून, रात्री जागून लिहिलेल्या कथेचा आज प्रवास पूर्ण झाला असेच वाटते .
इतका मोठा आनंद तुमच्याशिवाय कसा साजरा व्हावा ..तर मित्रांनो ह्या यशाचे श्रेय तुम्हांला ! तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रेमात ..आपुलकीत माझी ऊर्जा दडली आहे .

महाराष्ट्र साहित्य परिषद
कल्याण शाखाने आयोजित केलेल्या
राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत ,

विशेष उल्लेखनीय कथा म्हणून माझ्या ‘उंदीरवाडी’ कथेची निवड झाली, सोहळा नयनरम्य होता . दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले .हा अविस्मरणीय क्षण ह्या सुंदर स्मृतीचिन्हाद्वारे आयुष्यावर कायमचा कोरला गेला .

उंदीरवाडी ही कथा कल्याणच्या सोळा वर्षाची परंपरा असलेल्या वार्तासूत्र या दिवाळी अंकात समाविष्ट झाली आहे .
धन्यवाद .

परीक्षक इकबाल मुकादम सर
भिकू बारस्कर सर
राजीव जोशी सर
महाराष्ट्र साहित्य परिषद
कल्याण शाखा

सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद अखंड असु दया .
Anuradha Burande Wadekar तुझे विशेष आभार !
डॉ .प्रेरणा पारवे – सिंह

0
Posted on

मु.पो.कविता… कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी !

कविता हा तसा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच कवींना मानसन्मान देणं, कविसंमेलनाला गर्दी करणं, मनमुराद दाद देणं हे मराठी साहित्यक्षेत्रात नवीन नाही. कविता लिहिणं व लिखित-मौखिक माध्यमातून ती रसिकांपर्यंत पोहोचवणं हे मराठी साहित्यात गेली अनेक वर्षं घडतंय. 

कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रिकुटाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता सर्वदूर पोहोचवली. त्यानंतरच्या पिढीतही अरुण म्हात्रे, अशोक बागवे, सौमित्र, नलेश पाटील, अशोक नायगावकर यांनी कवितावाचनाचे अनेक कार्यक्रम केले.मराठी काव्यवाचनाची हीच परंपरा पुढे नेण्याच्या हेतूने पेशाने शिक्षक व कवी असणाऱ्या संजय शिंदे यांनी आपल्या काही तरुण मित्रांना सोबत घेऊन दोन वर्षांपूर्वी अष्टगंध ही कला संस्था स्थापन केली आणि मु.पो.कविता नावाचा काव्यवाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम मराठी रसिकांसमोर आणला.
मराठी कवितेतले वेगवेगळे काव्यप्रकार, वेगवेगळ्या आशयाची कविता, जुन्या-नव्या पिढीच्या दर्जेदार कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट साध्य करत मु.पो.कविता कार्यक्रमाचे आजवर एकूण १३ प्रयोग झाले. आजवर एकूण ६५ कवींनी मु.पो.कविता कार्यक्रमातून आपल्या विविधांगी कविता सादर केल्या. या कवींमध्ये सतीश सोळांकुरकर, संजय चौधरी, प्रसाद कुलकर्णी, भगवान निळे, अन्वर मिर्जा, संगीता अरबुने, अनुराधा नेरुरकर, योगिनी राऊळ, छाया कोरगावकर, भाव सुधा, रेश्मा कारखानीस, सुधीर मुळीक, प्रशांत वैद्य, गोविंद नाईक, गणवेश नागवडे, सदानंद बेंद्रे, जनार्दन म्हात्रे, मंदार चोळकर, समीर सावंत, सतीश दराडे,सायमन मार्टिन, साहेबराव ठाणगे, गणेश नागवडे, जयदीप जोशी, प्राजक्त देशमुख, वैभव देशमुख, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, अशा दिग्गज कवींचा समावेश आहे.
बदलत्या काळाची स्पंदने अचूकपणे टीपणाऱ्या तरुण पिढीतील गजानन मिटके, पंकज दळवी, प्रथमेश पाठक, जयेश पवार, गीतेश शिंदे, सचिन काकडे, विजय बेंद्रे, प्रवीण खांबल, उमेश जाधव, गुरुप्रसाद जाधव, अमोल शिंदे, केतन पटवर्धन, यामिनी दळवी, शिल्पा देशपांडे, पूजा भडांगे, स्वाती शुक्ल, पूजा फाटे, राधिका फराटे, प्रथमेश तुंगावकर, विजय उतेकर, आकाश सावंत, शशिकांत कोळी, बंडू अंधेरे, सूरज उतेकर, आनंद रघुनाथ, जितेंद्र लाड, विशाल राजगुरू, सुशांत खुरसाळे, सत्यजित पाटिल, श्रीपाद जोशी, प्रशांत केंदळे, भालचंद्र भूतकर यांनीही मु.पो.कविता कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या आहेत.


आज मराठीत अनेक कवीसंमेलने होतात. पण कवी, त्यांच्या कविता, कार्यक्रमाची बांधणी, सजावट या बाबतीत या संमेलनांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. कवीला अत्यंत शांत वातावरणात, तन्मयतेनेे स्वतःची कविता सादर करता यावी व रसिकांना तितक्याच तन्मयतेने, एकाग्रतेने तिचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने कार्यक्रमाचा दर्जा टिकवण्याचं आव्हान मु.पो.कविता या कार्यक्रमाने गेल्या १३ प्रयोगापर्यंत लीलया पेललेलं आहे.
जयेश पवार, रोहन कोळी, प्रवीण लोहार, विशाल पाटिल, अभिजीत तर्फे, सुभाष पवार, सुधीर मुळीक, अभिजीत डोंगरे, शिवकुमार, मनोज, विजय, अमोल या टीमने आजवर या कार्यक्रमाचं नेपथ्य, प्रकाशयोजना, छायाचित्रण व दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व जबाबदारी आत्मीयतेने सांभाळली आहे .


कविसंमेलनाच्या इतर कार्यक्रमासारखा एकसूरीपणा या संमेलनाला येवू नये व वेगवेगळ्या स्वरूपात मराठीतली दर्जेदार कविता रसिकांपर्यंत न्यावी यासाठी संस्थेने ‘कविता लोभसवाणी’ व ‘एका कवीच्या दुःखाचे भाषांतर’ हे दोन वेगळे कार्यक्रम केले. कविवर्य अशोक बागवे, नाटककार प्रेमानंद गज्वी, कवी किशोर पाठक हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मु.पो.कविताच्या सर्व कार्यक्रमाचे निवेदन ही संकल्पना ज्यांना सुचली ते कवी संजय शिंदे स्वतः करतात. सर्व कवींचा परिचय देऊन, त्या कवींच्या कवितांचे काही निवडक, प्रभावी तुकडे सादर करत अत्यंत दिलखुलासपणे संजय शिंदे या कार्यक्रमाचं निवेदन करतात.
मु.पो.कविताने इथून पुढेही रसिकांना कवितेची मेजवानी सातत्याने देत राहावी हीच सदिच्छा !!

1+
Posted on

वाचन प्रेरणा दिवस

#वाचनप्रेरणादिन

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

!!!वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येईल.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कशी करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. कलाम नेहमी करीत असत. 

प्रतिष्ठानतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन‘ या उपक्रमांतर्गत ‘ऑनलाइन वाचनकट्टा’ राबवण्यात येईल. 

धन्यवाद!!

#वाचनप्रेरणादिन

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

0
Posted on

पुणे बुक फेअरला सुरवात

पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन “पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रा ” या मालिकेतील १६व्या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या प्रमुख पाहुणे तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितिन आर करमळकर पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,प्रकाश पायगुडे,सुनितिराजे पवार,अनिल गोरे व दिपक करंदीकर हे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकांमधये राजन म्हणाले “विविध विषय व विविध भाषांमधिल पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे,समाजातील वाचन संस्कृती वृध्दींगत करणे , तरूण पिढी पुस्तकांकडे आकर्षित करणे व त्यातुन सुशिक्षित समाज निर्माण व्हावा या हेतूने गेली १५ वर्षे पुणे बुक फेअर हे ग्रंथ प्रदर्शने भरवित आहेत. ”
मिलिंद जोशी म्हणाले “आता स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट वाचक होणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव,जिल्हा आणि तालुक्यांमध्ये फिरती वाचनालये उपलब्ध केल्यास गावोगावी चांगले वाचक तयार होतील. विविध संस्थांच्या सहभागामुळे पूणे बुक फेअरचे बळ आता वाढले आहे. आता समाजाने साहित्याभिमुख होण्याची गरज आहे. ”
मुक्ता टिळक म्हणाल्या “अक्षर फराळ ही महाराष्ट्राची मोठी परंपरा व मानबिंदू आहे. पुस्तक जत्रेमध्ये वेगवेगळे विषय असल्याने त्याचा लाभ अनेक जाण घेतात.पुणे बुक फेअर ही एक आता साहित्यिक चळवळ हेाऊ पहात असल्यामुळे पुणे बुक फेअरचे त्यांनी अभिनंदन केले. ”
दिवाकर रावते म्हणाले“ अशा पुस्तक जत्रेमधून विविध लेखकांचा नवा परिचय होतो. वाचनाने मन आनंदीत होऊन ताणतणाव कमी होण्यास मदत होते व शांतपणे झोप लागते. जगातील मोठे झालेल्या लोकांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेले आहे. बौध्दीक विद्वत्ता व सुशिक्षितपणा हा केवळ मातृभाषेेतून शिक्षण झाल्यास येतो. ”

प्रदर्शनात देशातील व परदेशातील नामवंत पुस्तक विक्रेते / वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, माहिती, आरोग्य्य, व्यवस्थापन, व्यापार , काय्यदा, धर्म, राजकारण, साहित्य, अश्या विविध विषययांवरील मराठी, हिंदी,गुजराथी उर्दू, संस्कृत, तर जपान व इराण अशा परकीय भाषामधिल सत्तर हजाराहून आधिक पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके , मासिके व ग्रंथ उपलबध आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रंथालय संचालनायल,महाराष्ट्र राज्य.पुणे जिल्हा परिषद,पुणे महानगर पालिका, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र,स्वरूप वर्धिनी, साहित्य सेतु;सोशल मिडिया पार्टनर,बी.जी.टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स(टॅ्रव्हल पार्टनर) आकाशवाणी ;(रेडिओपार्टनर) यांचे विशेष सहकार्य प्रदर्शनाला लाभले आहे.
प्रदर्शनाबरोबर वाचन संस्कृती वाढावी विशेषत: तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या साठी महाराष्ट्र साहित्य्य परिषदेच्य्या सहकार्य्याने साहित्य्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोेजन करण्य्यात आले आहे. काव्य्यशिल्प पुणे आय्योजित निमंत्रितांचे कविसंमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आययोजित नवोदितांचे कविसंमेलन ( गुरूवार १२ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता.) शांता शेळकेंच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम सादरकर्ते : स्नेेहल दामले/चैत्राली अंभ्यकर (शुक्रवार १३ऑक्टोबर साय्यंकाळी ६.३० वाजता.) एकपात्री कलाकार परिषद प्रस्तुतद.मा.दमदार (मिरासदारांच्य्या कथांवर आधारित कथाकथनाचा कार्य्यक्रम) कथाकथनकार : मकरंद टिल्लूू, अशोक मुरूडकर, विश्‍वास पटवर्धन व अरुण पटवर्धन (शनिवार १४ ऑक्टोबर साय्यंकाळी ६.३० वाजता.). वाचन प्रेरणादिनानिमित्त “ मला आवडलेले पुस्तक या विषय्यावर पाच शाळांतील पाच विद्याथ्य्यार्ंची मनोगते व्यक्त करणार आहेत. (रविवार १५ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता) हे सर्व कार्यक्रम मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे होणार असून सर्वासाठी खुले आहेत.

 

. या वेळी ज्ञानभाषा आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते जयंत र. मराठे (प्रथम)श्रिमती निलिमा इनामदार (दुसरा) भागयश्री गणेश फाटक ( तिसरा) व रितेश शिवराज वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
शैलेश जोशी यांनी सुत्रसंचालन केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

दिनांक ११ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्य्यान गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट पुणे येथे भरणारे पुणे बुक फेअर २०१७ हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

पी. एन. आर. राजन
संयोजक
९४२२० – ३०३२६

फोटो


१)पुणे बुक फेअरच्या उदघाटन प्रसंगी(डाविकडून)सुनितिराजे पवार,प्रकाश पायगुडे ,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितिन आर करमळकर ,राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते ,अनिल गोरे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,आणि
पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन


२) पुणे बुक फेअरच्या वेळी पुस्तकांच्या गुच्छ स्विकारतांना (डाविकडून) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशा,राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते ,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन


३) ४) पुणे बुक फेअर बघतांना राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावत

0
Posted on

चुकवू नये अशी लेखन कार्यशाळा: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने,

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने,

लेखन कार्यशाळा 

▪ कथालेखन ( २९ ऑक्टोबर )

▪ कादंबरीलेखन ( १२ नोव्हेंबर )

▪ कविता आणि गझल (२६ नोव्हेंबर )

▪ ब्लॉगवरील लेखन ( २४ डिसेंबर ) आणि

▪ लेखक -तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया (२१ जानेवारी २०१८)

नोंदणी कशी करावी ?

१) सोबत जोडलेला कार्यशाळेचा नोंदणी अर्ज भरावा व साहित्य सेतूच्या वरील बँक खात्यामध्ये कार्यशाळेचे शुल्क भरावे.त्यासोबत आधार किंवा पॅन कार्डची छायांकित प्रत जोडून ती साहित्य सेतूच्या पत्त्यावर पाठवावी.

२) नोंदणी अर्ज भरून, शुल्क  खात्यामध्ये भरून त्याची पावती आणि ओळखपत्र स्कॅन करून namaste@sahityasetu.org या ई – मेलवर पाठवावे.

३) नोंदणी अर्ज भरून, शुल्क बॅंक खात्यामध्ये भरून त्याची पावती आणि ओळखपत्र 7066251262 या क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपनेदेखील पाठवता येईल.

४) ऑनलाईन नोंदणी साठी खालील लिंकवर क्लिक करा.

www.sahityasetu.org/karyshala

सोबत वेळापत्रक, माहितीपत्रक आणि नोंदणी अर्ज जोडला आहे.

कार्यशाळेचे शुल्क :

कार्यशाळांसाठी सहभाग शुल्क : प्रत्येक कार्यशाळेसाठी १५००/- प्रति व्यक्ती

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि २५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांसाठी शुल्क : १०००/-  प्रति व्यक्ती

बँक खात्याची माहिती :

बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र

खात्याचे नाव : साहित्य सेतू, खाते क्रमांक : 60291912085

शाखा : डेक्कन जिमखाना, पुणे  IFSC Code : MAHB0000003

साहित्य सेतू

६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिजजवळ, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४.

व्हॉट्सअ‍ॅप: ७०६६२५१२६२  तुषार पाटील – ९५५२८५८१००  आरती घारे –  ९४२०८५९८९३    

दूरध्वनी – (०२०) २५५३४६०१     ई-मेल –namaste@sahityasetu.org  

 

1+
Posted on

‘लिलियनची बखर’- पुस्तक परिचय

‘लिलीयनची बखर’
लेखक: अनंत सामंत
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

म्हणावं तर ऐतिहासिक किंवा सत्यकथा असणार हे पुस्तक, इतिहासाने किती नररत्न आपल्या उदरात सामावून घेतले आहेत याचा उत्कृष्ट नमुना आणि त्यापैकीच एक असणारा ‘राजा कृष्णाजी भट’ यांच्याबद्दल सांगणारे हे पुस्तक.
साधारणपणे कान्होजी आंग्रे यांच्यानंतर समुद्रावर दहशत निर्माण करणारा हा योद्धा. हा राजा तसा मराठेशाहीतीलाच, पण ना याची कोणती जहांगीर, ना कोणती वसाहत, ना कोणता राज्याभिषेक, ना कोणता बडेजाव. बाकी याचं स्वतःच अस असणार एकमेव जहाज ज्याच नाव ‘दुर्गा’ आणि त्याच्यावर त्याच स्वतःच अस फडकणार निशान ते म्हणजे पांढऱ्या झेंड्यावर स्वस्तिक. या झेंड्याची व गलबताची जरब इंग्रज, पोर्तुगीज तसेच सिद्द्यांना सुद्धा होती.
पुस्तकाची सुरवात ऐतिहासिक पुराव्याने होते. साधारणपणे जून १७२७ च्या आसपासच्या काळातील झालेल्या घडामोडी यात चितारण्यात आल्या आहेत. राजा कृष्णाजी भट, इंग्रजांचा चीफ एजंट सर गिफर्ड, गिफर्ड ची नात शोभावी अशी पण त्याची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड व बऱ्याच जहाजांवर मर्दुमकी गाजवलेला कॅप्टन कॅम्पबेल यांच्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी यात मांडण्यात आल्या आहेत.
लंडन मध्ये एका रिकाम्या वाड्यात काही हस्तलिखित सापडली. काही इतिहासकारांच्या मते त्यातील हस्ताक्षर हे लिलीयन गिफर्ड यांचे असावेत व त्या नोंदीवर आधारित हे पुस्तक असल्याने यास “लिलीयनची बखर” हे नाव देण्यात आलं असावं.
बंडखोर, अन्यायाची चीड असणारा कृष्णाजी भट हा तितकाच सुसंस्कृत व एखाद्या इंग्रजाला लाजवेल अशी इंग्रजी बोलतो. हा योद्धा अरबी समुद्रात होणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व सिद्दी याच्या जहाजाच्या वाहतुकीवर दहशत ठेवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ती वेगवेगळ्या उपयोगी कारणा करिता खर्च करतो. अशाच एका ‘डेस्टिनी’ या इंग्रज जहाजाला पकडल्यावर त्याचा सापळा रचून डेस्टिनीला वाचवायला येणाऱ्या ‘क्रिस्टल’ ह्या सर गिफर्डच्या जहाजाला कावेबाज व शिताफीने शरण येण्यास भाग पाडून त्याबदल्यात पन्नास हजार पौंडची मागणी व त्याबदल्यात खुद्द सर गिफर्डची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड हिस ओलीस ठेऊन घेणे हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं लेखकाने या पुस्तकात मांडलंय. या सर्वातून सुटता यावं म्हणून सर गिफर्ड ने केलेला विश्वास घातकीपणा व कप्तान कॅम्पबेल चा धुर्तपणा सुद्धा यात उत्कृष्ट पणाने मांडलाय. लिलीयन ला ओलीस ठेवल्यावर तिचा असणारा कृष्णाजी भटा बद्दल चा तिरस्कार व पुढे जाऊन त्या तिरस्काराचे होणारे प्रेमात परिवर्तन त्यांनतर सुद्धा कृष्णाजी भटा ने इंग्रजांच्या हृदयात भरवलेली धडकी हे वाचण्याजोगे आहे .
हे पुस्तक वाचताना एखादा हॉलिवूडपट डोळ्यासमोर चालू आहे असं लिहल असून बऱ्याच वेळेला ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या चित्रपटाची आठवण होते.

– महादेव कुंभार

2+