Posted on

तेंडुलकरांच्या ९०व्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानमाला

1+

या वर्षी हिवाळ्यात महाराष्ट्र प्रवासात काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय… म्हणून पुरेशी आधीच ही पूर्वसूचना द्यायचा विचार केलाय…!
एक समर्थ नाटककार म्हणून मराठी साहित्यात विजय तेंडुलकरांचं स्थान नक्कीच निर्विवाद आहे… त्यांची अनेक नाटके वेळोवेळी कितीही खळबळजनक ठरली असली तरीही तेंडुलकरांच्या लेखणीचं सामर्थ्य तर नाकारलं जाऊ शकत नाही हे नक्की…!

कधीतरी सन ७०-७५ च्या दरम्यान काही नाटकांचे प्रयोग पाहिले तेंव्हाच तेंडुलकरांची वैचारिक अभिव्यक्ति मनाला भावली… १९७७-७८ नंतर संन्यस्त जीवनात उत्तर भारतात राहू लागल्याने काही नाटकांचे रंगमंचावरील प्रयोग पाहू शकलो नव्हतो तरी त्यातल्या काहींचे यूट्यूब-प्रसारण पाहिलं तर काहींच्या संहिता पुस्तकरूपात वाचल्या.
अर्थातच मला या नाटकांमधून अभिव्यक्त झालेली तेंडुलकरांची वैचारिक चौकट इतरांपेक्षा थोडी वेगळ्या प्रकारे उमजत गेली एवढं नक्की…!
प्रा.डाॅ.बर्वे सर सुमारे ३१-३२ वर्षांपूर्वी केदार-बदरी तीर्थयात्रेला गेले असताना मला बदरीनाथमध्ये भेटले, तेंव्हाचा आमचा परिचय पुढे वर्षानुवर्षे माझ्या पुणे दौर्‍यात अत्यन्त दृढ होत गेला. मराठी काव्य आणि साहित्याबद्दलची दोघांच्याही मनातली आवड हा या वाढत्या संबंधातला मोठा दुवा म्हणावा लागेल.


एक अध्येता म्हणून स्वतःच्या पीएच्.डी साठी बर्वेसरांनी लिहिलेला शोधप्रबंध हा तर तेंडुलकरांच्या नाटकांची वस्तुनिष्ठ समीक्षा करणारा पहिलावहिला प्रयत्न होता. साहजिकच बर्वेसर हे तेंडुलकरांच्या नाटकांच्या अध्ययनाच्या बाबतीतले पुरोधा ठरतात. त्यांच्या प्रबंधावर आधारित “तेंडुलकरांची नाटके” या समीक्षात्मक पुस्तकाची द्वितीय संवर्धित आवृत्ती गेल्या ६ जानेवारीला प्रकाशित झाली, तेंव्हापासून सातत्याने आपसात होत आलेल्या चर्चेतूनच आत्ताच्या या व्याख्यानांची कल्पना जन्माला आली.
येत्या ६ जानेवारीला तेंडुलकरांची ९० वी जयंती… त्यानिमित्ताने आयोजित व्याख्यानमाला आयोजनाच्या सोयीनुसार आठवडाभर आधी म्हणजे दि.२८, २९ व ३० डिसें.२०१७ या दिवसात होणार असून मी या तीन दिवसात तेंडुलकरांच्या नाटकांमधून अभिव्यक्त झालेली विचारधारा मला उमजली तशी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
तेंव्हा आत्तापासूनच या तारखांची नोंद करून ठेवावी आणि कार्यक्रमात आपल्या उपस्थितीचा लाभ द्यावा हा आग्रहपूर्वक अनुरोध आहे….!

1+
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *